अवचिता परिमळु



आजच्या मोबाइल युगात आपल्या बहुतेक गोष्टी शब्दशः चुटकीसरशी होतात. खरंच विचार केला तर आपण चुटकी वाजवायला जी बोटे वापरतो तीच बोटे वापरून "कर लो दुनिया मुठ्ठी में" असं आज झालंय. क्षणात संवाद, क्षणात गाणे, क्षणात सिनेमा, क्षणात हवी ती वस्तू, म्हणजे जणू अल्लादिनच्या जादुई दिव्यासारखं झालंय. अल्लादिनच्या गोष्टीत हवी ती खाण्याची वस्तू आणून देणाऱ्याला "जिन" म्हणायचे, आता "झोमॅटो" किंवा "स्विगी" म्हणतो. (उद्या "शबरी" पण म्हणतील!) पण ही नावे ठेवणारे धन्य होत. सर्वप्रथम मी स्विगी हा शब्द ऐकला तेव्हा त्याचा अर्थ  काहीतरी "हातसफाई"चा प्रकार असावा, असा माझा समज झाला होता; आणि झोमॅटो म्हणजे इंग्लिश सिनेमामध्ये असतात तसे झोंबी डोळ्यासमोर आलेत. (हे अर्थ खूप चुकीचे नसावेत, असं आता वाटायला लागलंय). मोबाईलमुळे जन्माचे आई-बाप सोडून घर, शिक्षण, नोकरी, बायको, पुस्तके, जेवण, कपडे काय वाटेल ते आज मिळवू शकतो  ("नोकरी"नंतर सवयीने "छोकरी" लिहिणार होतो, पण आवरले !) थोडक्यात काय, तर आपले आयुष्य हे आजपासून फक्त २०-३० वर्षांच्या आधीच्या आयुष्यापेक्षाही कमीतकमी ५० पटींनी सोपे आणि सुसह्य झाले आहे. पण त्याच सोबत आपल्या सर्वांचा संयम मात्र कमी होऊ लागला आहे. स्वतःला नको त्या "२४ x ७ कनेक्टेड" च्या चक्रात अडकवून आपण आपलेच गुलाम झालो आहोत. सकाळी सहाला अलार्मसोबत उठलो नाही तर दिवसातला पहिला गिल्टी कॉन्शन्स येणार, योग/जॉगिंग/जिम झाले नाही तर दुसरा, जास्त जेवलो तर दिवेकरांचा शाप, जास्त वेळा जेवलो तर दीक्षितांचा, जास्त कॅलरीज पोटात गेल्या म्हणून उद्या दुप्पट व्यायाम करण्याची अपेक्षा, नोकरीत बॉसने दिलेले काम आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या आधी करण्याची होड, आपल्या पोरांना सुपरकिड करण्याच्या नादात त्यांना या क्लासमधून त्या क्लासला सोडण्याची कसरत (मग आपले पोर सुपरकिड झाले नाही, तरी आपण सुपरपॉप किंवा सुपरमॉम होऊन मोकळे !). अरे हे सर्व करायचे तर आयुष्य जगायचे तरी केव्हा ? पण कधीतरी एखादा असा क्षण येतो की नकळत आपल्या सर्व अपेक्षा त्या क्षणासाठी का होईना सरतात, आपलं मन आकाशासारखं मोकळं होतं, आणि तसं झालं की आपण नकळत आपल्या सभोवतालशी एकरूप होतो. आपलं जीवन त्या एका क्षणात आपण पुन्हा जगायला लागतो आणि एखादी गोष्ट जी ठरवूनही झाली नसती, ती  ध्यानीमनी नसताना अचानक होते. When mind becomes free without any expectation whatsoever, the magic starts happening!  हे magic , ही जादू तुम्ही कधी अनुभवली आहे का ? जबाबदाऱ्या नसताना आपण ती जादू कधीकधी अनुभवली असते कारण आपण जीवन जगण्याच्या जवळ असतो, पण सांसारिक जबाबदाऱ्या आणि अपेक्षा यामुळे आपण जगणे विसरतो आणि ही जादू पण हरवते. पण अनेक वर्षांनी, नकळत ही जादू काही महिन्यांपूर्वी माझ्यासोबत पुन्हा घडली !

