इतिहासाचे मूक साक्षीदार - वीरगळ
रणांगणावर वीरमरण येणे हे भारतीय
लोकजीवनात पुण्यप्रद मानले गेले आहे. असे वीरमरण प्राप्त झालेल्या वीराचे उचित
स्मारक 'वीरगळा'च्या रूपाने गावोगावी उभारलेले
आपल्याला पाहायला मिळते. 'वीरगळ' म्हणजे
काय, आणि ते कसे असतात हा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे.
मुळात हा शब्द कानडी भाषेतून आला आहे. कानडी भाषेमध्ये 'कल्लू'
म्हणजे 'दगड'. वीराचा
दगड तो 'वीरकल्लू', त्यावरून 'वीरगळ' हा शब्द मराठीत प्रचलित झाला. स्थानिक लोकं
तर, वीर गळून पडला म्हणून त्याचे स्मारक ते वीरगळ. असा अगदी
सुटसुटीत अर्थ सांगतात. एका पाषाणाच्या शिळेवर काही विशिष्ट शिल्पांकन करून तो
पाषाणस्तंभ उभा करणे आणि त्या वीराचे स्मरण करणे. तो पाषाणस्तंभ म्हणजेच वीरगळ.
आपल्या लाडक्या योद्ध्याचे स्मारक असलेले हे वीरगळ महाराष्ट्रात गावोगावी पाहायला
मिळतात. पण जनमानसात त्याची माहिती फारच थोड्या लोकांना असते.
हे वीरगळ तयार करायची एक खास पद्धत आहे. आकार सामान्यतः अडीच ते तीन फूट उंचीच्या शिळेवर एकावर एक असे तीन किंवा चार चौकोन खोदून त्यात या वीराची कथा थोडक्यात शिल्पांकित केलेली असते. सर्वात खाली तो वीर मृत्यूमुखी पडलेला दाखवतात. त्याच्या वरच्या थरात त्याचे युद्ध चाललेले दाखवले जाते. त्याच्या वर तो मृत झाला असून त्याला अप्सरा स्वर्गात घेऊन जात आहेत असे शिल्पांकित केलेले असते. तर सर्वात वरच्या चौकोनात तो शिवमय झाला असे दाखवण्यासाठी तो शिवपिंडीची पूजा करताना दिसतो. युद्धात मरण आले तर तुम्हाला हमखास स्वर्गप्राप्ती होते हे जनमानसावर अशाप्रकारे बिंबवले जाते. यात अजून वर त्या पाषाणाच्या दोन बाजूंना चंद्र-सूर्य दाखवलेले असतात. जो पर्यंत आकाशात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत त्या वीराचे स्मरण आम्हाला होत राहील असे यातून सूचित करायचे असते. मृत्युमुखी पडलेल्या वीराची पत्नी जर त्याच्यासोबत सती गेली असेल तर त्या वीरगळावर स्त्रीचा हात कोरलेला असतो. त्या हातात बांगड्या दाखवलेल्या असतात. काही ठिकाणी नुसताच स्त्रीचा हात कोरलेले दगड दिसतात. यांना सतीशिळा असे म्हटले जाते. काही ठिकाणी वीरगळ हे त्या दगडाच्या चारही बाजूंनी कोरलेले दिसतात.
वीरगळांची परंपरा कर्नाटकातून महाराष्ट्रात आल्याचे सांगितले जाते. कर्नाटकात अत्यंत मोठे आणि खूप मोठे शिल्पपट असलेले वीरगळ पाहायला मिळतात. त्यांच्यावर शिल्पित केलेले युद्ध प्रसंग अगदी तपशीलवर कोरलेले दिसतात. कर्नाटकात अनेक वीरगळांवर लेख कोरलेले आहेत. महाराष्ट्रात मात्र अगदी अपवादानेच लेख पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्याकडचे वीरगळ हे कुठल्या वीरासाठी तयार केलेले आहेत हे समजणे कठीण आहे.
महाराष्ट्रात खरंतर गावागावातून असे
वीरगळ पाहायला मिळतात. एखाद्या गावात वीरगळ असणे हे त्या गावचे प्राचीनत्व
अधोरेखित करणारे असते. भूतकाळात इथे समरप्रसंग घडला होता आणि कोणी वीर धारातीर्थी
पडले होते याची मूक साक्ष आज हे वीरगळ आपल्याला देत असतात. रायगड जिल्ह्यातल्या
माणगाव तालुक्यात असलेले उंबर्डी हे गाव म्हणजे वीरगळांचे संग्रहालय म्हणावे
लागेल. इथे असलेल्या शिवमंदिराच्या आवारात ४५ अत्यंत देखणे वीरगळ ठेवलेले आहेत.
इथे सतीचे हात असलेले अत्यंत रेखीव वीरगळ पाहायला मिळतात. कोणी महत्वाचा सरदार
इथल्या लढाईत मृत्यूमुखी पडला असणार. त्या सरदाराचा खूप बारीकसारीक तपशिलासह
शिल्पांकन केलेला वीरगळ इथे ठेवलेला आहे. इथूनच जवळ दिवेआगरच्या रस्त्यावरील
देगावला शिवमंदिरात असेच अनेक चारही बाजूंनी घडवलेले वीरगळ ठेवले आहेत. त्यातल्या
एका वीरगळावर दहा डोकी आणि वीस हात असलेल्या व्यक्तीचे अंकन केलेले दिसते. रावणाचा
वीरगळ असेही त्याला म्हटले जाते. अगदी आगळावेगळा असा हा एकमेव वीरगळ आहे.
सातारा जिल्ह्यातील किकली, नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा या गावी असेच अनेक वीरगळ दिसतात. राजापूरच्या धूतपापेश्वर मंदिराच्या बाहेर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाडा इथल्या विमलेश्वर मंदिराच्या बाहेर असे देखणे वीरगळ रांगेत मांडून ठेवलेले आहेत. त्याचबरोबर अनेक किल्ल्यांवर आजही असे अनेक वीरगळ विखुरलेले पाहायला मिळतात.
पण अशी व्यवस्था सगळ्याच वीरगळांच्या
नशिबी मात्र नाही. अज्ञानामुळे अनेक ठिकाणी त्यांना शेंदूर फसलेला दिसतो. अनेक
ठिकाणी त्यांना शनीचा दगड म्हणून तेल वाहिलेले दिसते. तर काही गावांमधून त्यांचा
वापर हा कपडे धुण्यासाठी घासायला उत्तम दगड म्हणून केलेला असतो. रांजणगाव जवळच
पिंपरी दुमाला या गावात जीर्णोद्धार करताना मंदिराच्या भिंतीत अनेक वीरगळ
बसवलेलेही आढळतात.
'वीरगळ' म्हणजे आपल्या दैदीप्यमान इतिहासाचा मोठा साक्षीदार असलेला ठेवा. त्याचे काळजीपूर्वक जतन करायला हवे. ते इतिहासाबद्दल जरी मौन बाळगून असले तरीसुद्धा त्यांचे अस्तित्त्व आपल्याला त्या स्थानाची महती पटवून देण्यासाठी खूपच मोलाचे ठरते.
आशुतोष बापट
No comments:
Post a Comment