देवघर


Dear God, How come you did all the miracles in the old days and you don’t do any now? – Children’s Letters to God 
चहा पीत खिडकीशी उभा होतो. समोरच्या झाडावर एक कावळा घरटं बांधून कावकाव करत बसला होता. कुठून कुठून हँगर, गवत, काटक्या वगैरे आणून कावळ्याने ते सगळं छानपैकी रचलं होतं. पाऊस आलाच तर आयत्यावेळी पंचाईत नको, म्हणून कुठल्याशा घरातून ढापून आणलेली (महालक्ष्मी साडी सेंटरअसं नाव छापलेली !) एक प्लास्टिकची पिशवी देखील होती. घर इज रेडी ! हाय काय आणि नाय काय ! मनात आलंकाय सुखी आहे ही प्रजा ! माणूस म्हणून जन्मालाआल्यामुळे घरासोबत येणाऱ्या कितीतरी गोष्टी नाहीच आहेत यांच्या आयुष्यात !

हल्ली वर्तमानपत्रात ज्या जाहिरातींच्यामध्ये बातम्या येतात त्या घरांच्या जाहिराती, होम हंटिंग, होम लोन्स आणि त्याचे हप्ते, त्यासाठी लागणारी विविध कागदपत्रे आणि त्यासोबत लागणाऱ्या त्यांच्या एक लाख फोटोकॉपीज, पझेशन, रंग-टाईल्स-फर्निचर-नळ-कड्या यांचं सिलेक्शन, गृहप्रवेश, गृहशांती, वास्तुशास्त्र, नवीन घराच्या पार्ट्या, भांडी, हवे असलेले-नसलेले हजारो कपडे आणि त्यासाठी नेहमीच कमी पडणारी कपाटे, टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन, फ्रीज, मिक्सर अशा तत्सम गोष्टी आणि त्या बिघडल्यावर होणारी धावपळ….या आणि अशा तमाम गोष्टी यांच्या आयुष्यात नाहीयेत ! अरे होएक महत्वाची गोष्ट लिहायची राहून गेलीजी या प्राणीमात्रांच्या घरात नाहीये..देवघर !
प्राणीमात्रांच्या आयुष्यात देव नाही, धर्म नाही. त्यामुळे ओघाने येणारे रिती रिवाज, रूढी-परंपरा, व्रत-वैकल्ये, उपास तापास..या गोष्टी नाहीत! कावळ्याच्या त्या एका घरट्याने अंतर्मुख केलं. वस्तूंचा, गरजांचा, कर्मकांडांचा केवढा पसारा मांडून ठेवलाय आपण! माणसाने आपल्या घरात साक्षात देवाला आणून बसवलं. पण तरीही माणूस सुखी झालाय का? प्राणी पक्षांच्या आयुष्यातदेवनाही म्हणून ते सुखी आहेत की दुःखी आहेत? कळायला मार्ग नाही. पण उपासाच्या दिवशी चुकून हरीण खाल्लं गेलं म्हणून पश्चात्ताप, ओटी भरली नाही म्हणून सिंहीणबाई रागावल्यात, मंदिरात कोकिळांना प्रवेशबंदी. असल्या गोष्टींपासून ही प्रजा कोसो दूर असावी. त्यांच्याकडून कधीही निसर्गाच्या नियमांचं उल्लंघन होत नाही. दुसऱ्याचं न ओरबाडता ते स्वतःच्या नैसर्गिक गरजा भागवतात. आला दिवस जगतात. माझा अंदाज आहे की, ते आपल्यापेक्षा सुखी असावेत.
