डॉ.- नीलिमा, मी आज अजून एका पालकांना रोहिणी ताई
(नाव बदलून) यांना इथे बोलावलं आहे. त्यांची मुलगी ईशा (नाव बदलून
) याच शाळेत शिकते. पण ती special child आहे. तिचे वय जरी १५ वर्षांचे असले तरी मानसिक
वय ८ वर्ष आहे. त्यांचे काही प्रश्न असल्यास त्याही विचारू शकतील. अशा पालकांना
समुपदेशनाचा कसा फायदा करून घेता येईल . हा आजचा मुख्य चर्चेचा विषय आहे.
डॉ. - रोहित (नाव बदलून) ६ वर्षाचा शाळेत जायला लागला.
शाळेतील शिक्षकांच्या असे लक्षात आले की रोहित वर्गात नुसता फिरत राहतो. पहिले एक दोन महिने शाळेत अजून रुळत
असेल अस वाटले. पण तो कुठलीही अभ्यास /ऍक्टिव्हिटी पूर्ण करत नाही, हे लक्षात आले. त्याची एका ठिकाणी बसण्याची क्षमता फारच
कमी आहे. इतर मुलांना त्रास देतो. शिक्षकांनी सांगितलेले ऐकत नाही. अशा अनेक तक्रारी यायला लागल्या.
मग मात्र शिक्षकांनी पालकांना बोलावून तो घरी कसा वागतो याचाही अंदाज
घेतला. तर घरीही तो अजिबात स्वस्थ नसतो. सारखी पळापळी, धावणं चालू असतं. आता शिक्षकांनी ही गोष्ट मुख्याध्यापकांच्या
कानावर घातली. त्यांनी रोहितच्या पालकांना बोलावून रोहितला एकदा
Clinical Psychologist कडे नेऊन तपासणी करावी असे सुचवले. जेंव्हा रिपोर्ट्स आले
तेंव्हा रोहितला ADHD (attention deficit hyperactivity disorder ) असल्याचे
निदान झाले. असे काही असू शकेल याची पालकांना काहीच कल्पना नव्हती. पण आता पुढे काय करायचे असा प्रश्न आला. पालकांनी, शाळेने, रोहितने सगळ्यांनीच सातत्याने केलेल्या मेहनतीला यश आले.
आज त्याच्यात खूप सुधारणा आहे.
डॉ.- पण यात बऱ्याच गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.
१)मुलाची वयानुसार अपेक्षित आणि प्रत्यक्ष असणारी प्रगती यातील दरी
२)मुलामध्ये कोणत्या प्रकारची उणीव/त्रुटी आहे. (शारीरिक/बौद्धिक / मानसिक)
३)योग्य त्या मानसिक चाचण्या वेळोवेळी करणं. त्याची तज्ञांकडून पूर्ण
माहिती करून घेणे.
४)दैनंदिन जीवनात लागणारे स्वयंनिर्भर/स्वावलंबी करणारे शिक्षण
५)शालेय शिक्षण- अभ्यासक्रम निवडीबाबत मार्गदर्शन
रोहिणी - आपल्या मुलात काही कमी आहे, हे स्वीकारणं फार कठीण असतं. घरी दारी
सगळ्यांचे प्रश्न? हा/ही अशी काय आहे? पुढे कसे होणार? सतत अशा चिंता /काळज्या भेडसावत असतात. प्रत्येक ठिकाणी एक संघर्ष असतो.
आपल्या आत आणि बाहेर सुद्धा. या परिस्थितीत पालकांची भूमिका काय असावी?
डॉ. - माझा अनुभव हेच सांगतो की पालकांना आपल्या मुलातील कमी/ त्रुटी आहे
या वास्तवाचा स्वीकार करण्यात बराच वेळ जातो. अथक प्रयत्न, सहनशीलता/ सहनशक्ती यांची खरी कसोटीची ही वेळ असते. यावेळी पालकांनीही समुपदेशन/ मार्गदर्शन घेतल्यास चांगला
उपयोग होतो. अशी परिस्थिती कशी हाताळावी, पुढे कोणत्या प्रकारचे अडथळे निर्माण
होऊ शकतात? याची पूर्वकल्पना आल्यामुळे मनाची तयारी होते. हे
सगळे मुलात नेमकी त्रुटी/ कमी काय आहे, मुलाचे वय काय आहे?
ह्याचा विचार करून ठरवता येतात.
