तिळगुळ आणि मैत्री – अनुराधा देशपांडे, पुणे


मी गॅस वर कढई ठेवली आणि तीळ भाजायला घेतले. सहज कॅलेंडर कडे लक्ष गेले आणि माझे मलाच आश्चर्य वाटले. अगबाई! २०१८ सालचे बाराही महिने संपलेत की! डिसेंबर महिन्याचे जसे वेगळे महत्व आहे तसेच नवीन वर्षाचे ही आहेच की. डिसेंबर म्हणजे वर्षाभरातील सर्व गुपिते  उघड करण्याचे हक्काचे ठिकाण. वर्षभरात केलेल्या चुकांची कबुली व नवीन संकल्प ठरवण्याचा हक्काचा महिना. ह्या महिन्यातच आपल्याला चुका सुधारण्याची संधी व नवीन स्वप्ने साकारण्याची जिद्द मिळते. आणि म्हणून आपण सरत्या वर्षाला कृतज्ञता पूर्वक निरोप देतो. नवीन वर्ष अधिकच उमेदीने, उत्साहाने जगण्याचे आश्वासन आपणच आपणास देत असतो. आणि मोठ्या आनंदाने नविन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होतो.

नविन वर्षात पहिला येणारा सण म्हणजे संक्रांत. "तिळगुळ घ्या गोडगोड बोला" हा संदेश घेऊनच जीवनातील गोडीची पखरण करीत हा महिनाही आपले नवीन उत्साहाने स्वागत करतो. तिळाची स्निग्धता व गुळाची गोडी ज्यावेळी एकत्र होतात त्यावेळी एक अप्रतीम खमंग चवीचा पदार्थ आपल्या सर्वांची रसना अधिकच खवळवितो. आणि कढईतील तीळ भाजताना झारा जसा पुढे मागे होत होता तशीच विचारांची आवर्तने माझ्या मनात हळुवार पणे उमटत होती, मिटत होती. समानेशु सख्यं म्हणतात ते खरे! दोन्ही पदार्थ पौषातील थंडी सहन करायची मानसिक तयारी करवून घेत असतात जणू. दोन्ही पदार्थ एकमेकात मिसळले तरीही आपले अस्तित्व (चवीच्या रुपात) दाखवीत असतातच ना! आणि माझे मन भुर्रकन उडून भूतकाळात माझ्या शालेय जीवनात घेऊन गेले.

खरं तर आम्ही दोघी मैत्रिणी सख्ख्या सख्ख्या. एकमेकीं वाचून आमचे पानही हलत नव्हते. अभ्यासातही कधी ती पुढे; तर कधी मी! आमचे रोल नंबरही अगदी एकमेकींच्या मागोमाग. त्यामुळे साहजिकच आमची बसायची जागा जवळ जवळची. मला वाटते त्यातूनच आमची मैत्री फुलत गेली. इतकी, की फक्त घरी जातानाच आमची ताटातुट व्ह्यायची. सगळी त्या वयातील गुपिते उघड करण्याचे ती माझे व मी तिचे विश्वासाचे एकमेव ठिकाण. आमची मैत्री म्हणजे एक उघंड गुपित होते. फक्त वर्गातच नाही तर आमच्या शिक्षकांनाही हे माहीत होते. अनेकदा असेही घडले की गृहपाठ करायलाही आम्ही एकदमच विसरायचो. आणि मग हसत हसत आमच्या शिक्षिका आम्हाला म्हणायच्या ही , "काय, दोघींनी मिळून ठरवले काय?" तर इतकी ही घट्ट मैत्री आणि अचानक एक दिवस काहीतरी किरकोळ कारण घडले आणि आमचा अबोला सुरू झाला. त्या वयातील अडनेडेपण आम्हाला नडले असावे. आमच्या अबोल्याचे कारण सर्वांनी विचारले पण तिला किंवा मला ते सांगावेसेच वाटले नाही. ही गोष्ट आमच्या शिक्षकांच्या ही लक्षात आली होती.

आमच्या बालपणी आपल्या गुरुजनांस मान देण्याची प्रथा असल्याने प्रत्येक सणाच्या वा दुसऱ्या दिवशी (सणाला शाळेला सुट्टी असायची) गुरुजनांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचीही प्रथा होती. त्यांचा तो पाठीवर फिरणारा आशीर्वादाच्या हाताचा स्पर्श अजूनही जाणवतो. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने, संक्रांतीला तीळगुळ आणि दिवाळीला फराळ देण्याची पद्धत होती. त्यामुळे आमच्या शिक्षकां बरोबरच आम्हा विद्यार्थ्यांचे एक अनामिक नाते अधिकच दृढ होत असावे.

