मार्च २०२० पासून जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला, तसतसे आपण सगळे जण लॉकडाऊन मध्ये अडकत गेलो. फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहिल्या. कार्यालये, शाळा सगळे काही घरूनच चालू झाले. अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले. आज या सगळ्याला वर्ष होऊन गेले तरी ही आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकलो नाही. उलटपक्षी परिस्थिती आणखीनच खराब होऊ लागली आहे. या सगळ्याचा विचार करताना आपण डॉक्टर, नर्सेस, अत्यावश्यक सेवा पुरवणारे लोक, अनेक सेवाभावी संस्था यांच्याबद्दल कुठे ना कुठे कृतज्ञता व्यक्त करतोच, पण एक महत्वाचा घटक बर्याचदा राहून जातो तो म्हणजे पोलीस.
गेल्या संपूर्ण वर्षभरात वैद्यकीय सेवांच्या बरोबरीने सर्वाधिक काम करणारा वर्ग म्हणजे पोलीस. लॉकडाऊनमुळे प्रचंड संख्येने स्थलांतर करणार्या जनतेमुळे विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था सांभाळणे आणि या कठीण काळात देखील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे अत्यंत महत्वाचे काम करणारे पोलीस. पण शेवटी ती देखील माणसेच आहेत, इतक्या विषम परिस्थितीत आपले कर्तव्य बजावताना पोलीसांवर शारिरीक, मानसिक काय-काय परिणाम होत असतील याचा विचार खूप कमी जणांनी केला असेल. असा विचार मनात येऊन त्याचा पाठपुरावा करून ते परिणाम जाणून घेण्यासाठीच ‘मित्रमंडळ बेंगलुरू’ ने बेंगलुरू चे पोलीस महासंचालक श्री.प्रवीण सूद यांच्याशी मुलाखतीचा कार्यक्रम ठरवला. कार्यक्रम करणार्या ‘मित्रमंडळ’ ची भाषा जरी मराठी असली तरी इतर अमराठी भाषिकांपर्यंत तो पोहोचावा, तसेच पोलिसांचे कार्य जास्तीत जास्त लोकांना समजावे या उद्देशाने ही मुलाखत इंग्रजीत घेण्यात आली. ‘Effects of pandemic on the police & infrastructure’ हे शीर्षकच या विषयाची खोली समजण्यास पुरेसे आहे.
‘मित्रमंडळ बेंगलुरू’ च्या आघाडीच्या कार्यकर्त्या सौ. गंधाली सेवक यांनी आपल्या ओघवत्या आणि खुसखुशीत शैलीत पोलीस महासंचालक श्री.प्रवीण सूद यांची ओळख करून दिली. श्री. सूद यांची मुलाखत घेण्यासाठी श्री. सारंग गाडगीळ आपली प्रश्नमंजुषा घेऊन सज्ज होते. आपल्या मुद्देसूद आणि नेमक्या प्रश्नांनी त्यांनी श्री. सूद यांना बोलते केले.
श्री.प्रवीण सूद Director General and Inspector General of Police , Karnataka State. |
संपूर्ण कोरोना काळामध्ये पोलीसांनी अनेक हाल-अपेष्टा सहन करून नागरिकांना सेवा पुरवल्या आणि कायदा सुव्यवस्था राखण्यात कसे यश मिळवले याचा श्री. सूद यांनी सविस्तर आढावा घेतला. श्री. गाडगीळ तसेच दर्शकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी पोलीसांना, त्यांच्या कुटुंबियाना अप्राप्य असलेल्या मुलभूत सुविधांकडे ही लक्ष वेधले. जगभरात सर्व नोकरदारांना मिळत असलेली साप्ताहिक सुटी, सणांच्या सुट्ट्या या पोलीसांना कधीच नसतात हे ऐकूनच मन द्रवले.
दररोज १२-१४ तास रस्त्या-रस्त्यावर उभे राहून आपली ड्यूटी करताना कित्येकदा पोलीसांना निसर्गाच्या हाकेला देखील ओ देता येत नाही. यात महिला पोलीसही आल्या. उन्हाळा, पावसाळा, वाढते प्रदूषण याबरोबरच राजकारण्यांचा दबाव आणि सामान्य जनतेचा क्षोभ या सगळ्याला तोंड देत पोलीस वर्षानुवर्षे आपली ड्यूटी बजावत असतात. कोरोना काळात तर लोकांच्या अतिसंपर्कामुळे कित्येक पोलीस संक्रमित झाले आणि कित्येक मृत्युमुखी ही पडले. आपल्या देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलीसांची संख्या कितीतरी कमी आहे, त्यामुळे एकूणच व्यवस्थेवरचा ताण खूप वाढतो. पोलीसांशी निगडीत अशा अनेक मुद्यांना स्पर्श करीत श्री.सूद यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम रंगला होता.
आपले बोलणे संपवताना श्री.सूद यांनी सामान्य नागरिकांनी देखील आपल्या
जबाबदार्या ओळखून नियमांचे पालन केले तर पोलीस व्यवस्थेवरचा ताण बराच कमी होईल
अशी अपेक्षा व्यक्त केली.
मंडळी, आपल्या ह्या कार्यक्रमाची लिंक ‘मित्रमंडळ बेंगलुरू’ च्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे. तेव्हा भारताचे सुजाण नागरिक म्हणून आपल्या कर्तव्य आणि जबाबदार्यांची जाणीव करून देणारा हा कार्यक्रम नक्की पहा.
https://www.youtube.com/watch?v=5cMv2lwIOaQ
मानसी नाईक
No comments:
Post a Comment