पालकांनी लवकर स्वीकार केला तर मुलाला/मुलीला त्याचा फायदा होतो कारण लगेच
इंटरव्हेंशन/ थेरपी सुरु होते. मुलाला त्याच्या वयानुसार अपेक्षित असणारी प्रगती
आणि प्रत्यक्ष दिसणारी प्रगती यातील तफावत कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न लगेच
सुरु करता येतात. मुलगा/ मुलगी हे वयाने लहान असतील तेंव्हा मुलांना अशा थेरपी परिणामकारक ठरतात.(early intervention )
सर्वात महत्वाचे मुलाच्या intervention program मध्ये
general physician, थेरपिस्ट/ psychologist, टीचर्स ,
special educators अशी पूर्ण team काम करते. ही process थोडी वेळ घेणारी असते. थेरपी/
इंटरव्हेंशनचे परिणाम दिसायला वेळ लागतो. त्यामुळे पालक निराश होण्याची भीती असते.
याचा परिणाम मुलाच्या प्रगतीवर, मानसिकतेवर होऊ शकतो. त्यामुळे
पालकांनी नेटाने प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत.
दुसरा महत्वाचा मुद्दा असतो, तो म्हणजे शालेय शिक्षण! मुलाची बौद्धिक चाचणी केल्यावर अभ्यासक्रम
ठरवणे सोपे जाते. अभ्यासक्रम शक्यतो सोपा/ मुलाला/मुलीला झेपेल असा निवडावा.
जेणेकरून मुलाला जमू शकेल नाहीतर त्याच्या self-concept / self -confidence वर
परिणाम होऊ शकतो. language exemption, National Institute for Open
Schooling अशा योजनांची माहिती पालकांनी करून घेतली पाहिजे. शाळेत remedial
classes / special educator / counsellor आहेत का? हे ही माहित करणे जरुरीचे आहे.
मानसी(नाव बदलून) ला Dyslexia असल्याचे निदान उशिरा झाले. पण तोपर्यत पालकांनी
तिला आळशी, तुला प्रयत्न करायला नकोत बाकीच्या वर्गातल्या
मुलांना जमतं तर तुला का जमत नाही? असे बरेच प्रश्न विचारून,
काही वेळेस शिक्षा करून तिचा आत्मविश्वास पार खच्ची करून टाकला होता. कारण
तिच्याकडे कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नव्हते. तिने शाळेत जाण्यास साफ नकार दिला.
घरात तिचा आरडा ओरडा वाढला. तिच्या मानसिकतेवर याचा फार गंभीर परिणाम झालेला होता.
शेवटी पालक आणि मानसी psychological testing/ counselling यातून गेल्यावर त्यांना
नेमका प्रॉब्लेम काय/ कुठे आहे ते समजले. मानसी मुद्दाम करत नाही. ती आळशी नाही हे
पालकांना समजले.
हे उदाहरण मी मुद्दाम दिले की पालकही मुलांवर लेबल लावण्याची घाई करतात. मुलांबरोबर जास्त वेळ
घालवल्यास, त्यांच्याशी संवाद साधल्यास हे टाळता येऊ शकते. पालक आणि मुलं यांच्यात
एकमेकांवर विश्वास असणे फार महत्वाचे आहे. मुलाच्या आजाराचे नेमके स्वरूप
समजल्यानंतर, मुलांना स्वावलंबी बनवणं याला प्राधान्य आणि
त्यादृष्टीने प्रयत्न असला पाहिजे. गणित, इतिहास, भूगोल
हे थोडासा उशिरा जमलं तरी हरकत नसते. मुलगा/ मुलगी मेडिकेशन वर
असेल तर त्याचे काय side-effect होतात, diet plan कसा हवा?
हे डॉ.कडून तपशीलवार समजून घेणे फार आवश्यक आहे. प्रत्येक
आठवड्याला/ महिन्याला त्याला काय शिकवायचे? याचा education plan शाळेत केला
गेला पाहिजे.
प्रत्येक वेळेस मुलगा/ मुलगी हा focus आहे. त्यामुळे त्याच्या प्रगती
साठी जेजे लागेल ते ते त्या वेळी करणे हे महत्वाचे. आपल्याच बाबतीत असे का?
असे अनेक प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे. पण बऱ्याच वेळी ते अनुत्तरित असतात आणि राहतात……अशावेळी ह्यात न
अडकता पुढे जाणे हे महत्वाचे!!!
डॉ.पूर्वा रानडे
No comments:
Post a Comment