देहली का तबला

(उगम से इतिहास और सबक से इलम तक)


विद्वान व प्रथितयश तबलजी व गुरू पं. उमेश वि. मोघे यांचं हे दुसरं पुस्तक. भारतात संगीताची ग्रंथपरंपरा फार मोठी नाही. त्यातून नालंदासारख्या किती संचित ज्ञानराशींचा विध्वंस वेगवेगळ्या आक्रमणांनी झाला त्याचा  हिशोब नाही. विद्येचा प्रसार मुख्यतः मौखिक. त्यामुळेच वेगवेगळे अज्ञानमूलक मतप्रवाह हेतुपुरस्सर व अजाणतेपणी प्रचलित केलेले असतात. अशा पार्श्वभूमीवर उमेश मोघेंसारख्या ज्ञानी, विचक्षण व अभ्यासू कलाकाराचं देहली का तबलाहे पुस्तक प्रकाशित होणं ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे.

तबला हे वाद्यच मुळात मध्यपूर्व आशियातून थोडक्या शतकांपूर्वीच भारतात आयात केलं गेलं, अशा बिनबुडाच्या संकल्पना सामान्य संगीत रसिकांत प्रचलित आहेत. पण मोघेंनी तर्कशुद्ध पद्धतीने अभ्यास करून, दाखले सादर करून तबल्याचं दोन हजारहून अधिक वर्षांपासून असलेलं अस्सल भारतीयत्व सिद्ध केलं आहे. भरताच्या नाट्यशास्त्रात उल्लेखलेल्या त्रिपुष्कर वाद्याशी जुळलेलं हे नातं पाहताना वाचकाला तबला वादनाच्या परंपरेचा, त्यामागील सौंदर्यविचारांचा नीट उलगडा होत गेल्याचं समाधान मिळतं. उगम व इतिहासामागून मोघेंनी तालविचारांचं फार महत्त्वपूर्ण विवेचन केलं आहे, पण ते मात्र थोडक्यात. कारण अर्थातच देहलीचा तबला  या प्रमुख विषयाला ती प्रस्तावनाच व्हावी हाच हेतू असावा.

डॉ. अबान मिस्त्री, जेम्स किप्पेन इ. सारख्या लेखकांनी तबल्यावर व घराण्यांवर उत्तम पुस्तकं लिहिली आहेत. पं. अरविंद मुळगावकरांचं तबलाहे तबला व वादन यांचा व्यापक स्वरूपात वेध घेणारं पुस्तक मार्गदर्शक स्तंभाप्रमाणे उभं आहे. तरी जनमानसातले बहुतेक समज हे ऐकीव माहितीवर आधारलेले असतात. आणि जे जास्त ऐकू येतं किंवा दिसतं ते खरं असं मानणारेही बरेच असतात. स्वतंत्र तबलावादनातील कित्येक मूलभूत व सौंदर्य/विचारपूर्ण गोष्टी या दिल्ली घराण्यातून आलेल्या आहेत. ते श्रेय या पुस्तकात वाचकाला साधार पाहता येतं. खाली-भरी, फर्शबंदी, पेशकार आणि त्याचबरोबर कायदा, त्याचे बल, पलटे, पेच या दिल्ली घराण्याने दिलेल्या संकल्पना मोघे अतिशय नेमकेपणाने स्पष्ट करतात. एकल वादनात अत्यंत प्रतिष्ठा पावलेलं उपज अंग हे दिल्ली घराण्याच्या शास्त्रकारांनी घडवल्याचे दाखलेही मोघे देतात. एकल तबलावादनाशी फारशी ओळख नसलेल्या वाचकांसाठी मोघे या सर्व संज्ञा स्पष्ट उलगडूनही सांगतात.

भारतीय संगीत, तबला, आपला इतिहास, तबलावादनातील सौंदर्यस्थळं अशा विषयात रस घेणारे सर्वसामान्य रसिक - ते - तबल्याचे चिकित्सक अभ्यासक - ते - सर्व तबलावादक अशा सर्वांसाठी हे पुस्तक अत्यंत माहितीपूर्ण व तितकंच रंजक होईल यात शंका नाही.

पुस्तक खरेदीसाठी संपर्क - श्री. उमेश मोघे - +91 89992 55209

कौस्तुभ आजगांवकर


No comments:

Post a Comment