चंद्रास

तुझी आठवण माझ्या मनात, किती वेळा, किती प्रसंगात 
मामा म्हणुन पुकारले तुला, मामाच्याच चिरेबन्दी वाड्यात
बन्दा रुपया होतास, सूपभर लाह्याच्या कोड्यात
हरिणाची तुझी गाडी पाहिली मी बालपणात.........
तुझी आठवण माझ्या मनात, किती वेळा, किती प्रसंगात 

पुढे उमलत्या वयातरमले होते शाळा महाविद्यालयात 
तिथेही भेटलास गद्यात, पद्यातहमखासपणे भूगोलात..
डोक्यावरुन जायचे सारे गच्चीवरच्या अभ्यासात
अभ्यासही असायचा, तुझ्याच तर प्रकाशात...........
अशी तुझी आठवण माझ्या मनात, किती वेळा, किती प्रसंगात 

तारुण्याच्या गदधेपंचविशीत, संसाराच्या रहाटगाडग्यात
तू असायचास त्या भावगीतात, शब्दाततालासूरात.
आणि हसायचास मोदक देताना चतुर्थीच्या आभाळात.
उतरत होतास सर्वांगाने आयुष्याच्या टप्प्याटप्प्यात,
तुझी आठवण माझ्या मनात, किती वेळा, किती प्रसंगात 

आवस-पुनवेची उकल करत, झटतो आम्ही आमच्याच कोशात.
भरती - ओहोटी लहरी नाचवत, तू घेतोस मनास ताब्यात.
कधी गरगरत,कधी फरफटत सामील होतो तुझ्या प्रवाहात,
तुझी आठवण माझ्या मनात, किती वेळा, किती प्रसंगात 

उद्या............सिएटलची नात म्हणेल
चान्दोबा चान्दोबा भागलास का, मेपलच्या ट्रीमागे लपलास का
अन विचारेल कुठे असतोस दिवसभरात
हसून उत्तरशील ना तू, दिवसा जातो आज्जीच्या गावात
फिरतो इथल्या गमती सान्गत
हीच तुझी हवी साथ, आनंदाच्या रंगतरंगात 
तुझी आठवण माझ्या मनात, किती वेळा, किती प्रसंगात 

उल्का

No comments:

Post a Comment