जून महिन्यातली गोष्ट असेल, मी नागपूरहून बंगलोरला जायला निघालो. नागपूर माझं घर आणि जन्मगाव. इंजिनीरिंग पर्यंत शिक्षण नागपूरचं. त्यानंतर एमटेकची आयआयटी मुंबईला दोन वर्षे आणि १९९९ ला नोकरीनिमित्ताने बंगलोरला प्रस्थान. त्यानंतरच्या साडेपाच वर्षांच्या बंगलोरच्या वास्तव्याने मला खूप काही दिले. तिथे मी SAS (नंतरची Sasken) ह्या कंपनीत होतो. तिथे अत्यंत हुशार आणि मानाने अत्यंत सज्जन असे अनेक लोक भेटले. प्रोजेक्ट ग्रुप म्हणजे कुटुंबच जणू. त्यावेळची दोन-तीनशे लोकांची कंपनी दोन तीन वर्षातच दीड-दोन हजार लोकांपर्यंत वाढली, कंपनीसोबत आम्हीही वाढलो आणि आमचा मित्रपरिवारदेखील. जीवाभावाचे अनेक मित्र बंगलोरला भेटले. तो काळ बऱ्याच वेगवान घटनांचा, पण मुख्यतः आनंदाचा गेला. औपचारिक शिक्षण झालेले, खिशात खर्च करायला गरजेपेक्षा जरा अधिकच पैसा, जबाबदाऱ्या काहीच नाहीत आणि लग्न व्हायचे असल्यामुळे मित्रांसोबत हवे तेव्हा हिंडायला मोकळे. त्या पाच-साडेपाच वर्षात मी अंदाजे वीस-पंचवीस वर्षांचं जगलो असेन. न ठरवता केव्हाही मित्रांसोबत त्यांच्या स्कूटर किंवा बाईकवर फिरायला निघायचे (कुठेही मैत्रीण करणे आम्हाला कधीच सोपे नसल्यामुळे, आमच्यासारख्या मित्रांसोबतच !). मग कधी मद्रास रोड, कधी म्हैसूर रोड, कधी IISc कॅम्पस, कधी अख्खा रविवार MG/Brigade रोडवर.  तर कधी कंटाळा आला म्हणून do-nothing रविवार, म्हणजे उशिरा उठून गाणे ऐकत, पेपर वाचत सगळं उशिरा आवरून, सकाळचे जेवण दुपार उलटून गेल्यावर करून जर वेळ उरलाच तर मग टीवी वर Friends, Everybody loves Raymond सारख्या मालिका पाहून रविवार संपला असे जाहीर करायचे किंवा मित्रांकडे रात्र जागवायला जायचे. म्हैसूर-उटी म्हणजे तर घर-आंगणच. मित्रांसोबत अनेकदा तर गेलोच पण आपल्या किंवा मित्रांच्या घरचे कोणीही आले तरी सोबत म्हणून जाणे क्रमप्राप्तच होते. काही काळाने तिथले दुकानदारही ओळखू लागले होते. कालांतराने लग्नही बंगलोरला असतानाच झाले ("अरेंज्ड मॅरेज" हे सुज्ञांनी ओळखले असेलच). बायकोलाही बंगलोर प्रचंड आवडले आणि घर घेऊन तिथे स्थायिक होणार तितक्यात नागपूरला एक चांगली संधी अचानक चालून आली. इतर वेळेला विचार केला नसता, पण नागपूरला घर असल्यामुळे जाऊन बघू या, नाही जमलं तर परत येऊ, असं म्हणून नागपूरला आलो; आणि नंतर वैयक्तिक आयुष्यात काही प्रसंग असे आले की नागपूरलाच स्थायिक झालो. खरं सांगायचं तर बंगलोर सोडण्याचा निर्णय इतका तडकाफडकी घेतला (कसा ते आजही माहित नाही), की खरं तर बंगलोर सोडलं असं अजूनही वाटतच नाही. त्यामुळे बंगलोरला जाण्याची संधी किंवा निमित्त मी शोधतच असतो आणि बंगलोरला जाऊन जवळच्या मित्रांना भेटून प्रत्येक वेळी नवीन श्वास घेऊन मी परतत असतो. बंगलोरला जायचे म्हणजे माझ्या मनात एक वेगळाच उत्साह संचारतो. त्यावेळी जे काही मनावरचे ताण असतील, अर्धवट राहिलेली कामे असतील, जबाबदाऱ्या असतील, त्या सगळ्या गोष्टी माझं मन आपसूकच दूर सारते आणि मी बंगलोरला जायला मोकळा होतो. बऱ्याचदा विमानात बसायच्या आधीच मी बंगलोरला पोहोचलो असतो. ह्या प्रवासात बऱ्याचदा स्वतःला जाणवण्याइतपत मी वेगळा असतो, आणि त्याचे प्रत्यंतर यावेळी मला आले.

