"गोड आहेत ना दादा साखरेच्या गाठी ?"असं मी तरी
कसं विचारलं कुणास ठाऊक!
हातगाडीला टांगलेल्या आडव्या काठीवर, उभ्यानं लटकणारा साखरेच्या गाठीचा शेवटचा हार त्यानं खसकन ओढला ...
गेले वर्षभर न भरलेल्या शाळेच्या वहीच्या रद्दीतल्या कागदाच्या पुडीत बांधून माझ्या हातात देत म्हणाला ...
"आयुष्याचीच चव गेलीय दादा ...
जीभेच्या चवीचं काय घेऊन बसलात?"
मी थिजलो ...
साखरेच्या पाकासारखा ...
आजकाल, मला माणसं ओळखता कशी येईनात?
त्यांनी चेहऱ्यावर लावलेल्या मास्कमुळे? की,
माझ्या चेहऱ्यावर लावलेल्या मास्कमधून बाहेर पडणाऱ्या माझ्याच श्वासानी......
माझ्याच चष्म्यावर साठलेल्या धुकट वाफेमुळे?
सारेच प्रश्न ....
गुढी च्या काठ्यांसारखे ....
उंचच उंच ....
आणि त्या काठ्यांवर द्विधा अवस्थेत लोंबकाळणारे ...
लॉकडाऊन करायचं ...."किंबहुना" करायचं की नाही?
लॉक डाऊन होणार म्हणून ...
श्वासही घेता येणार नाही अशा माणसांच्या उसळलेल्या तुफान गर्दीत....
मरण स्वस्त झालंय की मरणं?
आणि लॉकडाऊन लागल्यावर होणाऱ्या भकास , उदास बाजारात ....
आता कसलं जगणं?
अशा प्रश्नांची उत्तरं सापडत नाही...
वर्षभर केवळ कोमट पाणी पिऊन जगणारे आम्ही....
"न मिळणारी रोटी", "अंगावरचा फाटका कपडा" आणि
"उन्हातल्या स्वप्नात बांधलेल्या मकाना" सोबत शोधतो आहोत आता ....
ऑक्सिमीटर .. व्हेंटिलेटर आणि रेमेडिसिवरही ....
पुडीतल्या साखरेच्या गाठीचा हार बोटाच्या चिमटीत पकडून
माझ्या पोरानं सहज विचारलं ......
"पपा, ह्या गाठींवर पण 'सॅनिटायझर स्प्रे' मारायचा?"
No comments:
Post a Comment