डोळस भटकंती - भाग ५ - लेणी जुन्नरची

 

लेणी जुन्नरची

 

पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला असलेला जुन्नर तालुका म्हणजे अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची अक्षरशः खाण आहे. नुकताच त्याला पर्यटन तालुक्याचा सन्मान प्राप्त झालेला आहे. जीर्णनगर अशी प्राचीन ओळख असलेल्या या परिसराचा संबंध इसविसनाच्या पूर्वी थेट सातवाहन कुलापर्यंत जातो. या काळात जुन्नर परिसरात बौद्ध भिक्षुंसाठी विविध लेणी खोदली गेली. यातील एकाही लेणीत बुद्धाची मूर्ती दिसत नाही. यावरून अभ्यासकांच्या मते ही सगळी लेणी हीनयान पंथियांची म्हणजेच थेरवादी संप्रदायाची आहेत आणि हेच या लेण्यांचे खास वैशिष्ट्य. संपूर्ण जुन्नर परिसरात जवळजवळ १८० पेक्षा जास्त लेणी आहेत. इथल्या लेणींमधे कल्याण, भडोच इथल्या व्यापाऱ्यांचे आणि रहिवाशांचे लेख कोरलेले दिसतात. लेणी किंवा तिथल्या पाण्याच्या पोढीसाठी दान देणे हे पुण्यकर्म समजले जाई. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेला किल्ले शिवनेरी या तीर्थक्षेत्राच्या चहूबाजूंनी असलेल्या डोंगरात खोदलेली ही लेणी मुद्दाम वेळ काढून बघायला जावीत अशी आहेत.

 



अंबा-अंबिका लेणी - नारायणगावहून जुन्नरला जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला डोंगरात मोठा लेणीसमूह दिसतो तो मानमोडी लेणी समूह. या लेणीचे मुखदर्शन (facade) रस्त्यावरूनसुद्धा दिसते. पायथ्याशी असलेल्या पोल्ट्रीपासून सरळ एक पायवाट या लेणींकडे जाते. या डोंगरात असलेली ही अंबा-अंबिका लेणी. यातील एका लेणीत अंदाजे इ.स.च्या ६ ते ८ व्या शतकात जैन देवता कोरलेल्या दिसतात. त्यात श्री पार्श्वनाथ आणि आंब्याच्या झाडाखाली बसलेल्या अंबिका देवीचे अंकन केलेले दिसते. त्यावरून या लेणीला अंबिका लेणी नाव पडले. याच लेणी समूहात पुढे एका चैत्यगृहाचे अर्धवट राहिलेले काम दिसते. ठिसूळ दगड लागल्यामुळे ते बांधकाम अर्धवट सोडावे लागले असणार. त्याच्या शेजारच्या दोन छोट्या लेण्यांच्या भिंतीवर अत्यंत सुबक असा ब्राह्मी लिपीमधील शिलालेख आहे. भृगुकच्छ अर्थात भडोच इथल्या 'बुद्धमित्र आणि बुद्धरक्षित (बुधमितस आणि बुधरखितस) नावाच्या दोन भावांनी ह्या लेणीसाठी दान दिलेले आहे. त्यांच्या वडिलांचे नाव लिहायचे राहिले होते, म्हणून ते मधल्या ओळीत छोट्या अक्षरात लिहिलेले आहे !!! 

 



भूतलेणी - मानमोडी लेणीसमूहात असलेली ही भूतलेणी इ.स.पूर्व पहिल्या शतकात खोदली गेली. या लेणीचे मुखदर्शन (फसाड) अत्यंत आकर्षक आहे. बाजूच्या भिंतीवर कोरलेला बोधीवृक्ष आपले लक्ष वेधून घेतो. पिंपळाच्या आकाराची चैत्यगवाक्षाची कमान मोठी आकर्षक आहे. इथे दोन मोठे स्तूप आणि बाजूला मनुष्यरुपातल्या नाग आणि गरुडाच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. नाग आणि गरुड हे निसर्गतः एकमेकांचे शत्रू. परंतु बुद्धाच्या सहवासात आल्यावर दोघेही आपले वैर विसरून गेले असेच या स्थपतींना सांगायचे आहे. इथल्या चैत्य गवाक्षाची कमान फारच सुंदर सजवलेली आहे. यात मध्यभागी अभयमुद्रेत उभी असलेली गजलक्ष्मी आणि तिच्या दोन बाजूंनी तिच्यावर अभिषेक करणारे हत्ती. त्यांच्या बाजूच्या पाकळ्यांमध्ये पुरुष-स्त्री अशी दांपत्ये असून तिथेच खाली ब्राह्मी लिपीतील शिलालेख कोरलेला दिसतो. शेजारीच असलेल्या विहारांचे दरवाजे सुद्धा देखणे आहेत. त्यावर असलेले दोन-दोन स्तूप तसेच त्रिरत्न, फुलांची नक्षी, धर्मचक्र ही बौद्ध स्थापत्यातली शुभचिन्हे फारच सुरेख कोरलेली आहेत. तिथे असलेल्या नीरव शांततेमुळे ह्या लेण्यांचे दर्शन कायम स्मरणात राहते.

