यंदाच्या दिवाळी अंकांमध्ये खूप वाचनीय साहित्य आहे. खाली मी वाचलेल्या अजून काही चांगल्या दिवाळी अंकांची माहिती देत आहे.
तारांगण :
मराठी चित्रपट सृष्टीला प्राधान्य देणारे हे मासिक श्री.मंदार जोशी गेल्या
दहा वर्षांपासून निष्ठेने प्रकाशित करीत आहेत. हा दिवाळी अंक तारांगणचा १०० वा अंक
सुध्दा आहे. या अंकाचे अतिथी संपादक श्री.आदेश बांदेकर आहेत.
अंकाच्या मुखपृष्ठावर श्रेयस तळपदे, प्रार्थना
बेहरे, मायरा उर्फ परी यांचे आकर्षक छायाचित्र आहे आणि अंकात
या कलाकारांशी मनमोकळी बातचीत पण आहे.
अंकाच्या सुरुवातीला श्री. आदेश बांदेकर यांच्याशी मंदार जोशी यांनी
दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. अंकाचे आकर्षण म्हणावे असा लेख म्हणजे "चकली, चिवडा, किल्ला आणि फटाके" या लेखात श्री. विष्णू मनोहर
यांनी नागपूर येथील दिवाळीच्या आठवणी जागवल्या आहेत. "संवाद
त्रिदेवींचा" या लेखात अपर्णा पाटणकर यांनी मंजिरी भावे,
मुग्धा गोडबोले, कविता लाड यांच्याशी त्यांनी
लॉकडाऊनचा काळ कसा घालवला याबाबत गप्पा केल्या आहेत.
अंकात खूपच वाचनीय मजकूर आहे. "चला
आपली रेषा मोठी करूया" हा गणेश गारगोटी यांचा लेख,
"मनोरंजनाचा टॉप पर्याय" हा आशिष
निरगुडकर यांचा लेख, अविनाश चिंचवडकर यांचा रश अवर आणि माय
कझिन विनी या धमाल विनोदी चित्रपटांबद्दलचा लेख, पूजा सामंत
यांनी घेतलेली नीना गुप्ता यांची मुलाखत असा खूप वाचनीय मुलाखत आहे.
गणेश मतकरी हे एक संवेदनशील लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांचा "सिनेमा म्हणजे काय" हा
अभ्यासपूर्ण लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे.
संतोष पाठारे यांचा "पोलादी भिंतीआडचा
सिनेमा" हा अजून एक अप्रतिम लेख!
भगवान रामपुरे यांनी गुलजार, विजय
तेंडुलकर, डॉ. लागू यांचे पोर्ट्रेट बनविताना आलेले हृदय
अनुभव सांगितले आहेत. भ्रमंती, प्रवास या विषयावरील
गाण्यांचा रसिक आस्वाद घेतला आहे पं. युधामन्यू गद्रे यांनी!
संपादक मंदार जोशी हे स्वतः उत्कृष्ट लेखक पण आहेत. चित्रपटसृष्टीचा
सुवर्णकाळ पाहिलेल्या आणि आता अवकळा आलेल्या एका चित्रपटगृहाचे आत्मकथन हा एक
अभिनव लेख आहे.
खरं तर या अंकात इतका वाचनीय साहित्य आहे की काय वाचू आणि काय नाही असा गोड
पेच वाचकाला पडतो. एक वेगळ्या माया नगरीची अदभुत सफर करण्यासाठी हा अंक अवश्य
वाचा.
साहित्यकलामंच :
"महाराष्ट्राबाहेर राहून मराठी अस्मिता जपणारा अंक"
असे ब्रीदवाक्य असलेला आणि बृहनमहाराष्ट्रातून प्रकाशित झालेला हा
पहिलाच दिवाळी अंक खूप वैशिष्टपूर्ण आहे! मुख्यत्वे बंगलोर, हैदराबाद,
गुजरात, मध्यप्रदेश राज्यातील साहित्यिकांचे
साहित्य यात आहे.
या अंकाचे खूप वेगळे असे मुखपृष्ठ चितारले आहे बंगलोर मधील दिपाली वझे
यांनी! अंकाचे संपादन स्मिता बर्वे आणि व्यवस्थापन श्री रोहित आहेर यांनी केले
आहे.
चित्रकार वैभवी शिंपी यांनी रेखाटलेल्या सुंदर चित्राने आणि मारुती रेवणकर
यांनी लिहिलेल्या गणेश वंदनेने अंकाची सुरुवात होते.
"कैवल्यग्रामचे निवासी" या
लेखात ऋषिकेश मोघे यांनी सुप्रसिद्ध गायक भीमसेन जोशी, वसंतराव
देशपांडे, लता मंगेशकर, पं.
