क्रिकेट हा माझा
आवडता खेळ. लहानपणापासून टीव्हीवर क्रिकेट पहात मोठा झालो. मोठ्या काकांचा मुलगा
'महेश' दादा क्रिकेटचे किस्से सांगायचा. आई सुद्धा गोडीने विचारायची "आप्प्या,
भारत × पाकिस्तानची मॅच आहे का रे? सचिन खेळतोय का? शिखडी (भज्जी) आहे ना? सरळ नाकाचा,
शांत स्वभावाचा, कर्नाटकाचा आहे, तो कोण?" (द्रविड). तिचं कर्नाटक प्रेम कधी
लपून राहीलं नाही, क्रिकेट खेळात सुद्धा. सचिन, गांगुली, लक्ष्मण, कुंबळे, झहीर, भज्जी,
श्रीनाथ असे दिग्गज खेळाडू क्रिकेटच्या मैदानात चमकत होते. पण या झगमगाटाकडे पाठ करून
फक्त बॅटिंग, किपिंग, स्लिप मध्ये जीव ओतुन, आतून स्वयंप्रकाशित होणारा 'द्रविड'
Team work is always better than personal records हे सिद्ध करून दाखवत होता.
क्रिकेटचं व्यसन लागलं
२००७ च्या विश्वचषकाच्या दरम्यान. २००३ मध्ये फारच लहान होतो, पण पंटर(पॉंटिंग)ने
भारताच्या तोंडून घास हिसकावून घेतला, इतकं मात्र आठवतं. तिथून पुढे टेस्ट असेल किंवा
ODI पाहत राहिलो नियमित, त्यात कधी खंड पडला नाही. दादाची दादागिरी असेल, सचिनची रेकॉर्ड
ब्रेकिंग खेळी असेल किंवा सेहवागची दहशती बॅटिंग असेल त्यात उठून दिसायचा तो द्रविडचा
संयमीपणा. त्याची सॉलिड फ्रंटफूट डिफेन्स, बॅकफूट डिफेन्स, स्लिप पोजिशन मध्ये घोरपडीसारखं
बॉलला चिकटणं, अर्धशतक-शतक-द्विशतक झालं तरीही चेहऱ्यावरचे शून्य हावभाव, नो सेलिब्रेशन,
मैदानातला शांत संयमीपणा सारेच अचंबित करणारे होते.
२००७ च्या विश्वचषकात,
बहुतेक उन्हाळा होता. जतमध्ये लोडशेडिंग असल्या कारणाने वीज नसायची. तीही पाच-सहा
तासासाठी. त्यावेळेस स्मार्ट फोन सारख्या स्मार्ट गोष्टी नव्हत्या. रेडिओ लावून कॉमेंट्री
ऐकायचो. विजेची बोंब, वर्ल्ड कपची मॅच पाहायला न मिळणं आणि भारताचा झालेला दारुण पराभव
तसंच साखळी फेरीतून झालेली एक्सिट सगळं एकदम जिव्हारी लागण्यासारख होतं, कॅप्टन द्रविडला
सुद्धा. पण तो डगमगला नाही, हार मानली नाही, सावरला, पुन्हा उभा राहिला आणि विदेशात
जाऊन कसोटी मालिका जिंकला, एक संघनायक म्हणून.
खऱ्या अर्थाने द्रविड
समजू, उमजू लागला नववी, दहावी आणि डिप्लोमा मध्ये. शाळेमध्ये 'निबंध' आणि डिप्लोमामध्ये
प्रोफेशनल प्रॅक्टिस या विषयामध्ये 'रोल मॉडेल' अतिशय रटाळवाणे, ओढून ताणून लिहायचे-बोलायचे
विषय. जिथे humble, disciplined, passionate ह्या शब्दाचा अर्थ पाठ करायचो, तिथे हा
द्रविड या शब्दांचा प्रॅक्टिकल अप्रोच दाखवायचा. कोवळ्या डोळ्यात मोठी स्वप्नं घेऊन
फिरणाऱ्या माझ्यासाठी मी परफेक्ट रोल मॉडेल शोधला होता. यशस्वी व्हायला नीतिमूल्ये
गाडून सोनेरी चादर पसरायची गरज नसते, हे तो त्याच्या वागणूकीतून स्पष्टपणे दर्शवत
होता. एक रोल मॉडेल म्हणून तो सर्वगुणसंपन्न आहे. आयुष्यात कितीही जरी मोठी संकटं
आली, आणि आपले सहकारी शरणागती पत्करत असताना, एका योद्धयासारखं कसं लढायचं हे 'धीरगंभीर'
द्रवीडने २०११ च्या इंग्लड टेस्ट सिरीज मध्ये सिद्ध करून दाखवलं.
आपला संघ दारुण, सडकून
पराभूत होताना ४६१ धावा फटकावत मालिकावीर झाला. संपूर्ण मालिकेत *Sole warrior* होऊन
लढला. कधी ओपनर, कधी वन डाऊन, कधी किपर, कधी स्लिप मध्ये, कधी lower order मध्ये फलंदाजी करत संघाचा *Backbone* बनून राहिला.
टीव्ही मुलाखतीत, मुलाखत घेणारा त्याच्या खेळीचं, कामगिरीचं कौतुक करताना, स्वतःपेक्षा
इतरांच्या कामगिरीचं कौतुक करताना त्याचा नि:स्वार्थी स्वभाव दिसला. यशाची पायरी सर
करून, सार्वजनिक ठिकाणी, समाजात वावरताना *'Ground to earth'* दिसला. मीडियामध्ये
होणाऱ्या उलट सुलट चर्चेवर दुर्लक्ष करत त्याने *'Strength of mind'* दाखवून दिली.
द्रविड एक सच्चा माणूस
आहे, त्यातच त्याचं वेगळेपण आहे. त्याचा हा वेगळेपणा जास्त भावतो, मनाला भिडतो आणि
स्तिमित करतो. सृष्टीकर्त्याने 'Gentleman' हा शब्दाचा अर्थ उमजून देण्यासाठी, वेळातवेळ
काढून, निवांतक्षणी द्रविडला घडविला असावा.
Here’s
to wishing this epitome of class, long life, and health.
Happy
Birthday, Rahul Dravid!
प्रतिक सुरेश सुतार
No comments:
Post a Comment