यावेळी बंगलोरला मला एकट्यालाच जायचे होते आणि विमानाचा बोर्डिंग पास घ्यायला गेलो तेव्हा लक्षात आले की आपली सीट बुक झाली नाहीये, त्यामुळे जी मिळाली ती घेणे क्रमप्राप्त होते. बरोब्बर ना खिडकीची, ना आयल (isle)ची, अशी मधली सीट मिळाली. इतरवेळी मी दुसरी सीट मागच्या बाजूला आहे का, वगैरे विचारून पाहिले असते, पण बंगलोरला जायचं तर सगळं माफ, उगाच नकार ऐकायला मिळाला तर तोंड फुगवून जायला नको. बऱ्याच दिवसांनी स्वछंदी राह्यला मिळत असल्यामुळे ठरवले की जे होईल किंवा जे मिळेल ते आनंदाने स्वीकारायचे, उगाच अपेक्षा नको म्हणजे अपेक्षाभंगाचे दुःखही नाही. त्यामुळे शांतपणे जागेवर जाऊन बसलो. आजूबाजूचे प्रवासी यायचे होते. आयुष्याचा अख्ख्या चाळीस वर्षांचा अनुभव गृहीत धरता आजू किंवा बाजूला एखादी सुंदर स्त्री किंवा कॉलेज कन्यका, गेलाबाजार एखादी स्थानिक सेलिब्रिटी (पुरुष वा स्त्री कोणीही) असण्याचाही चान्स शून्य टक्के होता ! आता आजूबाजूला फक्त कटकटे लोक नाही आले म्हणजे मिळवली,  पण त्याचीच शक्यता जास्त. शेवटी जे होऊ नये (पण नेहमी होते) तेच झाले.
 
खिडकीच्या बाजूला बसायला एक पन्नाशीचा, दिसायला एक सभ्य दिसणारा (फक्त दिसणाराच) आणि टापटीप असणारा, संभावित गृहस्थ आला. जोडे आणि डोक्यावरचे (उरलेले) केस नुकतेच पॉलिश केलेले, कदाचित गावाला जायचे म्हणून डोक्यावरचे केस चोपून बसवण्यासाठी आजच सलूनमध्ये गेलेला, कडक इस्त्रीचे कपडे आणि चेहऱ्यावर माशीपण हलणार नाही इतका मख्खपणा आणि डोळ्यांत आपण कुणीतरी असल्याची स्पष्ट जाणीव. दुसऱ्या बाजूला साठीच्या एक काकू आल्या ज्यांचा खडा आवाज ऐकल्याबरोबरच तिकडे एकंदरीत न बोललेलंच बरं, असा प्रकार. अश्या प्रकारे आजू आणि बाजूच्या जागा अपेक्षित लोकांनी घेतल्यावर आता पुढचा दीड तास स्वतःसोबतच घालवावा लागणार हे पक्के झाले. थोड्या वेळाने विमान वर गेले आणि खिडकीच्या बाजूचा संभावित गृहस्थ खिडकीला चिकटला. झाले असे होते की ती खिडकीची जागा विमानातील सर्वोत्तम होती. आपात्कालीन खिडकी असल्यामुळे भरपूर लेग-स्पेस आणि खिडकीतून विमानाच्या उड्डाणाचा आवाका घेता येत होता. मला खात्री आहे की ती खिडकीची जागा ह्या संभावित टापटीपने २ महिने आधी अधिकचे पैसे भरून बुक केली असणार. नेमके त्या दिवशी आकाशात काळे ढग होते आणि सूर्य त्या ढगांसोबत लपाछुपी खेळत होता. विमान थोडं अजून वर गेलं आणि सूर्य आता ढगांच्या पडद्याआड क्षितिजावर दिसावा तसा एकाच रेषेत दिसायला लागला. मी थोडं खिडकीतून काही दिसतं का म्हणून बघायचा प्रयत्न केला तर आकाशातला सूर्य दिसण्याच्या