कोपनहेगेन डायरी - भाग ५

 

स्पष्टवक्ते, प्रामाणिक आणि चौकस डॅनिश


मागच्या भागात कोपनहेगेन शहराच्या ओळखी सोबतच तिथल्या लोकांबद्दलही मी थोडं लिहिलं होतं. या भागात अधिक विस्ताराने डॅनिश लोकांच्या स्वभावाविषयी लिहायचा प्रयत्न करते आहे.

 

डॅनिश लोकांचा मुख्य स्वभावगुण जो जाणवतो, तो म्हणजे स्पष्टवक्तेपणा. कुठलीही गोष्ट सरळ, सरळ तोंडावर सांगून टाकतात. गोल, गोल घुमवून, फिरवून बोलणे नाही. सरळ मुद्द्याला हात. कुठलीही गोष्ट, जशी त्यांची पद्धत- सवय आहे, तशीच झाली पाहिजे असा जरासा आग्रह किंवा अनेक वेळा हट्टीपणा देखील. विनोद देखील थोडासा खोचक, उपरोधिक किंवा तिरकस. एक उदाहरण देते; एकदा फिरायला गेलो असताना एक सायकलस्वार भरधाव सायकल चालवताना वळणावर जोरात पडला. त्याला मदत करायला धावलो, तर तो आम्हाला म्हणे "मदत नको, कमीतकमी मला पडल्याचा अनुभव तरी घेऊ द्या."



 

चौकश्या करणे आणि गप्पागोष्टी करणे हेही डॅनिश लोकांना फार आवडते. परदेशी लोकांबद्दल उत्सुकता असते यांना. साधे संवाद किंवा चौकश्या आवर्जून करतात. आम्हाला भेटलेल्या लोकांमध्ये अगदी प्लंबर, इलेक्ट्रिशियन पासून ते आनंदच्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांपर्यंत बर्‍याच जणांकडून हा अनुभव आला. आमच्या घरमालकांनी आम्हाला त्यांच्याकडे चहापानासाठी बोलवलं होतं. त्यावेळी तुम्ही कुठून आला, काय काम करता, मुलं आहेत का, किती, ती काय करतात, आई वडील कुठे असतात, घर कुठे आहे अशा अनेक चौकश्या त्यांनी आमच्याजवळ केल्या. एखादवेळी भोचकपणा वाटावा इतके चौकस. US आणि UK च्या लोकांच्या अनुभवापेक्षा हा अनुभव वेगळाच.  

बहुतांश डॅनिश लोक अत्यंत प्रामाणिक असतात. लोकांबद्दलची विश्वासार्हता खूपच आहे. मेट्रो आणि ट्रेन मध्ये शिरण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी कुठचाही अटकाव नाही. तुम्हीच प्रामाणिकपणे मशीनवर प्रवासाची नोंद करायची. सायकली, pram, कुत्री इतकंच काय मुलं देखील सोडुन लोक आरामात फिरत असतात. चोरीची भीती नाही. अतिशय निवांत जीवनशैली आहे यांची. निवांतपणा इतका की पैसा कमवण्यासाठी पण फार तास काम करणे हे यांच्या स्वभावात बसतच नाही. सकाळच्या वेळात कुठलंही रेस्टॉरंट उघडत नाही. अर्थात कॅफे आणि फास्ट फूड जॉइंट सोडून. सगळी रेस्टॉरंट्स साधारण दुपारी ३ वाजल्यापासून ते रात्री १० पर्यंत चालतात. खूपशी दुकाने देखील शनिवारी अर्धा वेळ तर रविवारी पूर्ण वेळ बंद असतात. सधन देश असल्यामुळेच बहुतेक यांना पैशांची फारशी फिकीर नसावी. 



डॅनिश लोक खूप कुटुंबाभिमुख असतात. कुटुंब आणि मित्र परिवाराबरोबर वेळ घालवणे हे त्यांना फार आवडते. वसंत ऋतुपासून दिवस मोठा होत जातो. आणि मग बिळांतून भराभर बाहेर पडावे तसे सगळेजण रस्त्यावर बाहेर पडताना दिसतात. ऊन निघेल त्यादिवशी संध्याकाळी ४ वाजल्यापासून कुटुंबीयांसोबत, मित्र-मैत्रिणींसोबत सहल करताना, हिरवळीवर किंवा board walk वर बसून खाणं-पिणं करताना दिसायला लागतात. वर्षातला फार थोडा काळ सूर्यदर्शन व ऊन मिळत असल्याने त्याचा पुरेपूर आनंद उपभोगायला सगळे आतुर असतात. 

दारू पिणे हा इथल्या संस्कृतीचा मोठा भाग आहे. त्यासाठी काळ, वेळ, जागा इ. कशाचीही बंधनं नाहीत. वयाच्या १६ व्या वर्षापासूनच बिअर आणि वाइन घ्यायची मुभा आहे. मुलं दुकानांमधूनही हे विकत घेऊ शकतात. फक्त hard drink पिणे किंवा विकत घेणे याला मात्र वयोमर्यादा कमीत कमी १८ वर्षे आहे. त्यामुळे कोवळी दिसणारी मुलं- मुली सहजपणे हातात दारूच्या बाटल्या घेऊन घोळक्याने फिरताना दिसतात तेव्हा माझ्यातल्या भारतीय आईला ते जरा वावगचं वाटतं. 

परदेशी लोकांबरोबर चटकन मैत्री करताना हे दिसत नाहीत. पण एकदा तशी मैत्री वाढली की मग घरी बोलवतात, आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रसंगी सामील करून घेतात. भारतीय लोकांविषयी, संस्कृतीविषयी तसे हे अनभिज्ञ आहेत. कारण इथे तशी भारतीय लोकांची संख्या देखील कमीच आहे. भारतीय जेवण मात्र इथेही सगळ्यांच्या आवडीचे  आहे. पण अलीकडच्या काळात मात्र भारत व भारतीयांविषयीचे कुतूहल इथे वाढत आहे. भारतातही डेन्मार्कची फारशी माहिती किंवा लोकप्रियता नाही. त्यातही बदल होतोय. अर्थात याला कारणीभूत मागच्या वर्षीची डॅनिश पंतप्रधानांची भारतभेट आणि आत्ता आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची कोपनहेगन भेट आहे हे निश्चित.



 आमच्या सुदैवाने श्री. मोदींना प्रत्यक्ष जवळून बघायची व ऐकायची संधी मिळाली. या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येक भारतीयाचा उत्साह, अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. श्री. मोदींचे भारतीय लोकांनी केलेले स्वागत पाहून डॅनिश पंतप्रधान बाई मेटे फ्रेड्रिकसन म्हणाल्या सुद्धा की, राजकारण्यांचे स्वागत कसे करावे हे भारतीयांनी डॅनिश जनतेला शिकवावे. एकंदरच तो अविस्मरणीय अनुभव होता....

 

नीना वैशंपायन



No comments:

Post a Comment