शक्तीची उपासना आदिम काळापासून जगभर सुरू
आहे. तिचे स्वरूप वेगवेगळे असेल, तिची नावे वेगवेगळी
असतील, परंतु शक्ती, सामर्थ्य यांचे
पूजन सर्वत्र लोकप्रिय आहे. शक्तिपूजेला कोणतेही भौगोलिक बंधन नाही. इतिहासात
कुषाण राजांच्या नाण्यांवर विविध रूपातील देवींचे अंकन आपल्याला पाहायला मिळते.
ग्रीक राजांच्या नाण्यांवरसुद्धा ती ‘ओर्दोक्शो’ च्या आणि ‘नना’ च्या रूपात
दिसते. लक्ष्मीशी खूपच साधर्म्य असलेल्या ओर्दोक्शो या देवीमुळे शक्तिपूजेचे
भारताबाहेरील स्वरूप लक्षात येते.
देवीची अनेक रूपे आपल्याला भारतभर
दिसतात. तिच्याशी अनेक कथा निगडित असतात. या कथांवरून तयार झालेली शिल्पकलासुद्धा
आपल्याला विविध मंदिरांवर बघायला मिळते. प्रजनन आणि सुफलन याचे प्रतीक असलेली
लज्जागौरीची मूर्ती ही तर अत्यंत आगळीवेगळी मूर्ती म्हणावी लागेल. स्त्रीच्या
योनीची पूजा आणि तिची उपासना ही आपल्या देशात विविध ठिकाणी केलेली आजही बघायला
मिळते. गुवाहाटी इथली कामाख्या देवी हे योनीचे प्रतीक म्हणूनच पूजली जाते.
जीवसृष्टीची उत्पत्ती जिथून झाली त्याची देवीरूपाने पूजा करण्याची थोर परंपरा
आपल्याला यादेशी प्रकर्षाने दिसते. दक्षिण कोंकणात सातेरी या नावाने पुजली जाणारी
देवी म्हणजे प्रत्यक्षात एक वारूळ असते. वरीलप्रमाणेच वारूळ हे सुद्धा योनीचेच
प्रतीक समजले गेले आहे. अशी अनेक चित्रविचित्र वैशिष्ट्ये आपल्या देशात बघायला
मिळतात. या चराचरात अस्तित्वात असलेली देवी आपल्यासमोर मूर्तिरूपात येऊन उभी
राहते. यातल्या दोन आगळ्यावेगळ्या देवी आपण इथे बघणार आहोत.
हिंगुळजा देवी
अतिशय आगळी वेगळी आणि आजच्या
पाकिस्तानातून आपल्याकडे आलेली एक देवी पण आहे बरं का! आणि तिचं नाव हिंगुळजा
देवी. हे वाचून काहीतरी भलतंसलतं लिहिलंय असं वाटलं ना? या दोन गोष्टींचा काहीतरी संबंध असेल तरी का अशी शंका मनात
येणं अगदी स्वाभाविक आहे. पण गंमत अशी की ही गोष्ट अगदी खरी आहे. यात अजिबात
अतिशयोक्ती नाही. खरंतर भारतात राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र इथे या देवीची ठिकाणं आढळतात. महाराष्ट्रात कोल्हापूर
जिल्ह्यातल्या गडहिंग्लज या तालुक्याच्या ठिकाणी या हिंगुळा देवीचे मंदिर आहे.
पुराणातील प्रसिद्ध कथेनुसार राजा दक्ष याने आपल्या यज्ञात आपलाच जावई शंकराला
बोलावले नाही. शंकराच्या पत्नीला, सतीला हा अपमान सहन न
झाल्यामुळे तिने त्या यज्ञातच उडी घेतली. परंतु तिचे शरीर जळाले नाही. उद्विग्न
झालेल्या शंकराने ते शरीर पाठीवर टाकले आणि तो मार्गक्रमण करू लागला. त्या शरीराचे
विविध अवयव पृथ्वीवर अनेक ठिकाणी पडत गेले. ज्या ज्या ठिकाणी ते अवयव पडले त्या
त्या ठिकाणी शक्तिपीठे तयार झाली. त्या कथेनुसार तिचे शिर जिथे पडले ते स्थान
आताच्या पाकिस्तानात बलुचिस्तान या प्रांतात आहे. कराचीच्या वायव्येला सुमारे २५०
कि.मी. वर बलुचिस्तान प्रांतातल्या मकरान टेकड्यांच्या प्रदेशात हिंगोळ नदीच्या
काठावर एका गुहेमध्ये नानीबीबी किंवा हिंगुळजादेवी हे हिंदूंचे पवित्र क्षेत्र
वसलेले आहे.
तीच हिंगुळा देवी गडहिंग्लज इथे गुड्डाई
देवी म्हणून आली. एका छोट्याशा टेकडीवर वसलेले हे मंदिर आहे. हिंगुळा देवीचा गड
म्हणून गडहिंग्लज अशी या गावाच्या नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. गुजरातमधील
सोनारकाम करणाऱ्या पराजीया सोनी जातीची ती कुलदेवता आहे. याच जातीमधील एक पुरुष
हुकुमीचंद याला देवीने सुवर्ण कारागिरी शिकवल्याची कथा सांगितली जाते. तर स्थानिक
समजुतीनुसार हिंगाचा व्यापार करणाऱ्या बलुची व्यापारी मंडळींबरोबर त्यांची ही देवी
गडहिंग्लज या ठिकाणी आल्याचे सांगतात. ही देवी हिंगाचा व्यापार करणाऱ्या
मंडळींसोबत इकडे आली असे सांगितले जाते. त्यामुळे ह्या देवीचे स्थान आणि व्यापारी
पेठ यांचे समीकरण नक्कीच जुळते. ही व्यापारी मंडळी मोठी व्यापारी पेठ असलेल्या
ज्या ठिकाणी गेली, तिथे त्यांनी त्यांची ही
देवी प्रस्थापित केली.
