तसा चंद्र
काही नवीन नाही कुणालाच. त्याच्याबद्दल लिहिलं गेलं नाही असं काहीच नसेल. तरीही चंद्र
खूप दिवसांनी दिसला म्हणून चुकून रस्ता क्रॉस करताना मधेच थांबून बघत बसण्याचा
वेडेपणा करत आल्ये मी लहानपणापासून. ऐश्वर्या चंद्राची वाट बघायची ना... 'हम दिल दे चुके सनम' मध्ये नाही का? मोठ्या
बायकांनी चाळणीतून बघायचा आणि कुमारिकांनी जाळीच्या, खडे लावलेल्या ओढणीतून बघायचा चंद्र! तेव्हा वाटायचं की सलमान
फार कमाल दिसत नाही म्हणून ती ओढणीतून बघत्ये त्याच्याकडे, पण चंद्र बरा दिसतोय तरी त्याला ओढणीतून बघण्यासारखं काय आहे? तरीही काळ आणि फॅशन, दोन्हींच्या
वेगाने जायलाच हवं म्हणून करून बघितली होती तशीच ओढणी, जुन्या मच्छरदाणीला फेव्हिकोलने खडीसाखर लावून. मग मुंग्या
आल्या होत्या. फेव्हिकोल काढायला लपून छपून मच्छरदाणी धुवायला लागली होती... एवढं करून त्या जाळीतून चंद्र धुसर, मळकटच दिसत होता. माझा किती विरस झाला
असेल याची कल्पनाच न केलेली बरी!
त्या
वेडेपणाचं बक्षीस म्हणा, इंग्लंडसारख्या ढगाळ देशात पंधरा वर्ष राहिल्याची नुकसान भरपाई म्हणा
किंवा सोन्यासारखं नशीब म्हणा, मला न बघायला मिळालेल्या
चंद्रांचं गेल्या दोन महिन्यांत उट्टं निघतंय. मी सध्या ग्रीसमध्ये आहे. अॅथेन्सपासून दीड तासावर असलेल्या ‘सिक्या’ नावाच्या गावात दोन
महिन्यांसाठी आल्ये. काही महिन्यांपूर्वी एखादी नवीन नोकरी शोधावी म्हणून सीव्ही
दुरुस्त करत होते आणि त्यातली माहिती वाचून माझा मला कंटाळा आला. हात-पाय चालू
असताना दिवसाचे तीन तास गाडीत उभं राहून उरलेले आठ तास स्क्रीनसमोर जातात या
गणिताने झोप उडाली, आणि आपण विशीचं शेवटचं वर्ष लंडनच्या रेल्वेचा महिन्याचा बावीस
हजार रुपयांचा पास काढून उभं राहाण्यात किंवा बसण्यात घालवू अशा भीतीने मी सीव्ही
हा प्रकारच मिटून ठेवला. सिक्या मध्ये होटेल चालवणाऱ्या एका कुटुंबाला लागेल ती
मदत करायला म्हणून मी महिन्याभरापूर्वी इथे पोचले. लहान मुलं सांभाळायची, त्यांना इंग्लिश
शिकवायचं, स्वयंपाक करायचा, इथल्या भाडेकरूंना काही हवं-नको असेल ते बघायचं, आणि त्याबदल्यात या
गावात राहायचं आणि मालक कुटुंबाबरोबर फिरायचं.