माणसाचं म्हणाल, तर प्रत्येक घराचे देवधर्मासंबंधी काही नीती नियम असतात. सर्वांनी ते पाळले पाहिजेत असा वडीलधाऱ्या मंडळींचा आग्रह असतो. त्या त्या धर्मानुसार घरात रोज पूजा-अर्चा होते. काही घरात गणपती, नवरात्र, गोकुळाष्टमी या स्वरूपात देवाचे पूजन होते. काही लोकांचे देव हे त्यांच्या घरात राहत नसून त्यांच्या गावच्या घरात राहतात. भारत-पाकिस्तान मॅचच्या दिवशीहीगावच्या जत्रेला गेलंच पाहिजेम्हणून जाणारे पुण्यात्मे मला माहित आहेत. सोळा शनिवार, पांढरे सोमवार वगैरे करणारी घरेही मी पाहिली आहेत. देवळात गेल्याशिवाय, पोथीचे पठण केल्याशिवाय अन्न न घेणारी माणसे मला माहित आहेत. घरात नवीन गोष्ट आल्यावर ती पहिली देवाला दाखवायची, घरात येणारे पैसे आधी देवासमोर ठेवायचे, घरात गोडधोड केल्यावर पहिला नेवैद्य देवाला दाखवायचा, घरात शुभ घटना घडल्यावर पहिला देवासमोर गुळ ठेवायचा, काही अमंगल घडतंय असं वाटलं तर देव पाण्यात ठेवायचे, दर गुरुवारी घरात गुरुचरित्राचे पठण करायचे, हरिपाठ करायचा, घरात एखाद्या जपाचा मंत्रोच्चार सीडी लावून चालू ठेवायचा, श्रावणात कांदा-लसूण-मांसाहार वर्ज्य करायचा, रोज सकाळ संध्याकाळ देवांना पंचामृताने आंघोळ घालायची, अशा विविध माध्यमातून माणसंदेवनावाच्या संस्थेशीकनेक्टठेवतात. 
देव-धर्म वजा केले तर माणसाच्या आयुष्यात पोकळी निर्माण होईल. एकदा गंमत म्हणूनकालनिर्णयउघडा. प्रत्येक तारीख नीट वाचा. तुम्ही अवाक व्हाल. त्या प्रत्येक चौकोनात या देशातल्या धार्मिक लोकांसाठी काही ना काही उद्योग लावून दिलेला आहे. कुठल्यातरी गावात जत्रा असेल, कुणा महात्म्याची जयंती-पुण्यतिथी, नाना उपवास, आणि अगदीच काही नाही तर चंद्र-सूर्य या ना त्या नक्षत्रात प्रवेश घेत असतील. या सर्व चौकोनात दिलेली व्रतवैकल्ये (डोळे झाकून) करणारी घरे आणि त्यातील माणसे मला माहीत आहेत. त्या व्रतवैकल्यांमधीलखरं देवपणकॅलेंडरच्या चौकटीच्या बाहेर कधीतरी सांडेल का ?माणूस सुखी होईल का?
आजपासून वीस-तीस वर्षांनी आपल्या घरांमध्ये ही सर्व व्रतवैकल्ये इतक्याच आत्मीयतेने पाळली जातील का
मला नेहमी प्रश्न पडतो. कदाचित, काही वर्षांनीकालनिर्णयआणि तत्सम कॅलेंडर कंपन्यांना नव्या पिढीची गरज ओळखून बदलावं लागेल. ज्या पिढीलाएकादशीम्हणजे काय हे माहित नसेल त्यांनाअपरा एकदशीकशी कळेल? ‘ओलाआणिउबरच्या जमान्यात सूर्याचे वाहन उंदीर आहे की हत्त्ती आहे याने काय फरक पडेल