हिंगुळा देवीचे अजून एक मंदिर
मराठवाड्यातील 'तेर' या प्राचीन
व्यापारी केंद्र असलेल्या ठिकाणी, तर राजस्थानमध्ये 'हिंगलाजगढ' या ठिकाणी आहे. कर्नाटकातील गुलबर्गा
जिल्ह्यात देखील ही हिंगुळादेवी असून तिथे तिला ‘चंदला
परमेश्वरी’ अशा नावाने संबोधले जाते. गडहिंग्लज गावाला
लागूनच असलेल्या छोट्या टेकडीवर हे मंदिर आहे. मंदिरामध्ये देवीची पाषाणरूपातली
मूर्ती आहे. या डोंगरावरून खाली आले की भडगावमध्ये नाईक यांच्या घरात याच देवीचे
ठाणे आहे. तिथे मात्र देवीची चार हाताची मूर्ती आहे. मूर्तीच्या हातात मशाल,
कमल अशी आयुधे असून डोंगरावर असलेली गुड्डाई चालत या ठिकाणी आली असे
सांगतात. विविध कथा आपल्याभोवती घेऊन जगदंबा निरनिराळ्या रूपात आपल्या आजूबाजूला
वसलेली आहे. गरज आहे जरा आडवाट करून तिचे मुद्दाम दर्शन घेण्याची.
हरगौरी
पार्वती ही कधी उमा असते तर कधी ती गौरी असते. तिच्या ह्या रूपांतील फरक
मूर्तींमध्ये बघायला मिळतो. मूर्तिकारांनी अतिशय कौशल्याने आणि नेमकेपणाने हा फरक
दाखवलेला आहे. जेव्हा पार्वती ही गौरी रूपात दाखवायची असते तेव्हा तिच्या पायाशी
तिचे वाहन म्हणून गोधा किंवा घोरपड आवर्जून दाखवली जाते. घोरपड चिवटपणासाठी
प्रसिद्ध आहे. एखाद्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी कठोरातील कठोर तप करण्याचे
सामर्थ्य हे घोरपडीच्या रूपाने दाखवले जाते. शिवाच्या प्राप्तीसाठी पार्वतीने अशीच
घोर तपश्चर्या केलेली होती. तिचा हा चिवटपणा, गोधेच्या
रूपात दाखवला जातो. रूपमंडन या ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे म्हणजे ‘गोधासना भवेत् गौरी’ या वचनानुसार गौरी ही गोधासना,
चार हात, तीन डोळे, आणि आभूषणांनी
युक्त असावी असे म्हटले आहे. गौरी कधी घोरपडीवर उभी असल्याचेही दाखवले जाते.
अशीच एक सुंदर आणि देखणी हरगौरी लातूर जिल्ह्यातल्या निलंगा गावातील
नीलकंठेश्वर मंदिरात पाहायला मिळते. निलंगा येथील नीलकंठेश्वर मंदिर हे त्रिदल
पद्धतीचे मंदिर आहे. मंदिराच्या बाह्यांगावर सुरसुंदरींच्या मोहक प्रतिमा पाहायला
मिळतात. मुख्य गर्भगृहात शिवपिंडी असून उजवीकडील गर्भगृहात उमा-महेश्वर आलिंगन
मूर्ती दिसते. शिवाच्या डाव्या मांडीवर देवी बसलेली असून शिवाचा डावा हात तिच्या
डाव्या खांद्यावर ठेवलेला दिसतो.
परंतु इथेच एक अजून वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे शिव आणि पार्वती ज्या पीठावर
बसलेले दाखवले आहेत त्याच्या पायाशी एका घोरपडीचे शिल्प कोरलेले आहे. शंकर व
गोधासना पार्वती अशा ह्या निलंग्यातील प्रतिमेला शिवपार्वती असे न म्हणता हरगौरी
प्रतिमा असे संबोधले जाते. शिव म्हणजे हर आणि पार्वतीची होते गौरी. ह्या अशा
हरगौरी प्रतिमा खूपच दुर्मिळ आहेत. या अत्यंत देखण्या प्रतिमेवर दक्षिण भारतातल्या
शिल्पकलेची छाप पडल्याचे जाणवते. हिंदू विवाह पद्धतीत गौरीहराची पूजा करण्याचा
विधी प्रामुख्याने केला जातो. त्यामागे देखील घोरपडीच्या चिवटपणाचेच तत्त्व सांगितले
आहे. पती-पत्नींनी एकमेकांशी एकनिष्ठ राहावे हे या विधीमधून सुचवायचे असावे.
तत्त्वज्ञानाचा मूर्तिकलेवर तसेच समाजजीवनावर पडलेला प्रभाव इथे प्रकर्षाने
जाणवतो. अशीच हरगौरीची एक सुंदर प्रतिमा हळेबिडू इथल्या होयसळेश्वर मंदिरावर
आपल्याला बघायला मिळते.
आशुतोष बापट
No comments:
Post a Comment