मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात लघुकला आणि वस्तुंचे प्रदर्शन होते. तिथे समोरच सुंदर बाहुलीचं घर ठेवलं होतं. त्या वस्तू काही शतकांपूर्वीच्या युरोपातील असल्याने ते घरही त्या काळातल्या युरोपातल्या घरांच्या धाटणीचं होतं. त्या इतकुश्या घरातली प्रत्येक वस्तू अगदी ठसठशीतपणे दिसत होती. फायर प्लेस, स्वयंपाकघरातली शेगडी, भांडी सगळ्यातून त्या काळात, युरोपातल्या घरात कशा प्रकारच्या वस्तू वापरल्या जात असाव्यात हे तर समजत होते.
ते बघता बघता सहज लहानपणी खेळलेला भातुकलीचा खेळ आठवला. मे महिन्याच्या सुट्टीत आजीकडे जात असे तेव्हा आजूबाजूला माझ्या वयाच्या खूप मुली होत्या. दुपारी भातुकलीचा कार्यक्रम असेच. आमचं घर सगळ्यात मोठं असल्याने आमच्या गच्चीत भातुकली मांडत असू. सगळ्याजणी घरातून खाऊ आणि आपापली भातुकलीची खेळणी आणत. कोणाची भातुकली स्टीलची असे, कोणाची पितळ्याची तर कोणाची लाकडाची. गॅसची शेगडी-सिलेंडर, स्टोव्ह, चूल सगळे प्रकार असत त्यात. भातुकली कशी का असेना त्यामुळे खेळण्यात काही फरक पडत नसे.
पोहे, चुरमुरे, शेंगदाणे, चणे, गूळ हा आमचा खाऊ. यातून पंचपक्वानांचा स्वयंपाक करून घरातल्यांना खाऊ घालण्यातला आनंद काही वेगळाच असे. फक्त स्वयंपाकच नाही करायचा तर आई, आजी करते तशी घरातली सगळी कामंही करत असू. राखेने बंब आणि इतर पितळ्याची भांडी घासायची. इतकुशा घंगाळ्यात आणि बादलीत पाणी भरून ठेवायचं. बंबात पाणी भरून खाली छोट्या-छोट्या काटक्यांचं सरपण गोळा करून बंब पेटवायचा. मजा येत असे खरी, पण खेळ संपला की तिथे नुसता उकिरडा झालेला असे. आजीला ते सगळं रामायण स्वच्छ करून घ्यावं लागत असे. तरीही इतका पसारा करायचा असेल तर खेळू नका असं ती कधीच म्हणाली नाही.
जरा मोठं झाल्यावर आम्ही खरी भातुकली ही खेळलो होतो. आमच्यातल्या त्यातल्या त्यात मोठ्या मुलींनी खऱ्या स्वयंपाकाची जबाबदारी घेतली होती आणि आम्ही त्यांच्या असिस्टंट. पण त्यात भारी काम करावं लागलं असल्याने तसल्या फंदात परत पडलो नाही. एका म्युझियममध्ये, बहुधा सालारजंग मधे असावं, तिथे इंग्रज किंवा पोर्तुगीझ काळातलं खरं बाहुलीचं घर बघितलं होतं. छोटी मुलं वाकून जाऊ शकतील अशा त्या घरात जाऊन भातुकली खेळली जात असे हे ऐकल्यावर आमच्या त्या लहानपणच्या प्रयोगाची आठवण झाली.
कालांतराने भातुकली खेळायचे दिवस संपले. ती भातुकलीची खेळणी शोकेसमधे शोभेसाठी मांडली गेली. तरी मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात भातुकलीचं स्थान मात्र अबाधित होतं. आजही कुठे कधी भातुकलीची खेळणी बघितली की परत त्या आठवणी येतातच. आमच्या एका ओळखींच्याकडे चांदीची भातुकलीची खेळणी बघितली होती. अगदी पोळपाट-लाटणं, बंब, स्टोव्ह सकट. त्या खेळण्याची त्यांनी आता फ्रेम बनवून घेतली आहे. माझ्या जपानला राहणाऱ्या मैत्रिणीने तिच्या लेकीसाठी इथून मुद्दाम लाकडी भातुकलीचा सेट नेला होता. एवढेच काय तर गुजरातला धोलाविरा या हडप्पा कालीन उत्खनन स्थानावर असलेल्या म्युझियममध्ये देखील टेराकोटा मधल्या चूल बोळक्यांचे अवशेष बघितले होते.
पार मोहेंजोदारो-हडाप्पा काळापासून आजपर्यंत जगभरात, भातुकलीचा क्रमांक नक्कीच वरचा लागेल. कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीमधे इवली-इवली चूल-बोळकी घेऊन भातुकलीचा खेळ न खेळलेल्या मुली विरळाच असतील.
मनिषा सोमण
No comments:
Post a Comment