दर रविवारी सकाळी लवकर उठून सिंहगड पायी चढण्याचा विनयचा गेले तीन
वर्षापासूनचा उपक्रम. आजही रविवार असल्याने पहाटेच उठून त्याने जायची तयारी केली.
ठरल्या वेळेला त्याचा कॉलेजपासूनचा मित्र दिनेश गाडी घेऊन आला. दोघांनी गप्पा मारत
सिंहगड गाठला. पायथ्याच्या एका चहाच्या टपरीजवळ गाडी पार्क केली, कटिंग चहा घेतला आणि झपाझप माथा गाठला. आज तिथे अचानक काही
जुने मित्र भेटले, गप्पांचा फड जमला आणि नेहमीपेक्षा उतरायला
उशीर झाला. गड उतरायला सुरवात केली तेव्हा दुपारचे बारा वाजून गेले होते.
थोडे अंतर गेल्यावर त्याला एक वयस्कर गृहस्थ हेलपाटत उतरताना दिसले. लांबून
त्यांना बघून काकांची गाडी आज टाईट असावी असे त्याला आणि दिनेशला वाटले. दोघेही
झपाझप चालत पुढच्या मेट्यावर पोहोचले. तिथल्या टपरीचा मालक ज्ञानबा आता चांगलाच
ओळखीचा झाला होता. चहा देताना त्यांना म्हणाला,
"ते काका पाहिल्येत का? डुल्यामारुती
झालाय त्यांचा". तिघेही सूचक हसले.
चहा पिऊन दोघेही परत पायवाटेकडे आले. ' ते '
काका अजूनही फारसे पुढे गेलेले नव्हते. त्यांच्या जवळून जाताना
विनयने सहज विचारले, " काय काका , आज इकडे कुठे?" उत्तर आले नाही.
त्याने त्यांच्याकडे नजर वळवली. सहा फूट उंची, सतेज गोरा वर्ण, सोनेरी काडीचा चष्मा,
टापटिपीत कपडे ....त्यांच्याकडे बघून विनयला एकदम चर्रर्र झाले.
काका पिणाऱ्यातले नाही हे त्याने लगेच ओळखले. त्याने स्वतःचा वेग कमी केला आणि
काकांशी बोलायला सुरवात केली. बोलताना समजले, की काकांचा
त्या दिवशी एकसष्टावा वाढदिवस होता. गेल्याच वर्षी ते एलआयसी मधून निवृत्त झाले
होते आणि आज पहिल्यांदाच सिह्गडावर आले होते.
थोडे अंतर पुढे गेल्यावर काका अजून थकले, विनयला
म्हणाले " मला प्लीज घरी सोडता का? मला चक्कर येते आहे." विनय आणि दिनेशने लगेच
होकार दिला. "काका, आपण तुमच्या घरी
फोन करू या का?" दिनेशने सुचवले. "नको नको, घरी बायको एकटी आहे, घाबरून
जाईल. दोन्हीही मुले परदेशी आहेत. आपण पोचूच अर्ध्या तासात." काका म्हणाले.
पण पुढे काही अंतर गेल्यावर काकांना चालणे ही अवघड होऊ लागले. दोघांनी
त्यांच्या काखेत हात घालून त्यांना खाली आणायला सुरवात केली. पाच मिनिटांतच
काकांचे शरीर आणि जीभ दोन्हीही जड होत चालल्याचे त्यांना जाणवले. दोघांनी एका
झाडाखाली काकांना ठेवले. बरोबर असलेले पाणी पाजले. तेव्हढ्यात तिथून जाणाऱ्या एका
ट्रेकरने बिस्किटे दिली, ती खाऊ घातली. काकांना
तकवा यायच्या ऐवजी ते कलंडायला लागले. परिस्थिती गंभीर होत चालली होती.
विनयने तिथून जाणाऱ्या येणाऱ्या चार पाच ट्रेकर्सना दिनेश आणि काकांजवळ
बसवले आणि तो सुसाट वेगाने चहाच्या टपरीत पोहोचला. टपरीच्या मालकाला त्याने घटनेची
माहिती दिली. त्यांनी अशा घटना अनेक वेळा होतात असे सांगून त्याला पाच सहा तरटं
आणि बेडशीट दिली. ती घेऊन विनय धावतच खाली पोहोचला. दरम्यान दिनेशने काकांच्या
फोनवरून शेवटच्या डायल केलेल्या नंबरवर झालेल्या घटनेची माहिती दिली होती. तो नंबर
काकांच्या पुतण्याचा होता. सात आठ जणांनी काकांना तरटाच्या स्ट्रेचरवर झोपवले आणि
हळू हळू खाली आणले.
खालच्या टपरीजवळ काकांना झोपवले. काकांचा रिस्पॉन्स काहीच येत नव्हता.
टेन्शन वाढत चालले होते. सगळ्यांचे डोळे रस्त्याकडे आणि काकांच्या श्वासाकडे लागले
होते. तितक्यात.... वायुवेगाने अॅम्ब्युलन्स आली. काकांचा पुतण्या घेऊन आला. आतून
डॉक्टर आणि त्यांचे सहाय्यक उतरले. पुतण्याने काकांच्या कानाशी जाऊन आवाज दिला.
काकांनी डोळे किलकिले केले, त्यांच्या चेहऱ्यावर
अस्फुट समाधान उमटले. डॉक्टरांनी तातडीने त्यांना अॅम्ब्युलन्समध्ये घेतले आणि आली
त्याच वेगाने अॅम्ब्युलन्स पुण्याच्या दिशेने रवाना झाली. विनय आणि दिनेश सुन्न
होऊन गाडीत बसले आणि घरी आले. एकही शब्द न बोलता....
पुढे वर्षभर विनयच्या मनात विचार यायचा की 'त्या'
काकांचे काय झाले असेल. पण त्यावेळची परिस्थिती अशी होती की त्यांचा
पत्ता वगैरे घेणे अशक्यच होते.
विनय व्यवसायाने एक वास्तुविशारद होता. या घटनेनंतर साधारण दोन वर्षांनी
त्याच्या ऑफिसमध्ये एक चाळिशीतले जोडपे आले. त्यांना बंगला बांधायचा होता. लोकेशन, रिक्वायरमेंट बद्दल गप्पा चालू झाल्या. बोलताना जोडप्यातला
'तो' म्हणाला, " विनयजी, मी १२ वर्ष देशाबाहेर होतो. करिअर, पैसा, मानमरातब याच्या मागे लागलो होतो. इकडे आई आणि
बाबा एकटे होते. आनंदात होते. बाबा रिटायर झाल्यावर एक घटना घडली. बाबांना
सिंहगडावर हार्टअटॅक आला. दोन अनोळखी तरुणांनी त्यांना मदत केली. माझे बाबा वाचले.
पण त्याच क्षणी निर्णय घेतला आणि पुण्याला परत आलो. आमचे घर दुसऱ्या मजल्यावर आहे
शिवाय तसे छोटे आहे. हा बंगला हे बाबांचे स्वप्न आहे. त्यांनीच अनेक वर्षांपूर्वी
ही जागा घेतली आहे. आज त्या दोन तरुणांमुळे बाबांचे स्वप्न साकार होते आहे. विनयजी
खरेच सांगतो आज जर ते माझ्या समोर आले ना तर ...... हे बोलताना त्याच्या डोळ्यात
पाणी तरळले.
विनयने स्वतःच्या जागेवरून उठून त्याचे हात घट्ट हातात धरले ..... काकांना
भेटायला मी पण गेली दोन वर्ष वाट बघतोय...
आरती जोशी
No comments:
Post a Comment