तिळगुळ व मैत्री – माया टांकसाळे, नागपूर


एकमेकात स्वतःचे अस्तित्व विसरून मिसळून जाणे, एकरूप होणे म्हणजे मैत्री. तिळगुळ व मैत्री यांचेही असेच काहीसे स्वरूप आहे. म्हणजे बघा, तिळगुळ स्नेहाचे प्रतीक आहे व मैत्रीतही स्नेहच महत्वाचा आहे. तीळ हा आकाराने लहानचवीला हवाहवासा वाटणारा तसेच तो गोड, उष्णधर्मी, तैल / स्निग्धता पूर्ण असा आहे. पण केव्हा? जेंव्हा त्या तिळाला crush करू, त्यातून तेल निघेपर्यंत! गुळ हा पण उष्णधर्मी गोडीने परिपूर्ण  व प्रकृती ला उत्तम असा आहे.  तिळगुळ म्हणजे दोन मित्रांनी  सौहार्द्रपूर्ण एकमेकात सरमिसळून जाणे. मैत्रीचे सुद्धा तसेच आहे. एकमेकांबद्दल जीवाला लागलेली ओढ, आपुलकी, प्रेम असेल तरच मैत्री होते व ती टिकून राहते.

मैत्री ही माणूस जस्सा असेल म्हणजे त्या व्यक्तीच्या  गुणावगुणांसहीत त्याला तसेच्या तसे  स्वीकारणे होय. तोच खरा मित्र! म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन तिळगुळासारखा !

तीळ आधी भाजायचे, मग कुटायचे, गूळ ही किसून घ्यायचा आणि मग दोन्ही अगदी एकरूप करून घेऊन मग त्यात काजू, खोबऱ्याचा पांढरा शुभ्र किस तसेच चारोळी टाकून  त्याचे  लिंबाच्या आकाराचे लाडू बांधायचे. देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग वडील मंडळींना द्यायचा.

आपल्या पेक्षा लहान व्यक्तींना देताना  पुणेकरां सारखा एक बारीक चिमटा ही काढायचा, " तिळगुळ घ्या गोड गोड बोला" ! तीळ सांडू नका आणि भांडू नका. असाही कान पिळायचा  ही कान धरण्याची, हळूच चिमटा काढायची महाराष्ट्रीयन पद्धत अस्सल बरं का!

खऱ्या मैत्रितही हा महाराष्ट्रीयन तिळगुळ अगदी फिट्ट बसतो. मैत्री होताना, वयाचे, अनुभवाचे,शिक्षणाचे लिंगाचे,व्यवसायाचे,नात्यागोत्याचे कोणतेही बंधन नसते. खरा मित्र हा योग्य वेळी कान पिळणारा, संकट काळी मदत करणारा, योग्य सल्ला देणारा,विपरीत परिस्थितीतून बाहेर काढणारा, समज देणारा आणि वेळ प्रसंगी धीर देऊन खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा असा असावा. जर असा मित्र तुम्हाला मिळाला असेल तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात.

धर्म, जात, नाते गोते,ह्या कशाचे बंधन नसते मैत्रीत. दोन मित्रांची मैत्री ही अगदी तीळगुळाच्या  लाडवा सारखी! एकमेकात स्वतःचे अस्तित्व विसरून जीवाच्या आकांताने घट्ट धरून, गोडी प्रदान करणारी, रसनेला हवा हवीशी वाटणारी!

पण हाच मित्र जर तुमचा उपयोग स्वतःच्या  स्वार्थासाठी करून घेत असेल तर मात्र तो तुमचा सहकारी असेल, मित्र नाही. अशी मैत्री ही त्याने त्याच्या तात्कालिक फायद्यासाठी केलेली असते. स्वतःचा फायदा झाल्यावर तो तुम्हाला विसरूनही जाईल - तीळ पापडीसारखा! म्हणजे संपूर्ण तीळ, दाणे, डाळ गुळाच्या पाकात एकत्र तर आहेत पण तरीही स्वतःचे अस्तित्व टिकवून आहेत.  ते आपले भिन्नपण वेळप्रसंगी दाखवतात!

मैत्रीचा तिसरा प्रकार हा गजक सारखा!  दिसायला ,चवीला मधूर. काजू बदामानी पौष्टिक गुणधर्म वाढवलेला आणि एकमेकांच्या आधाराने संयुक्तिक आनंद देणारा !  गजकासारखी मैत्री असणारे  मित्र हा समान धर्मी स्वतःचे अस्तित्व एकमेकांना देऊन तद्रूप होणारा.तत्व व मैत्री असून गोडी टिकवून धरणारा  सज्जन मित्र. हा मैत्रीचा गजक प्रकार अजब व अफलातून आहे. व्यवहार, प्रेम, मित्रता, स्निग्धता आणि तत्व यांचे योग्य प्रमाणतील मिश्रण असलेला व गोडी टिकवून ठेवणारा गजक मैत्रीचा प्रकार अजबच आणि अफलातून आहे! तुम्हीही चाखून पहा, पारखून घ्या आणि आनंद लुटा! 

तिळगुळ हा हिवाळ्यात पौष्टिक असतो. हवेतील गारवा शुष्कता मोठ्या प्रमाणावर वाढलेली असते. अशावेळी  हा तिळगुळ स्निग्धता, गोडवा व उष्णता देऊन रसनेला तृप्त करत असतो. आरोग्य उत्तम  ठेवायला मदत करत असतो. पण त्यासाठी तीळ व गूळ ह्या दोघांनाही एकरूप व्हावे लागते.  तशीच मैत्री ही दोघांची वा अनेकांची असली तरी एकमेकांना घट्ट धरून एकमेकांशी एकरूप होता आले पाहिजे. 

शेवटी एकाच म्हणावेसे वाटते:
कोणा कशी कळावी तीळगुळात काय गोडी
ही खूणगाठ मैत्रीची रसनेशी बांधलेली ||

माया टांकसाळे, नागपूर

No comments:

Post a Comment