मल्लिकार्जून मन्सूर या गायकांच्या आठवणी जागवल्या आहेत.
दुसरा वैशिष्ट्यपूर्ण लेख मेघदूत या काव्याबद्दल व्यंकटेश कुलकर्णी यांनी
लिहीला आहे. मेघदूत या महाकाव्याचे सार केवळ आठ कडव्यात त्यांनी सुंदरपणे चितारले
आहे.
"होयसळ मंदिरे" हे मुक्ता
कुलकर्णी यांचे बेलूर, हळेबीडूचे प्रवासवर्णन खूप
अभ्यासपूर्ण आहे.
याशिवाय अंकात अनेक मनोरंजक कथा आहेत. अंकात बालसाहित्य विभागही आहे. सुंदर
गझला आणि कविता पण आहेत. अंकाच्या शेवटी महाराष्ट्राबाहेरील वेगवेगळ्या मराठी
ग्रुप्सची उपयुक्त माहिती आहे.
अंकाची उत्कृष्ट छपाई, मांडणी, चांगल्या दर्जाचा कागद, आकर्षक मुखपृष्ठ, निर्दोष संपादन ही अंकाची अजून काही वैशिष्ट्ये आहेत.
मोहिनी :
स्व. आनंद अंतरकर यांनी त्यांचे वडील अनंत अंतरकर त्यांच्या पश्चात
तब्बल ५५ वर्षे "हंस मोहिनी नवल" या मासिकांची दर्जेदार परंपरा चालवली. अंकाची तयारी सुरू असतानाच
प्रकाशनापूर्वीच यांचे दुःखद निधन झाले. पण त्यांच्या कुटुंबीयांनी निर्धाराने अंक
पूर्ण केला.
“मोहिनी” दिवाळी अंकाचे हे बाहत्तरावे
वर्ष! प्रामुख्याने विनोदी साहित्य आणि कला या विषयावर आधारित अंक आहे! शि.
द.फडणीस यांचे वैशिष्ट्यपूर्ण चित्र अनेक वर्षांपासून अंकाच्या मुखपृष्ठावर असतं,
तसेच या वर्षीही आहे.
"आनंदयात्री" हा स्व. आनंद
अंतरकर यांच्या बद्दल लेख चटका लावून जाणारा लेख त्यांच्या भगिनी शैलजा अंतरकर
यांनी लिहिला आहे. त्यात आनंदजींच्या उमद्या व्यक्तिमत्त्वाचं हृदयस्पर्शी वर्णन
केलं आहे!
मोहिनीचा अंक दर्जेदार विनोदी साहित्यासाठी प्रसिद्धच आहे. त्यामुळे या
अंकातही विजय कापडी, सुधीर सुखटणकर, श्रीनिवास आठल्ये, डॉ. रविंद्र तांबोळी, सुरेशचंद्र वाघ, भा.ल. महाबळ, सुभाष
सुंठणकर, श्रीपाद टेंबे इत्यादी मान्यवरांचे उत्कृष्ट
साहित्य आहे.
याशिवाय "यक्षिणीची कांडी" हे पुरुषोत्तम धाक्रस यांचे पुनर्मुद्रित विनोदी नाटक आणि जयवंत दळवी
यांची "कोणाचा तरी काका मरतो" ही पुनर्मुद्रित कथा अजूनही तेवढीच तजेलदार वाटते.
कला दालनांमध्ये लोभसवाण्या मेरिल स्ट्रीप बद्दलचा भालचंद्र गुजर यांचा लेख
तिच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेतो. हॉलीवूडच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी
अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते.
"तुफानातील दिवे" हा
सुभाषचंद्र जाधव यांचा लेख उत्कृष्ट संगीत देऊनही विस्मृतीच्या अंधकारात गेलेल्या
गुणी संगीतकारांच्या आठवणी जागवून जातो.
"आनंदमय सुहासिनी" या लेखात
विजय पाडळकर यांनी "भुवनशोम" या गाजलेल्या चित्रपटात काम केलेल्या आणि चक्क सत्यजित रे यांच्या सहाय्यक
दिग्दर्शक असलेल्या सुहासिनी मुळे यांचा परिचय करून दिला आहे. आनंद अंतरकरांचा
आनंदी ठसा असलेला हा शेवटचा अंक मनात घर करून जातो!
मराठी भाषेला दिवाळी अंकांची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. या वर्षीचे दिवाळी
अंक आपले भरपूर मनोरंजन रंजन तर करतातच, पण आपल्याला
वैचारिक खाद्य पण पुरवतात.
अविनाश चिंचवडकर
No comments:
Post a Comment