हॅलो आईss,मी ओरडलोच फोनवर.
अरे काय झालं? नेमका माझा डोळा लागत होता. दुपारी लँडलाईनवर कसला रे फोन करतोस? बरं आज...
अगं हो हो. ऐकून तर घे. मस्स्त बातमी आहे. आम्हाला पहिली मोठ्ठी ऑर्डर आलीये.एका कंपनीने कुठल्यातरी बँकेच्या डिजिटायझेशनसाठी आमचं सॉफ्टवेअर निवडलंय... फायनली!!
आता बघा आमचं स्टार्टअप कुठल्या कुठे जातं. आम्ही टवाळक्या करतो असं वाटतं काही लोकांना.
ही शेवटची लाईन ज्यांच्यासाठी आहे त्यांना संध्याकाळी तूच ऐकव. किती छान बातमी दिलीस. संध्याकाळी तुझ्या आवडीचा बेत करते.
छे! आज माझ्याकडून तुम्हा दोघांना पार्टी.
ओके. ह्यांना कळवते. बाय.
(दुसऱ्या दिवशी सकाळी)
आई, काल चायनीज काय मस्त होतं. मुख्य म्हणजे बाबांना पण आवडलं. फॉर अ चेंज. आणि हे काय? अजून गेले नाहीत ते? आश्चर्यम्! तब्येत बरी आहे ना? की चायनीज बाधलं?
आई हसत नव्हती.
तुला काल सांगितलं नाही अरे. ह्यांनी मला तसं बजावलेलं संध्याकाळी तू येण्याआधी.
काय झालंय आई? तू इतकी नर्व्हस का झालीयेस? बस इकडे. नीट सांग. काय झालंय?
अरे बाबांना काल नोटीस दिली बँकेने. चार कॅशियर नकोयत आता त्यांना एका ब्रँचमधे.
कुठल्याश्या कंपनीला त्यांनी काँट्रॅक्ट दिलाय...
डिजिटायझेशनचं.
नेहमीसारखी आजही आई आमच्या कचाट्यात अडकली होती. आणि माझी बाबांना सामोरं जायची हिंमत होत नव्हती.
मानस
No comments:
Post a Comment