डोळस भटकंती - भाग ७

 कोकणातील लोककला



निसर्गाने समृध्द अशा कोकणात कला आणि कलाकारांची मांदियाळी बघायला मिळते. विविध कला या प्रांती जपलेल्या आजही बघायला मिळतात आणि त्यांचे सादरीकरणदेखील होताना दिसते. कुठलाही सण समारंभ असला किंवा कुठला उत्सव असला की कोकणी माणसातला कलाकार जागा होतो आणि त्याच्या कलेचे सादरीकरण आपल्याला बघायला मिळते. होळी, दहीकाला, गणपती, नवरात्र अशा सणांच्या निमित्ताने कोकणात विविध कला बहरून येतात. दशावतार, चित्रकथी, जाखडी नृत्य, रोंबाट, खेळे, शिपणे अशा पारंपारिक लोककला या प्रांतातील मंडळींनी जीवापाड जपलेल्या आहेत.


दशावतार

मधला एक काळ असा आला होता की, पिढ्यानपिढ्या जोपासलेल्या या कला, रूढी, परंपरा नष्ट होतील की काय अशी भीती वाटू लागली होती. सिनेमा, दूरचित्रवाणी संच, आणि विविध वाहिन्या यांनी मनोरंजनाच्या दुनियेत मोठी क्रांती केली. मनोरंजनाच्या सगळ्या व्याख्याच बदलून गेल्या. ही सगळी आधुनिक माध्यमे आधी लोकांच्या घरात आणि आतातर मोबाईल संचामुळे लोकांच्या हातात जाऊन बसली. तंत्रज्ञानाच्या या झंझावातापुढे कोकणी लोककला टिकणार कशा अशी शंका येऊ लागली होती. दशावतार हा कोकणी माणसाचा जीव की प्राण. पूर्वीच्या काळी उत्सवाच्यावेळी गावातल्या देवळाच्या आवारात रात्रभर चालणारा हा नाट्यप्रकार. संहिता नसतानाही स्वयंस्फूर्तीने सर्व कलाकारांनी मिळून कथानक रंजक करणे आणि ते उत्कंठावर्धक करणे हे या खेळाचे वैशिष्ट्य. शेकडो वर्षांची परंपरा असलेले दशावताराचे प्रयोग रात्ररात्र बघायची लोकांची सवयच जणू नाहीशी झाली. तीच गत चित्रकथी या प्रकारची. चित्र समोर दाखवून त्यानुसार कथा सांगण्याचा हा प्रकार जवळजवळ लुप्त झाला.


कोकणी लोककला

पण कितीही संकटे आली तरीसुद्धा आपली लोककला जिवंत ठेवण्याचे अवघड काम कोकणी माणसाने करून दाखवलेले आहे. दशावतार हा प्रयोग आता रात्रभर न होता अगदी १ तासापासून ते ३ तासांपर्यंत होऊ लागला. त्यासाठी गावातील तरुण मंडळी पुढे येऊन नवनवीन कल्पना लढवून हा कलाप्रकार सादर करू लागले. मोचेमाडकर, वालावलकर, चेंदवणकर अशी काही प्रख्यात दशावतारी नाटक मंडळी अजूनही या मुलुखात आपले बस्तान बसवून आहेत. अनेक महान कलाकारांनी ही कला मनःपूर्वक जोपासली आणि वृद्धिंगत केली. त्यातले राजाभाऊ आजगावकर, धोंडी महानकर, गंगाराम मेस्त्री, बाबा पालव अशा अनेकांची नावे घेता येतील. बाबी नालंग या कलाकाराला तर महाराष्ट्र सरकारने त्यांच्या दशावतारातील कलेबद्दल पुरस्कार देऊन गौरवले आहे. इतकी उंची गाठलेला हा कलाप्रकार. दशावताराचे वैशिष्ट्य म्हणजे स्त्री पात्रसुद्धा पुरुषानेच इतके हुबेहूब वठवायचे की लोकांना पुसटशीसुद्धा शंका येत नाही. रामदास स्वामींच्या दासबोधातसुद्धा त्यांनी दशावताराचा उल्लेख केलेला आहे. ते म्हणतात... 

