चुकीचं काहीतरी वाचतोय असे वाटले ना? किंवा
typo mistake आहे की काय... कारण वाचाल तर वाचाल हे
सुभाषित माहित आहे पण चावाल तर वाचाल असे नसेल ऐकले कुठे...
अहो हे, मलाच सुचलं, काल
एका मैत्रिणीशी गप्पा मारताना.. आम्ही वजन कमी करणे या फेव्हरीट विषयावर रंगून
बोलत होतो.. म्हणजे वर्षानुवर्ष यावर आम्ही आणि बहुतेक सगळ्याच बोलत असतात.. मी
काही डॉक्टर नाही पण मी तिला काही वैद्यकीय फू.स. देत होते.. फू. स. म्हणजे फुकट सल्ला..त्यावरून
मला थोडं लिहावेसे वाटले.
आपल्या अवती भवती आणि माहितीत काही अती कष्टाळू आणि सोशिक माणसं असतात आणि
काही आळशी कामचुकार लोक असतात. तसंच आपल्या शरीर संस्थेत ही असतं.. अगदी डाव्या
उजव्या हाताचंच बघा.. आपण उजवा हात इतका वापरतो आणि डावा हात फारच गरज पडली तर
कामाला पुढे येतो.. साध्या भाजीच्या पिशव्या दोन हातात धरल्या तर थोड्याच वेळात
डावा हात, पिशवी उजव्या हातात देतो आणि उजवा हात बिचारा दोन दोन
पिशव्याचं वजन उचलतो. डावा हात मुक्त.. कसली तोशिस म्हणून नाही..
आयुष्य भर कामाची अशी ही विषम विभागणी चालू असते आणि कधीतरी धडपडून एखादे
वेळेला हात गळ्यात येतो.. तेव्हाही लोक विचारतात डावा की उजवा.. डावा असेल तर
सगळ्यांना हायसे वाटते कारण उजवा हात सगळं करू शकतो.. गृहीत धरलेलाच असतो
सगळ्यांनी त्याला.. पण उजवा हात मोडला तर कधी आडवी काठी उभी न केलेल्या डाव्या हाताकडून
काडीचीही अपेक्षा करता येत नाही.. आयुष्यात कधी काही केलेलंच नाही.. आयत्या वेळेला
काय करणार...
तशीच अजून एक विषम श्रम विभागणी वर्षानुवर्षे चालू असते. ती म्हणजे आपले
दात आणि आपल्या पोटातल्या पचन संस्थेची.. इथे scene आयजी
च्या जीवावर बायजी उदार असा असतो. म्हणजे.. दात, जीभ,
हात आणि ओठ यांचं साटंलोटं असतं.. मनाला आलं की हात तोंडात
आवडलेल्या वस्तू टाकतात.. जीभ मस्त चवीने खुळावते, दात जरासं
इकडे तिकडे करून काम केल्यासारखं दाखवून चावलं-नं-चावल्या सारखं करतात आणि दात आणि
जीभ बिनधास्त आलेला घास क्षणार्धात घशा खाली लोटून देतात.. तोवर हात ओठाशी दुसरा
घास घेऊन ताटकळत असतो..
आत आतडी तुटत असतात ' अरे मेल्यांनो थोडं
चावून तरी पाठवा.. कसलं काय.. भाताची शितं जशीच्या तशी.. पोळीचे म्हणायला एकाचे
दोन तीन तुकडे झालेले.. बाकी पिझ्झा पास्ता नूडल ची गरगट तर चिखलासारखी एका मागून
एक जठरात जमा होतेय.. अरे हळू हळू.. काय गिळताय बकबका.. आमचा थोडा विचार करा की..
छे! पचन संस्थेला विचारतं कोण.. आम्ही dump करत जाणार.. किती,काय, कसं फालतू प्रश्न विचारायचे नाहीत.. पचवायचं
तुमचं काम आहे... आम्ही पोट फुटेपर्यंत खाणार... अरेरे.. बिचारी आतडी आणि जठर..
किती अन्याय करतो त्यांच्यावर आपण.. खरं तर आपल्याला लहानपणी शिकवलेलं असत एक घास
३२ वेळा चावून खायचा.. पण वेळ कोणाला आहे एवढा? त्यामुळे ती
सवयच नाही.. त्यामुळे वर्षानुवर्ष दातांना फारसं काही काम नाही.. पोटावर मात्र
अन्याय..
खरं तर आपली शरीर संस्था हे एक grand design आहे.. अत्यंत विचारपूर्वक घडवल्यासारखं..अन्नाचा घास चावून तोंडात नीट
बारीक व्हायला हवा त्यात. त्यात तोंडात स्त्रावणारी पाचक द्रव्ये मिसळायला हवीत
आणि मगच तो घास पुढे घशाखाली पोटात जायला हवा. मग आपल्या पचन संस्थेवरचा भार थोडा
कमी होईल. अन्न नीट पचेल, अंगी लागेल, पोटाची
दुखणी उद्भवणार नाहीत.. हे श्रम विभाजन फार महत्वाचं आहे.. अन्न जर नीट चावून
खाल्लं तर आपोआपच कमी किंवा हवं तितकंच खाल्लं जातं.. Over eating होत नाही.. शिवाय जेवल्यानंतर पोटाला जो जडपणा जाणवतो तो ही जाणवत नाही...
माझ्या पाणी शुद्धीकरणाच्या व्यवसायात आम्ही मुख्य प्रक्रिये आधी pre treatment करतो.. पाण्याची pre treatment जितकी चांगली तितकी त्या नंतर असणाऱ्या मुख्य प्रक्रिया करणाऱ्या महागड्या
उपकारणांचे आयुष्य अधिक वाढते.. आणि performance ही चांगला
मिळतो.. चावणे ही पचन क्रियेतली pre treatment आहे.. ही आपण ती जितकी चांगली करू तितकी
आपल्या पचन संस्थेचे, आपल्या पोटाचे आपल्याला जास्तीत जास्त
विना तक्रार सहकार्य मिळेल... कामाची
सवय नसल्याने दात थोडे तक्रार करतील काही दिवस पण पोट मात्र पोटभर दुआ देतील
" आयुष्यमान भव" "आरोग्यवान भव
"!
कळलं आता? चावाल तर वाचाल 😍
अलका देशपांडे
No comments:
Post a Comment