 



सुलेमान लेणी - बौद्ध लेणी आणि हे वेगळे नाव. ही लेणी लेण्याद्री रांगेतील पूर्वेकडच्या एका सुटावलेल्या डोंगरात आहे. गणेश लेण्यांचाच हा एक भाग आहे. परंतु कोणी सुलेमान नामक व्यक्तीने याचे संवर्धन केले म्हणून याला सुलेमान लेणी म्हटले जाऊ लागले. लेण्याद्रीच्या वाहनतळापासून डोंगरावर न जाता बाजूच्या शेतातून या लेणीकडे जायला पायवाट आहे. तिथून अर्ध्या तासात आपण लेण्याद्री डोंगर आणि लेणी यांच्या मधल्या खिंडीत पोचतो. तिथून ही लेणी दिसू लागतात. थोडासा डोंगर चढून गेल्यावर एक कोरडा ओढा आपल्याला आडवा येतो. त्याला वळसा घालून आपण लेणीच्या खाली येतो. इथून वर जायच्या मार्गावर काहीशी पडझड झालेली आहे. हीनयान पंथियांची ही लेणी. याचे मुखदर्शन (फसाड) खूपच सुंदर आणि आकर्षक आहे. गौतम बुद्धाच्या मूर्ती करण्याआधी बुद्धाचे अस्तित्व हे त्याच्या आयुष्यात आलेल्या काही वस्तूंच्याद्वारे दाखवले जाते. त्यानुसार इथे गौतम बुद्ध मूर्ती स्वरुपात न दिसता कुंपण असलेला वृक्ष आणि दुसऱ्या बाजूला कोरलेल्या धर्मचक्राच्या सांकेतिक रुपात दाखवलेला आहे. छोटेसे लेणे पण अत्यंत सुंदर असे हे सुलेमान लेणे लेण्याद्रीला गेल्यावर तर अवश्य पाहिले पाहिजे.




याचबरोबर जुन्नर परिसरात तुळजा लेणी आणि शिवनेरी किल्ल्याच्या डोंगरात असलेली लेणी ही देखील सुंदर आणि आकर्षक आहेत. आपल्याकडे असलेल्या वेळेनुसार नियोजन करून एक अथवा दोन दिवसात जुन्नरला लाभलेली ही कातळश्रीमंती मुद्दाम वेळ काढून पाहिली पाहिजे. इसवीसनाच्या सुरुवातीच्या काळात इथे भरभराटीला आलेला व्यापार आणि लयनस्थापत्य (लेणी) या प्रदेशाचे महत्त्व अधोरेखित करतात. बौद्ध धर्मातील हीनयान पंथियांचे अस्तित्व आजही आपल्याला त्यांनी खोदलेल्या लेणींमधून जाणवते. नितांत शांत परिसरात काळ्या कातळात खोदलेल्या लेणी आपल्याला निराळीच अनुभूती देऊन जातात. इथे डाव्या बाजूला असलेल्या भीमाशंकर लेणीवर मात्र मधमाशांचे मोठे पोळे आहे. तिथे मात्र जाऊ नये. तसेच या परिसरात आरडाओरडा केला तर या माशा उठू शकतात आणि मग ते प्रकरण अंगाशी येण्याची शक्यता आहे. इथल्या शांततेचा भंग न करता इथल्या कातळसौंदर्याचा मनमुराद आस्वाद घ्यावा.

 या लेण्यांची अधिक माहिती बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://fb.watch/azUgRNUyLv/


आशुतोष बापट

 



No comments:

Post a Comment