तिळगुळ आणि मैत्री - सौ. मनिषा पटवर्धन, मुंबई


आपले हिंदूंचे सणवार तसे बारा महिने असतात. प्रत्येक सणाचे वेगवेगळे महत्व असते. अर्थात आजकाल सणवारांचे महत्व कमीकमी होत चाललेले दिसते. आजकालच्या धावपळीच्या जीवनात ते सहाजिकच ना !!

त्यातलाच एक सण म्हणजे संक्रांत.. तीळातील स्नेह व गुळातील गोडवा.. यांचे मिलन. म्हणजेच मैत्रीचे प्रतिक... या सणामागे हाही उद्देश असावा कदाचित.

थंडी असते यावेळी , आणि तीळ व गुळ हे दोन्ही पदार्थ उष्ण.... हे झालं सायन्स दृष्ट्या... पण खरंच किती माणसे जोडली जातात या तिळगुळाने...

संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी.. त्यादिवशी सुध्दा तीळ लावलेली भाकरी व वांग्याची भाजी असा थाटाचा बेत असतो.तिथे सुध्दा तीळ आलेच....

संक्रांतीला पक्वान्न म्हणून गुळपोळी करतात. त्यातही तीळ आलेच.. एकुण काय आपला स्नेह जोडता ठेवा !!

संक्रांतीला तीळगुळ म्हणजे लाडू करतात. ही अलीकडची पद्धत. पुर्वी तीळ चांगले भाजुन ते थोडे अर्धवट कुटायचे व त्यात खोबरेही भाजुन घालायचे व गुळ घालायचा. व ते चमच्याने प्रत्येकाच्या हातावर द्यायचे. आजही ही पध्दत गावात पहायला मिळते. असा तिळगुळ काळ्या तीळांचाही केला तर तो जास्त खमंग लागतो.

दुसरा वाटण्यासाठीचा पदार्थ म्हणजे हलवा.. तो तयार करणे अजिबात सोपी गोष्ट नाही. स्टोव्ह पेटवून, त्यावर परात ठेवायची. परातीत अगदी थोडेच तीळ घालायचे. त्यावर चमच्याने गरम गरम पाक घालायचा. हातानेच ते ढवळीत रहायचे. पाक सुकला की परत पाक घालायचा. हाताला घाम आला तर काटा ढळतो म्हणतात; म्हणून मग अधुन मधुन हातही स्वच्छ करायचे... पाकाचीही एक विशिष्ठ पध्दत. ती सगळ्यांनाच जमते असे नाही.. पाक झाला कीं त्यात दुध घालायचे.. ते फाटले की मग मळी काढायची - म्हणजे तो पाक एकदम स्वच्छ होतो, आणि हलवाही पांढरा शुभ्र होतो. 

या हलव्याच्या बाबतीत माझी एक लहानपणीची आठवण आहे. माझी मोठी बहिण हलवा खूप छान करायची. त्या एवढ्याश्या तीळावर हा सुंदर काटा कसा येतो, हे पहाण्याची आमची उत्सुकता शिगेला गेलेली असायची. मी आणि माझा भाऊ अगदी त्या परातीत डोकावायला पुढे पुढे करायचो.. त्या दिवशीही असेच आम्ही तू पुढे, कां मी पुढे, करीत होतो. पाकाचे भांडेही जवळच स्टुलावर ठेवले होते. आणि......तो गरम उकळता पाक, आमच्या दोघांच्याही पायावर सांडला. आमची जी परिस्थिती झाली! अजूनही आठवणीने काटा येतो... पण गंमत अशी कीं माझे वडिल लगेच, धावत गोठ्यात गेले व गाईचे शेण घेऊन आले आणि आमच्या दोघांच्याही पायावर त्यांनी ते शेण थापले. आणि काय आश्चर्य क्षणातच होणारी आग थांबली.. काही दिवसां नंतर ती जखमही भरून आली... पण ती आठवण मात्र कायमची मनावर कोरली गेली.

माझ्या मुलाच्या तिळवणाच्या वेळी मी पण हलवा करून, त्याचे दागिने केले होते. त्यावेळी हलवा घरीच करायची पद्धत. मला व माझ्या मोठ्या मुलाला सासुबाईंनीच स्वतः हलवा करून दागिने केले होते.. त्या एकदम सगळ्यातच तरबेज होत्या.. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे होता.. म्हणूनच धाकट्याच्या वेळी मी स्वतः ते करु शकले, याचा निश्चितच आनंद आहे.

प्रेम द्यावे , प्रेम घ्यावे.... एका तिळाच्या लाडवात  केवढी ही माणसे जोडण्याची ताकद असते..पण आजकालच्या या धावपळीच्या जमान्यात या सार्‍याचे महत्व हळूहळू कमी होत चालले आहे.  रूढी परंपरा संपत चालल्या आहेत.  याचे दुःख तर होतेच; पण कालाय तस्मेन् नमः .....

सौ. मनिषा म. पटवर्धन

No comments:

Post a Comment