खेळता नेटके दशावतारी, तेथे येती सुंदर नारी|

नेत्र मोडिती कळाकुसरी, परी ते अवघे धटिंगण||”

(दासबोध ६-८-११)

दशावताराचे इतके समर्पक वर्णन दासबोधात आल्यामुळे हा नाट्यप्रकार खूप जुना होता यात शंकाच नाही. त्यामुळे विविध वाहिन्यांची कितीही आक्रमणे झाली तरी आजही तुळशीचे लग्न झाले की गावोगावचे दशावतारी आपल्या डोक्यावर सामानाचे पेटारे घेऊन गावोगाव फिरू लागतात.दशावतारी इलेअशी बातमी चाफ्याच्या फुलाच्या घमघमाटासारखी गावोगावी दरवळते. सारा कोकणी मुलुख मग दशावताराच्या नाटकांची आतुरतेने वाट पाहू लागतो. आजही एवढ्या वाहिन्यांच्या गदारोळात कोकणी माणसाचा जीव जडलाय तो दशावतार याच लोककलेवर.


चित्रकथी

अशीच अजून एक कला म्हणजे चित्रकथी. चित्रकथी म्हणजे कागदावर पौराणिक कथांची चित्रे काढून ती चित्रे समोर धरून त्यावरून कथा सांगणे. कधी कधी त्या चित्राला खाली काठी लावून ती एकाशेजारी एक अशी चित्रे लावून त्यावरून कथा सांगणे. जशीजशी कथा पुढे सरकत जाते, तसतसे त्या कथेच्या अनुषंगाने विविध चित्रे एकामागोमाग प्रेक्षकांच्या समोर येत राहतात. कलाकार ती चित्रे हातात धरून त्यानुसार कथा रंगवत असतो. पूर्णपणे लोप पावलेली ही कला जिवंत ठेवली, वाढवली आणि त्याचा पदरचे पैसे खर्च करून प्रसार केला तो कुडाळजवळच्यापिंगुळीगावच्या श्री. परशुराम गंगावणे या व्यक्तीने. परशुराम गंगावणे यांनी अनेक हालअपेष्टा सहन करून ही कला जोपासली आणि आता पिंगुळीलाठाकर आदिवासी कला आंगणनावाचे ह्या कलेला वाहिलेले सुंदर प्रदर्शन उभारले आहे. राजाश्रय असताना बहरलेली ही कला नंतर नंतर क्षीण होत गेली. परंतु गंगावणे यांनी अवहेलना सहन करीत करीत ही कला टिकवून धरली आणि आता त्यांची मुले सुद्धा या कलेची जोपासना करत आहेत. खास आदिवासी उपकरणे, वाद्ये, पोशाख, हिरोबा, चित्रकथीसाठी वापरली जाणारी चित्रे आदींचे सुंदर प्रदर्शन पिंगुळीला ठाकर आदिवासी कला केंद्रात मांडलेले आहे. कलेचे एक विस्मयकारक दालनच आपल्यासमोर खुले होते. काही ठराविक शुल्क देऊन हे प्रदर्शन पाहता येते. त्याचबरोबर इथेच कळसूत्री बाहुल्यांचे खेळ सुद्धा दाखवले जातात.

कोकणी लोककला

यांच्यासोबतच आजही शिमगा, गणपती हे उत्सव कोकणात पारंपारिक पद्धतीनेच साजरे होतात. कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरीही यावेळी आपल्या घरी न चुकता जातोच. त्यावेळी होणारे भजन-कीर्तन, नाटके आजही कोकणी माणूस आवर्जून बघतो. आधुनिक वाहिन्यांच्या गराड्यातून स्वतःला लांब ठेवतो आणि या लोककलेशी असलेली आपली नाळ अजून मजबूत करतो. मनोरंजनाची आधुनिक साधने कोकणी माणसाच्या हृदयात घट्ट बसलेल्या या लोककलांची जागा कदापीही घेऊ शकणार नाहीत हेच यातून दिसून येते. काळ बदलला तर लोककलांचे स्वरूप काहीसे बदलले जाईल मात्र त्यांचे अस्तित्व हे कोकणच्या पाठीशी उभ्या असलेल्या सह्याद्रीइतकेच मजबूत असेल यात शंका नाही.


आशुतोष बापट



 

No comments:

Post a Comment