अगबई! झाला की तीळाचा घाणा भाजून. पुनश्च गरम कढईत मी तीळाचा दुसरा घाणा करत असताना माझी विचार शृंखला सुरू झाली. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सगळ्यांनीच आमच्या शिक्षकांना तिळगुळ दिला. आणि नेहमीप्रमाणेच त्यांनी आम्हाला आशीर्वादही दिला. 

क्षणभर थांबून त्या म्हणाल्या , "काय ग, आजकाल तुमची बडबड एकदम बंद झालीय. भांडलात की काय एकमेकींशी?". आम्ही दोघींनीही डोळ्याच्या कोपऱ्यातून एकमेकींकडे बघत नाही नाही अशी मान हलवली. पण आमचे शिक्षक जे समजायचे ते समजले होतेच. त्यांनी खूप छान शब्दात आमची समजूत घातली. "अग, आता असे बघा, ही तुम्ही दिलेली वडी, त्यात तीळ आणि गुळ हे दोन पदार्थ तर आहेतच, पण, त्याचबरोबर त्याची गोडी अधिक रूचकर करण्यासाठी तुमच्या आईने त्यात वेलची पावडर घातली आहे, वरून खोबरे ही पसरवले आहे आणि मग सुबकश्या अश्या तिळाच्या वड्या पाडल्या आहेत. हो ना?  हे सगळं जरी खरं असलं तरी मुलींनो, तीळ आणि गूळ आपली वेगळी चव जिभेवर रेंगाळत ठेवतात, तसचं असतं मैत्रीचं पण! आपापले अस्तित्व आपण टिकवून ठेवायचच पण वेलची आणि खोबऱ्यासारखी त्या पदार्थांची खुमारी वाढवणारी व्यंजन त्यात टाकून पदार्थ अधिक रुचकर बनवायचा. एकमेकींचे गुणदोष सांभाळत पण एकमेकींशी साथ निभावत ती दृढ करण्याकडे आपला कल असावा. नुसता गुळ वा नुसते तीळ जसे चांगले लागत नाहीत तसेच आहे बरं मुलींनो हे मैत्रीचे नाते. दोघींनी एकमेकांना नुसतेच समजून घ्यायचे नाही तर इतर अनेक व्यंजनांनी आपल्या मैत्रीची खुमारी वाढवण्याचं कसब तुम्हाला जमलं पाहिजे, ते आत्मसाद करायला शिका आणि मग चाखा ह्या मैत्रीतील गोडवा. आपलं अस्तित्व न विसरता एकमेकात समावणे हा आनंद खरोखरी दुर्मिळ आहे बाळांनो. तेव्हा करा आता एकमेकींशी बट्टी!"

आमच्या शिक्षिका आम्हाला समजावीत होत्या आणि आमचं रडणं सुरूच होते. बाईंनीच आमचे हात एकमेकींच्या हातात दिले आणि सांगितले, "आता भांडायचे नाही बरे का? कळली ना मैत्रीतील सख्ख्याची गोम?" आम्ही दोघींनीही माना हलविल्या. आमच्याही नकळत एकमेकींना घट्ट मिठी मारली. वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि आम्ही भानावर आलो.

विचारांच्या गर्तेतून मी बाहेर आले. माझे तीळ छान खमंग भाजून झालेच होते आणि गुळही किसून झाला होता. गुळाच्या पाकात तीळकुट टाकून मी छानश्या खुटखुटीत वड्या पाडल्या आणि छानसे लाडूही वळले. वड्या आणि लाडू देवापुढे ठेवले आणि श्रद्धापूर्वक नमस्कार केला. माझी मैत्रीण (सध्या ती अमेरिकेत असते) जिथे असेल तिथे ती सुखी राहावी म्हणून देवाची प्रार्थना केली.

इतक्यात दारावरची बेल वाजली. इतक्या दुपारी कोण बरं आले असावे?  असा विचार करतच मी दार उघडले. माझ्या  नावाचे courier आले होते. कुठून आले ते बघितले. तर माझ्या 'त्याच' मैत्रिणीने ते माझ्यासाठी पाठवले होते. या योगायोगाने माझे डोळे इतके भरून आले की सही कुठे करावी हेही मला दिसेना, उमगेना! मैत्रीच्या चिवट व अतुट धाग्यानेच आम्हाला अजूनही घट्ट बांधून ठेवले आहे.

किती गोड असतात ना हे मैत्रीचे बंध? अगदी तीळगुळासारखे! एकमेकांशी घट्ट बांधिलकी असलेले. अवीट गोडीचे!!

अनुराधा देशपांडे, पुणे

No comments:

Post a Comment