दीपावली दिवाळी अंक २०१९

संपादक - अशोक कोठावळे





महाराष्ट्राच्या परंपरेत दिवाळी अंकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळी आणि दिवाळी अंक हे अगदी अतूट नातं आहे. दरवर्षी बरेच दिवाळी अंक बाजारात येतात.

'दीपावली' हा खूप जुना, दरवर्षी प्रकाशित होणारा दर्जेदार दिवाळी अंक आहे. अगदी लहानपणापासून मला हा अंक आकर्षित करतो. त्याचं एक कारण म्हणजे याचं मुखपृष्ठ. या वर्षीही दत्तात्रय पाडेकर यांचं सुंदर चित्र या अंकाला लाभलं आहे.

यावर्षीचा हा ७५ वा अंक आहे, म्हणजेच हे या अंकाचं अमृतमहोत्सवी वर्ष आहे. दीपावलीचा अंक नेहमीच ताज्या घडामोडींवर भाष्य करणारा असतो. अभ्यासकांचे, मान्यवरांचे विचार यातून आपल्या पर्यंत पोचतात. यावर्षीचा विषय आहे 'अस्वस्थतेचे पडघम :आभासी की खरे'. यातून वेगवेगळे आपल्याला विचार करायला लावणारे विषय मांडण्यात आले आहेत उदा. आरक्षण, बेरोजगारी, अभिव्यक्ति स्वातंत्र्य, ट्रोलिंग इ. इ. आणि चर्चा, लेख, परिसंवाद यांना पुरून उरणारा विषय म्हणजे social media वरचा मेघना भुस्कुटे यांचा लेख. असे अनेक मान्यवरांचे लेख या लेखमालेत आहेत.

यातील ललित लेखही तितकेच वाचनीय आहेत. सुहास बहुलकरांचा लेख, 'चित्रं भंगारात टाकलेली …..वाचलेली आणि वाचवलेली' हे नावच सगळं सांगून जातं. 'मॅड' हे जगातील विनोदी, त्याचा खास वाचक वर्ग असणारं नियतकालिक, नुकतंच (जुलै २०१९) मध्ये बंद झालं त्या बद्दल प्रशांत कुलकर्णी यांचा लेख आहे. मायकेल जॅक्सन वरचा मीना देशपांडे याचा लेख ( तो त्यांच्या आगामी पुस्तकातील एक प्रकरण) आहे. नंदिनी आत्मसिद्ध, मिलिंद बोकील, बाळ फोंडके, अनिल अवचट, मीना वैशंपायन, शरद वर्दे यांचे विविधांगी लेखही फारच छान आहेत. कथा, कविता हे विभागही वाचनीय आहेतच.

एकूण काय तर हा अमृतमहोत्सवी अंक वाचायलाच हवा असा आहे.

वृंदा जोशी


No comments:

Post a Comment