ऐवजी संभावित टापटीपच्या डोक्याचा चंद्र आड आला. आता संभावित टापटीपने माझ्याकडे सरकून सीटसोबत नव्वद अंशाचा कोन करून आणि चेहरा खिडकीला चिकटवून मोबाईलवर त्या ढगांचे आणि सूर्याचे फोटो घेण्याचा सपाटा लावला. मलादेखील असे फोटो काढण्याची खूप हौस आहे, पण आज फोटो तर जाऊच दे, संभाविताच्या चंद्रामुळे माझ्यासाठी आकाशातील सूर्याला खग्रास ग्रहण लागले होते. त्यात बाजूच्या काकूंमुळे एकदा मी थोडं उजवीकडे (म्हणजे संभावितकडे) सरकायचा
प्रयत्न केला तर जवळजवळ आडवा बसलेल्या त्या संभाविताला साहजिकच माझ्या पायाचा स्पर्श झाला. मग मात्र ताडकन त्या संभाविताने "कोण कोण बाजूला बसतात" ह्या नजरेनेच आम्हाला झापले आणि कदाचित मला ती नजर समजली नसेल म्हणून “पाय लागला” हे वर सांगितले देखील. इतर कुठल्याही वेळेला असे झाले असते तर नागपुरी खाक्याला जागून
मी त्याला तो कसा चुकीचा बसला आहे, हे नागपूरची पितृभाषा म्हणजे अस्खलित हिंदीत सुनावले असते. पण आज आनंदी राहायचे ठरवले असल्यामुळे त्याला सॉरी म्हणून मोकळा झालो. दुसऱ्या बाजूच्या काकूंची सतत वेगळीच उठबस सुरु होती, ते नसेल तर हवाई सुंदरीला बोलावून जेवढ्या मिळतील तेवढ्या सेवा उपलब्ध करून घेणे सुरु होते (नशीब, होत्या एकदोन हवाईसुंदरी, नाहीतर आमच्या नशिबात बऱ्याचदा हवाई-बाप्ये असतात). हवाई सुंदरी आली की ह्या काकूंशी आपला काहीच संबंध नाही, हे दाखवण्यासाठी मी एक्सट्रा प्रयत्न करीत असे. ह्या दोन्ही बाजू सांभाळून आपल्याच सीटवर मी अंग चोरून खिंड लढवत होतो. पण आज का कुणास ठाऊक, हे सर्व घडते आहे ते योग्यच आहे, अशी एक अपेक्षारहित आनंदी भावना मनात निर्माण झाली होती आणि मी त्यातच खुश होतो. विमान वेळेवर उतरलं, आम्हीही उतरलो, उतरल्यावर एअरपोर्टच्या बसमध्ये बसलो आणि आणि ताबडतोब बस सुरु झाली. संभावित टापटीप कुठे गेला म्हणून सहज बसमध्ये नजर
फिरवली तर काही दिसला नाही. बघतो तर महाराज बसमध्ये न चढता आता जमिनीवरून आकाशातल्या सूर्याचे फोटो काढण्यात दंग होते. मी आकाशाकडे पाहिले आणि "नभ मेघांनी आक्रमिले" ह्या ओळी आपसूकच मनात उतरल्या. यावेळी मात्र पहिल्यांदा मला वाटले की आपण बसमध्ये चढण्यात जरा घाईच केली. आकाशातून नाही तर जमिनीवरून तरी एक चांगला फोटो निघाला असता. पण आज कोणी मनाचा ताबा घेतला होता माहित नाही, त्याने समजावले की वेड्या, यातूनही काहीतरी चांगलंच निघणार आहे.  दुसरं मन म्हणालं, "डोंबलं, बंगलोरचा संध्याकाळचा ट्रॅफिक-जॅम दहा मिनिटे लवकर दिसेल, अजून काय". शेवटी ह्या दुसऱ्या मनाकडे पहिल्या मनाने दुर्लक्ष केले.