इथल्या माझ्या अंथरुणावर पडल्या पडल्या सप्तर्षी दिसतात. शुक्र आणि मंगळ असतात
जवळपास. जितकं टक लावून बघावं तितक्या जास्त चांदण्या उमटत जातात रात्रभर. कुठेतरी
आकाश पृथ्वीला मिळाल्यासारखं वाटतं तिथून समुद्र सुरू होतो, तो थेट माझ्या खोलीच्या पायथ्याशी येऊन थडकतो. त्यांचं आपापसात
सगळं अगदी क्लिअर आहे -- आकाशाचा रंग तो आणि तोच समुद्राचा. ढग असताना पाण्यावर
लाटा असतात आणि बोटी असताना वरच्या आरशात पक्षी उडतात. इथल्या आकाशाकडे बघितलं नाही तरी चंद्र पाण्यावर दिसतो. एकदा
गच्चीतून, एकदा खोलीच्या खिडकीतून आणि एकदा छतावर
चढलेल्या जाईच्या वेलीतून असा रात्रभर दिसत राहातो. सुरुवातीचे सलग पाच दिवस खिडकीसमोरच्या
डोंगराआडून चंद्र उगवताना बघून काय करू आणि काय नको असं झालं होतं. चांदण्यात बसून
येत होती-नव्हती ती सगळी गाणी गायली त्याच्यासाठी.
पृथ्वी आणि
आकाशाला तीन मुलं झाली असं सांगितलंय ग्रीक पुराणात. तिघांनीही आपापल्या
करिअरमध्ये अगदी नाव काढलं. त्यातला मोठा मुलगा ‘ईल्योस’ सूर्यरथ चालवतो. मुलगी ‘सेलेनी’ चंद्राची सारथी आहे,
आणि डाळिंबी रंगाची बोटं असलेली धाकटी बहीण ‘इयोस’ पहाट व्हावी म्हणून क्षितिजाचे दरवाजे उघडते म्हणे. ईल्योस सर्वज्ञ आहे,
उदात्त आहे, तळपता आहे. इयोस सुंदर आहे,
दयाळू आहे. आणि चंद्राचा रथ हाकणारी माझी लाडकी सेलेनी तेजस्वी आणि
शूर आहे. चंदेरी पंखांची, काळ्याभोर केसांची ही देवी कुठलाही
धोका पत्करून आपल्या प्रियकराला भेटायला जाणारी अभिसारिका आहे. एका प्राचीन
नाटककाराने तिला ‘रात्रीचा डोळा’
म्हंटलंय. सिक्याच्या समुद्रावर त्या चंद्रदेवीची विशेष मर्जी असावी...
रक्षाबंधनाच्या
दिवशी चंद्रोदय कधी होईल याबद्दल माझा अंदाज बरोबर निघाला आणि मला एवढा कॉन्फिडन्स
आला, की वाटलं हे असंच होत राहिलं तर तीन
महिन्यांनी आपण अर्निका पंचांगच सुरू करू शकू! पुढच्या आठवड्यात रात्री साडे आठ
वाजता माझ्यामागे होटेलमधले चार पाहुणे चंद्र बघायला गच्चीत आले आणि पोपटांचा थवा झाला आमचा. पहाटे दीड
वाजेस्तोवर चंद्र दिसलाच नाही. त्यामुळे सध्यातरी निर्णयसागरच फॉलो करायला लागेल.
उन्हाळातल्या
पौर्णिमांची ग्रीसमध्ये फार वाट बघतात. माणसांची वर्दळ असते, समुद्र शांत असतो, लोकांकडे पैसा खेळता असतो, शाळांना सुट्ट्या असतात
आणि सबंध रात्रभर चंद्र फुगलेल्या तांदुळाच्या भाकरीसारखा स्वच्छ दिसत राहातो.
रात्री नऊनंतर अख्खं गाव किनाऱ्यावर उतरतं. हिवाळ्यातली मंदी चालू होण्याआधी
एकत्र येऊन चार घास खावेत, थोडी वाइन घ्यावी आणि आदल्या
तीन-चार महिन्यांत जी चांदी झाली असेल ती साजरी करावी म्हणून लोक किनाऱ्यावर
भेटून जेवतात. सिक्यामध्ये यंदा रोशणाई करून, गाणी गायला दोन
लाइव्ह बँड घेऊन होड्या पाण्यात उतरल्या होत्या. गाणी ऐकत सबंध गावाची जेवणं पहाटे
दोनपर्यंत चालली!
