चंद्राची आणि माझी ओळख तर लहानपणापासूनचीच आहे.
बालभारतीतल्या कवितातून साहित्यिक
चंद्र भेटायचा. चंद्रावरचा ससा शोधतांना डोळे मिटू लागायचे.
रामानं चंद्र हवा असल्याचा हट्ट
धरल्याची गोष्ट आई सांगत असे, तर भूगोलाच्या पुस्तकात चंद्रावर खड्डे असल्याची
माहिती मिळते. ....चंद्रावर मानवाने टाकलेले पाऊल.....ही बातमी या सगळ्यातील काव्यात्मकताच
घालवून टाकत असे. पण अजूनही चंद्राची आणि माझी कधी आमने-सामने भेट झाली नव्हती.
चंद्राबद्दलच्या कवी कल्पना
वाचल्या होत्या. चंद्राच्या साक्षीने फुलणारं प्रेम वाचलं होतं. चंद्रावरची गाणी
ऐकली होती. चंद्राशी ओळख तर पक्की झाली होती.
पौर्णिमेच्या रात्री अभावितपणे
आकाशाकडे लक्ष जात असे. अमावस्येच्या रात्री, गडद अंधार, चंद्राविना सुनं असणारं
आकाश जाणवत असे.
पण एकदा अचानक चंद्राची आणि माझी
भेट झाली.....एका उंच इमारतीच्या पंधराव्या/ सोळाव्या मजल्यावरून.....काम संपलं
आणि सहज बाहेर लक्ष गेलं तो नजरे समोर पिवळसर लखलखीत चंद्रबिंब झळाळत होतं. हा
कोणता महिना आहे याचा मनातल्या मनात हिशोब सुरु झाला. नुकताच गुढीपाडवा झालाय,
म्हणजे चैत्रातली पौर्णिमा. वसंतातली पौर्णिमा. म्हणूनच चंद्रबिंब इतकं देखणं दिसत
होतं. कामाचा जो काही ताण होता तो क्षणात नाहीसा झाला. त्यादिवशी
खऱ्या अर्थाने माझी चंद्राशी भेट झाली.
त्यानंतर अनेकदा असा कुठेतरी चंद्र भेटत राहिला. पहाटे
फिरायला निघाल्यावर पौर्णिमेच्या आसपास सूर्य वर येईपर्यंत चंद्र सोबतीला असतोच.
ऐन थंडीच्या मोसमात कौसानीला गेलो असतांना, रात्री जेवून हॉटेलवर मुक्कामाला परत
जात होतो. थंडीच्या रात्रीचा अंधार असून देखील रस्ता छान उजळलेला होता, म्हणून
आकाशाकडे लक्ष गेलं, तर माथ्यावर चंद्र....आम्हांला सोबत करत आमच्याबरोबर येत होता.
जणू परक्या प्रदेशात वाट चुकू नये म्हणून आम्हांला वाट दाखवीत आमच्याबरोबर चालला
होता. तर बद्रीनाथला एकाच वेळी पूर्वेकडे सूर्य उगवताना आणि पश्चिमेकडे चंद्र
मावळताना बघितला. बारा संसारी न भेटणारे हे मित्र जणू आपल्या वाटेने जाण्याआधी एकमेकांची
वाट बघतच थांबले असावेत.
अजून एकदा असाच अवचित् चंद्र भेटला आणि आयुष्यभर पुरून उरेल
अशी आठवण देऊन गेला. काही कामानिमित्त आग्र्याला जाणं झालं होतं. हा तो काळ होता,
जेव्हा ताजमहालला भेट देणं आजच्या इतकं जिकिरीचं नव्हतं. आमच्याबरोबर काही स्थानिक
लोक होते. त्यांच्या सांगण्यावरून पहाटेच फिरत फिरत ताजपर्यंत पोहोचलो, ताजचं
दर्शन घेतलं आणि परत फिरतांना लक्षात आलं की त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती.
असा मणिकांचन योग मुद्दाम जुळवून आणू म्हटलं तरी जुळणं कठीण. मग ही संधी सोडणे
अशक्यच होते. त्यावेळी नेहमी जितकी प्रवेश फी असे तितक्याच फी मध्ये रात्रीही जाता
येत असे. चंद्र ताजच्या बरोबर वर आला. ते विलोभनीय दृश्य आजही तसंच नजरेसमोर उभं
रहातं. सोनेरी पिवळ्या चांदण्यात न्हायलेल्या ताजचं झळाळतं सौंदर्य केवळ
शब्दातीत!
त्याच्याकडे आपली नजर कधी जातेय याची वाट बघत, आपल्यासाठी
त्याच जागेवर रेंगाळणारा..... झाडाआड लपून, आपल्याकडे बघणारा.....समुद्राच्या
लाटांवर हिंदोळे घेत मजेत बागडणारा.....नदीच्या पाण्यावर चंदेरी आभा पसरवत आपला
देखणेपणा मिरवणारा..... गर्द झाडीत चंदेरी कवडशाचा खेळ खेळणारा......उत्तुंग
डोंगरमाथ्यावरून पृथ्वीला आपल्या शीतल चांदण्यान शांतवणारा......ही चंद्राची वेगवेगळ्या
भेटीतली वेगळी वेगळी रूपं मन मोहवून टाकतात.....त्याच्याशी असणारे आपले नाते आणखी
घट्ट करतात. त्याच्या पुढच्या भेटीची आस जागती ठेवतात.......
मनीषा सोमण
No comments:
Post a Comment