बस टर्मिनस वर पोहोचली. "तुमचे सामान पाच नंबरच्या बेल्टवर येईल" अशी "आकाशवाणी" विमानात असतानाच झाली होती, तिला स्मरून पाच नंबरच्या बेल्टजवळ आलो. आमच्या विमानातील बरेच लोक तिथे गर्दी करून बेल्टच्या आजूबाजूला उभे होते आणि सामान यायचे होते. मी मोकळी जागा बघून उभा होतो, तिथे माझ्या बाजूला एक साठीचे दिसणारे जोडपे उभे होते. माणसाचा खादी झब्बा/पायजामा, आणि बाईंची साधी, सुती साडी. महाराष्ट्रात कुठल्याही गावातील असू शकतील असे काका-काकू असावेत आणि बंगलोरमध्ये असलेल्या मुलाकडे आले असावेत असा विचार येतो न येतो तोच त्या काकांचा चेहरा ओळखीचा वाटला. म्हणून नीट पाहिले
तर दोन इंच उडालोच. माझ्या बाजूला चक्क डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे ट्रॉली हातात धरून सामानाची वाट पाहत माझ्यासारखेच उभे होते. ज्यांच्याबद्दल प्रचंड वाचलं आहे, टीवी वर मुलाखत पाहिली आहे, ज्यांनी लिहिलेलं "प्रकाशवाटा" वाचलं आहे, ज्यांचा हिंस्त्र प्राण्यांसोबत खेळतानाचा तसेच आदिवासींवर उपचार करतांनाचा "तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना, विश्वास दे"  हा सर्वांगसुंदर व्हिडीओ असंख्य वेळा पाहिला आहे (ज्याने बऱ्याचदा खिन्न मनाला उभारी देण्याचे काम केले आहे), नाना पाटेकरांच्या "डॉ. प्रकाश बाबा आमटे" ह्या सिनेमामध्ये  दाखवलेले कदाचित दहा टक्के पण नसेल असं आयुष्य जगलेले डॉ प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे अगदी बाजूला उभे आहेत, ह्यावर विश्वास ठेवायला मन अजूनही तयार नव्हते. इतर वेळी कदाचित मी थोडा बुजलो असतो पण आज कुणीतरी ढकलल्यागत मी त्यांच्या जवळ गेलो. डॉ. मंदाकाकू तोपर्यंत दुसऱ्या बेल्टवर सामान आलं का ते बघायला गेल्या होत्या. डॉ. प्रकाश आमटेंना नमस्कार केला आणि सांगितले की बऱ्याच वर्षांपासून भेटायची इच्छा होती त्यामुळे प्रत्यक्ष भेटून खूप आनंद झाला आहे. त्यांनीदेखील नागपूरहूनच आलात का वगैरे चौकशी केली. तितक्यात डॉ मंदाकाकूंनी त्यांना "प्रकाश, सामान इकडे सहा नंबरच्या बेल्टवर आले आहे", असे सांगून बोलावले. डॉ. आमटे मला म्हणाले "अहो, आमचं सामान सहा नंबरच्या बेल्टवर आलेलं दिसतंय, कदाचित तुमचंही असेल". तर खरंच माझंही सामान होतं तिथे. ते उचलण्याआधी (जातंय कुठे!) दोघांनाही वाकून नमस्कार केला. त्यांना भावना कळल्या असाव्यात. दोघांनीही आपुलकीने चौकशी केली "कुठे असता, काय करता" वगैरे; आणि बोलणं संपवून नमस्कार करून जायला निघाले. माझा अजूनही विश्वास बसत नव्हता आणि कोणाला सांगितले तर घरच्यांचा तरी बसेल का ही शंका क्षणार्धात मनाला चाटून गेली. "हा क्षण पुन्हा येणे नव्हे" हे माझ्या त्या दिवशीच्या मोकळ्या मनाने आपोआप ठरवले आणि जात्याच भिडस्त असलेल्या माझ्या तोंडून माझ्याही नकळत शब्द निघून गेलेत;  "आपल्यासोबत एक फोटो घेतला तर चालेल का ?" तर पटकन दोघंही मोकळेपणाने "हो, घ्या ना"