कोरिन्थीया म्हणजे आमचा तालुका. इथल्या ‘आग़ियोन ओरोस’ किल्ल्याचा जीर्णोद्धार नुकताच पूर्ण झाला. जुन्या वास्तू सांभाळण्याची
प्रत्येक महापौराची कल्पना वेगळी असते. काहींना त्या शक्य तितक्या पिंजऱ्यात, लोकांच्या नजरेत येणार नाहीत अशा रुपात झाकून टिकवायच्या असतात
आणि काहींना तिकडे लोकांची वर्दळ वाढावी आणि त्यानिमित्ताने गाव नावारुपाला यावं असं
वाटत असतं. तर सध्या कोरिन्थीयाचे दिवस नावारुपाला येण्याचे आहेत. तिथल्या नगरसेविकेने
किल्ल्याचं उद्घाटन करायला पौर्णिमेला सोहळा ठेवला होता आणि चर्चमधल्या एका भजनी मंडळाला
गायला बोलावलं होतं. एरवी फक्त मेंढ्यांचा वावर असलेल्या त्या डोंगरातल्या गावाला एकदम
जाग आली! शे-दीडशे टाळकी गोळा झाली; तो ओसाड किल्ला गजबजला.
चौदाव्या
शतकातला बिझांतीनी (Byzantine) साम्राज्यातला हा मानाचा किल्ला होता. ‘आर्ग़ोस’ नावाच्या प्रांताशी कोरिन्थीयाला
जोडणाऱ्या वाटेवर असल्याने दोन्ही प्रातांवर लक्ष आणि नियंत्रण ठेवण्यासाठी
सोयीचा होता. बरंच काम करूनही तो ओसाड वाटतो, पण डगडुजीच्या
निमित्ताने नजरेत तरी आलाय आता. बालेकिल्ल्यावरून खाली पाहिलं तर भजनी मंडळ
चांदण्यात स्टेजवर उभं राहिलेलं दिसत होतं. घाईघाईने खाली आलो खरे, पण त्यांच्या गाण्याने वीट आणला. कमालीचे हौशी, आणि
दुःखी चेहऱ्याने वावरणारे कलाकार होते सगळे. आपलं देवळातलं एखादं भजनी मंडळ आणून
किल्ला दणाणून टाकावासा वाटायला लागला मला...
कार्यक्रम आटोपल्यावर
मंडळी एकमेकांचं अभिनंदन करत होती. या कामासाठी पैसे उभारून, ते पूर्ण करून लोकांपर्यंत पोचवणं
अत्ताच्या कडकीच्या दिवसांत सोपं नव्हतं. मी पण केलं अभिनंदन सापडेल त्याचं.
रापलेला रंग, माझा चुडीदार आणि कुंकवामुळे हे प्रकरण फॉरेनचं
आहे हे माझ्याकडे बघून सहज कळत होतं. वाटेत एक माणून जातीने थांबून बोलला.
किल्ल्याचं महत्त्व आणि युद्धनीतीत तो कसा मोलाचा होता ते सांगायला लागले काका. या
किल्ल्यावरून बाकीचे किल्ले कसे दिसतात आणि हे डोंगराळ बांधकाम कसं खास आहे वगैरे
वगैरे... मग मी पण त्यांना राजगडावरून तोरणा कसा दिसतो, आमचा
बालेकिल्ला कसा आहे, महाराजांची पहिली राजधानी कशी
युद्धनीतीसाठी चोख होती वगैरे सांगितलं. अजून किती सफाईने
ग्रीक यायला हवंय ते माझं मला कळलंच, पण टेहळणी, पीलखाना वगैरे शब्द मला ग्रीकमध्ये येत नाहीत म्हणून वाचले काका. नाहीतर
त्यादिवशी खलबतखान्यातून सुटका नव्हती त्यांची.
परतीच्या
वाटेवर ओळखीच्या दोन बायका भेटल्या. मला म्हणाल्या, “वा! आज कोरिन्थीयाचे मेयर साहेब बऱ्याच गप्पा मारत होते की
तुझ्याशी!”
मेयर? बाप रे... बिचाऱ्यांचा इतिहासाचा तास घेतला
होता मी चांदण्यात.
No comments:
Post a Comment