सकाळी
फिरायला निघालो आणि सहज म्हणून जरा वेगळा रस्ता घेतला. मेन रोड वर एक मोठा
अपार्टमेंट कॉम्प्लेक्स आहे तिथून जाताना एक बस थांबली आणि बायकांचा मोठा घोळका
बाहेर पडला. काही हसत खिदळत, काही
एकेकट्या, काही कुजबुजत म्हणजे एकूण सगळे नेहेमीप्रमाणेच. सगळ्याजणी त्या अपार्टमेंटकडे निघाल्या होत्या.
मग डोक्यात ट्यूब पेटली. त्या सगळ्याजणी 'कामवाल्या' बायका होत्या.
मेन गेट
वरच्या watchman बरोबर
हुज्जत घालून / सह्या करून त्या आता
"आपापल्या" घऱी जाणार होत्या. मनात विचार आला यांनी बेल वाजवून
दार उघडल्यावर यांचं स्वागत वरकरणी कसंही झालं तरी त्या घरची मालकीण मनोमन नि:श्वास टाकणार हे नक्की. त्या
दिवसापुरती तरी धुणं ,भांडी, केरवारा, मुलाला आणा पोचवायची
सोय झाली हे समजून ती मायमाऊली "आलीस बाई! धन्यवाद" असं नक्की म्हणणार
ह्याची खात्री. अर्थात पुढच्याच दोन मिनिटात, हे सगळं विसरून ती कुठल्यातरी
ऑफिसमध्ये 'कर्तबगार, उभरती" वगैरे
म्हणवली जाणारी आजच्या काळातली मुलगी आपल्या कामात व्यस्त होणार हेही नक्की.
आज कुठल्याही
मध्यमवर्गीय घरातली मुलगी शिकणारच हे खरं; त्याच बरोबर नोकरीधंद्यात मुलांच्या
खांद्याला खांदा लावून आपला ठसा उमटावयाला बघणार हे सुद्धा तितकंच खरं. पण एकदा संसार थाटला, की मुलींच्या
धडपडीत, घर
व्यवस्थित ठेवणे या जबाब्दारीचीही भर पडते. किमान भारतीय समाजपद्धतीत तरी मुलं या
अपेक्षेतून सोयीस्करपणे सुटतात. मग पुढे
मुल घरात बागडायला लागलं कि आता घर बघू का मूल बघू का माझी करिअर सांभाळू या पेचात
मुलगी अडकते. कामवाली बाईच मग तिची तारणहार होते. आठवडाभर नवरा घरी नसला तरी बिघडत
नाही ("तेवढीच मेली शांतता डोक्याला") पण कामवाल्या बाईला कामावर यायला
झालेला १५ मिनिट उशीर या शेरणीच्या हृदयाचा ठोका चुकवून जातो.
मुलगी नवऱ्याशी
नाही तर तिच्या घराशी लग्न करते असं पूर्वी म्हणायचे. आता मुलगी नवरा आणि कामवाली
बाई यांच्याशी लग्न करते. या दोघांच्या तऱ्हेवाईकपणाला तिला सांभाळावं लागतं.
त्यातल्या त्यात नवऱ्याला हुडुत फूडूत करता येतं.किंबहुना त्या प्राण्याला ताळ्यावर ठेवण्याचं ते एक उत्तम हत्यार असतं ! पण
कामवाल्या बाईची मर्जी म्हणजे तळहातावरचा फोड! तिथे फक्त साम आणि दाम एवढंच. दंड
आणि भेद यांना थारा नाही. तिच्या क्वचित मनमानीपणाला अपील नाही; आर्जव आणि अंतर्गत
संतापयुक्त नक्राश्रू इतपतच धारदार शस्त्र वापरायचं धाडस या ऑफिसमध्ये सगळ्यांना
धारेवर धरणाऱ्या झाशीच्या राणीकडे असतं.
विनोदाचा भाग
सोडा पण जर भट्टी जमली तर ही कामवाली एक सुरेख मैत्रीण होऊ शकते. घराची किल्ली
मग तिच्याकडे बिनधास्त दिली जाते. गावाहून परतायच्या दिवशी सकाळी दूध / ब्रेड आणून ठेव असं हक्काने सांगितले जातं. तिला बँकेचे व्यवहार शिकवले जातात तीही आपल्या 'बाईचा' reference
देत बँकेत खातं उघडायला भीत नाही. आणि याच बाईच्या
असलेल्या पाठींब्याच्या जोरावर आत्मविश्वासाने शहरात रुळून जाते, स्वतःचं स्वतंत्र जग निर्माण करते. क्वचित कधी मग
एकमेकींची सुखदुःखं वाटली जातात. कामवाल्या बाईच्या घरच्या हळदीकुंकूवाला
फ्लॅटवालीला आमंत्रण येतं आणि 'चाळीत कसं बाई जायचं ' असं
एरवी म्हणणारी ही ऑफिसर बाईपण विनासंकोच त्या समारंभाला उपस्थित राहून
त्याची खरोखरच शान वाढवते.
किती सुरेख
नातं दोन बायकांचं, एकमेकींच्या
गरजांवर आधारलेलं पण गाढ विश्वासाचं, जमून आलं तर दोघीनाही आपापल्या
आयुष्यात भरारी घ्यायला बळ देणारं. महिला दिनाचा भाव प्रत्यक्षात आणणारं ...
अभिजित
टोणगांवकर
No comments:
Post a Comment