असं म्हणाले. माझा आदल्याच दिवशी विकत घेतलेला नवीन मोबाइल, अजून एकही फोटो घेतला नव्हता. सेल्फी-मोड सेट केला, आणि त्याकडे पाहून दोघांनीही कॅमेरात येऊ शकू, असे स्वतःला ऍडजस्ट करून घेतले. अश्या रीतीने माझ्या नवीन मोबाईलचा पहिला सेल्फी डॉ प्रकाश आणि डॉ मंदाकिनी आमटे, पद्मश्री आणि मॅगसेसे पारितोषिक विजेते, आदिवासींचे देव आणि देवांनाही हेवा वाटेल असे लक्ष्मी-नारायण, यांच्या सोबत निघाला. निघतांना त्यांनी विचारले "कोणी घ्यायला येणार आहे का", म्हटलं "टॅक्सी करेन". "ठीक" असं म्हणून स्मितहास्य करत हे अलौकिक जोडपे ट्रॉली घेऊन दाराच्या दिशेने निघाले. त्यांच्या मागे जाणार इतक्यात लक्षात आले की आपले सामान अजून बेल्टवरच आहे, ते फिरून उलट्या बाजूने गेले असणार. म्हणजे थोडं थांबायला लागेल. मनात विचार आला की हे सर्व आजच कसं काय घडलं;  आणि घडलं ते ठीक, पण इतर वेळी एवढी भीड मनात बाळगणारा मी आपणहून बोलायला काय गेलो आणि फोटो काय काढला ! मग लक्षात आलं की कदाचित हे सर्व मुळात अपेक्षारहित आणि आनंदी असण्याचा परिणाम असावा, ज्याने मन मोकळं झालं. मी जर त्या संभावित टापटीपवर चिडचिड केली असती किंवा त्याचं पाहून सूर्याचा फोटो काढायला थांबलो असतो तर अनेकांच्या अंधाऱ्या आयुष्यात प्रकाश आणणाऱ्या ह्या माणसांतील सूर्याची भेट राहून गेली असती किंवा माझं चिडचिडे मन त्यांच्याजवळ आपणहून जायला तयार झालं नसतं. नेहमी असं अपेक्षारहित असायला आणि अशी जादू अनुभवायला मिळेल का हो ? अशी जादू दररोज होणार असेल तर प्रत्येक विमानप्रवासात संभावित टापटीपच्या बाजूला बसण्याची आपली तयारी आहे. पण नेहमीच अशी जादू कशी होणार किंवा दररोज डॉ प्रकाश आमटे किंवा त्यांच्यासारखे लोक कसे भेटणार ? पण हेच दररोज व्हायला हवं असं तरी कुठे आहे ? जेव्हा आपण पूर्णपणे अपेक्षारहित असतो तेव्हा आपल्या आयुष्यात जे जे काही असतं ती जादूच असते. Present मध्ये जगणं हेच एक प्रेझेंट असतं, हे आता उमगलं.  
सहा नंबरच्या बेल्टवर माझं सामान आलं. त्या माझ्या बॅगची ट्रॉली करून मी दरवाजाकडे निघालो. दरवाजातून डॉ आमटे उभयता उजवीकडे वळताना दिसले, घ्यायला नक्की कोणीतरी आले असणार. दरवाजाजवळ पोहोचल्यावर नकळतच उजवीकडे नजर गेली. "सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे" असं म्हणणारेच नव्हे तर खऱ्या अर्थाने तसेच जगणारे डॉ प्रकाश आणि डॉ मंदा आमटे हे जोडपे पाठमोरे दूरवर जातांना दिसले. मी एअरपोर्ट टॅक्सी स्टॅन्डकडे जायचे म्हणून डावीकडे वळलो, आणि परागकणांचा सुवास लेवून वाहणारी बंगलोरची आल्हाददायक थंड हवा माझ्या चेहऱ्याला आणि शरीराला चाटून गेली. मनात अलगदच माऊलींचे शब्द लतादीदींच्या दैवी स्वरांसकट तसेच्या तसे उमटले,


"अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु,
मी म्हणे गोपाळु आला गे माये !"

रवींद्र केसकर

No comments:

Post a Comment