दादा एक गुड न्यूज आहे

आज "दादा एक गुड न्यूज आहे" नावाचं  मस्त मराठी नाटक इथे बंगलोर मध्ये बसुन बघायला मिळालं. All Thanks to मित्रमंडळ बंगलोर !!!
एकदम खुसखुशीत संवाद , अफलातून टायमिंग आणि अप्रतिम अभिनय. नाटकाचा विषय तसा थोडाफार boldच, पण दिग्दर्शक अद्वैत दादरकरनी तो अतिशय कल्पकतेनं, हलक्याफुलक्या पद्धतीने हाताळला आहे! नाटकाचा स्ट्रॉंग पॉईंट आहे, त्याचे खुसखुशीत संवाद, जे वाक्यावाक्याला हशा पिकवतात.

उमेश कामत हा नाटकाचा हुकमी एक्का! त्याचा रंगमंचावरचा सहज सुंदर वावर, भुमिकेत खोलवर शिरणं, संवादफेक सगळंच काही लाजवाब!!! ऋता दुर्गुळेने बंडखोर नमिता प्रभावीपणे साकारली आहे.तिने आजच्या 'Bold, sorted, confident' अशा नविन पिढीला अतिशय समर्थपणे उभे केले आहे. उमेशसारख्या कसलेल्या कलाकारासमोर जराही दबून न जाता,त्याला तोडीस तोड असं काम केलेलं पाहून, ऋताचं राहून राहून कौतुक वाटलं. ऋषी मनोहरने भाबडा,अबोल ,सरळसोट चेहऱ्याचा बॉबी मस्त वठवला आहे. उमेश आणि ऋता बरोबर तोही चिक्कार टाळ्या घेऊन जातो.त्याने गुणगुणलेल्या "हम तुम कितने पास है जितने दूर है चाँद सितारे " ने सुंदर वातावरण निर्मिती केली. आरती मोरेनी मिथिला ह्या व्यक्तिरेखेला छान समजुन, उमजून साकार केले आहे.

थोडक्यात काय तर चार कलाकारांचं नाटक पण ह्या चौघांनीही ह्या नाटकाला चार चाँद लावले आहेत!!! मराठी नाटक प्रेमींनी जरूर पाहावं असं मस्त, खुमासदार नाटक !

मंजिरी एदलाबादकर

No comments:

Post a Comment