वीस पंचवीस वर्षांनीकालनिर्णयमध्ये अमुक तारखेलाफेसबुक स्थापना दिन’, फादर्स डे, बिग बझार मेगा ऑफर डे..वगैरे दिसलं तर फार आश्चर्य वाटायची गरज नाही. पूर्वीच्या काळातली सोवळीओवळी आणि त्यातला तो कर्मठपणा जसा कमी झाला तशी हळूहळू घरातल्या देवाचं आणि पर्यायाने त्या देवघराचं महत्व कमी होईल का
Don’t get me wrong! या नव्या पिढीच्या घरातूनदेवघरकधीच वजा होणार नाही. मात्र व्रत वैकल्यांसाठी घ्यावे लागणारे परिश्रम, उत्साह, द्यावा लागणारा वेळ आणि शरीराला कष्ट यातलं या नव्या पिढीला काहीही द्यायचं नाही. कारण दाण्याची आमटी आणि साबुदाणा खिचडी खाऊन उपास करणारी आपली पिढी ते घरात रोज पाहत आहेत. यातीलफॉर्म ओव्हर सबस्टन्सया नव्या पिढीने बरोब्बर जोखलाय. ते कमी म्हणून की काय, सोशल मिडिया त्यात तेल ओतण्याचं काम करत्ये. नव्या पिढीच्या दृष्टीने प्रजासत्ताक दिन, अंगारकी चतुर्थी, नागपंचमी, फादर्स डे, भारताने मॅच जिंकल्याचा दिवस, गटारी अमावस्या हे सगळं एकाच पातळीवर आहे. जगात काही घडो, त्याचंस्टेटसअपडेट करायला कंटेंट मिळाला  पाहिजे! हे एकदा लक्षात घेतलं की सोशल मिडीयावरवटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !असं वाचल्यावर फार धक्का बसणार नाही.
प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात. मी अशा काही घरांमध्ये गेलोय की ज्या घराचा उंबरठा ओलांडून आत गेल्या गेल्याछानवाटतं. ते केवळ घराच्या सजावटीमुळे किंवा स्वच्छतेमुळे नसतं. ते छान वाटणंत्या घरात राहणाऱ्या आनंदी व प्रसन्न माणसांमुळे असतं. इथे रोजच्या पुजेइतकंच महत्व त्या घरातल्या लहानापासून प्रत्येक मोठ्या व्यक्तीला दिलं जातं. इथे उपास कोणाचे आहेत यापेक्षा घरात काम करणारी गडी माणसं जेवली का, याची विचारणा होते. यज्ञ, अभिषेक, नैवेद्य यापेक्षा सामाजिक कार्यासाठी सढळ हाताने मदत केली जाते. अशा घरांत देवघरासाठी वेगळ्या जागेची गरज नसते. ते घरच देव-घर होऊन जातं.
या निमित्ताने एक घटना आठवली. ती सांगतो आणि थांबतो. अहमदनगरला आमचा एक मित्र नितेश बनसोडेसावलीनावाची संस्था चालवतो. सुमारे पन्नास मुलांना दत्तक घेतलंय त्याने. या संस्थेला मदत करण्यासाठी एक सधन मारवाडी कुटुंब आलं होतं. दुर्दैवाने त्या कुटुंबातला एक मुलगा नुसता मतीमंद नव्हता तरव्हेजिटेबलअवस्थेत होता. दया येऊन आम्ही त्या मुलाबद्दल चौकशी केली. त्या मुलाचे वडील म्हणाले, ‘आमचा हा मुलगा आता पंधरा वर्षांचा आहे. यापुढे हा बरा होणार नाही, हे आम्हाला कळल्यावर पायाखालची जमीन सरकली. जणू आमचं सगळं घरच मोडून पडलं. यातून आधी मी स्वतः सावरलो. नंतर घरच्या सर्व लोकांना एकत्र केलं. घरातले आम्ही सगळेच कमालीचे देवभक्त आहोत. 
मी घरच्यांना सांगितलं, असं समजा, आपल्या घरात देव जन्माला आलाय. स्वतःला भाग्यवान समजा की आपल्याला प्रत्यक्ष देवाची सेवा करण्याची संधी मिळत आहे. सुदैवाने घरातल्यांनी माझं ऐकलं. त्या दिवसापासून या घराचा आमच्या मुलाकडे पाहायचा दृष्टीकोन बदलून गेला. आता आम्ही सगळे मिळून आमच्या घरातल्यायादेवाची सेवा करतो.
या घटनेला खूप वर्ष लोटली. ही घटना घडली तो दिवस होता १० सप्टेंबर. आठवण म्हणून, त्यावर्षीच्याकालनिर्णयमधला १० सप्टेंबरचा तो चौकोन काढून माझ्या डायरीत चिकटवून ठेवलाय. अधूनमधून डायरी चाळताना तो चौकोन दिसतो. मग तो मुलगा आठवतो. त्याहीपेक्षा, त्याचे ते हसतमुख वडील आठवतात.
कालनिर्णय’ मधल्या तीनशे पासष्ट चौकोनातल्या सर्व व्रतांचे पुण्य माझ्या डायरीतल्या त्या एका चौकोनात आहे.
नविन अनिल काळे

No comments:

Post a Comment