किस्सा ड्रेस्डेनचा



ड्रेस्डेन हे जर्मनीच्या पूर्व भागात असलेल्या Saxony प्रांताच्या राजधानीचे ठिकाण आहे. तेथील सुंदर परिसर आणि संग्रहालयांमुळे त्यांस Elb वरील फ्लोरेन्स पण म्हणत. द्वितीय महायुध्दापूर्वी हे शहर कॅमेरे, टाईपरायटर व इतर हलक्या अभियांत्रिकी उद्योगासाठी प्रसिद्ध होते, परंतु युद्ध सामुग्री तयार करणारा कोठलाही कारखाना तेथे नव्हता. संयोगाने १९३९ ते १९४४ पर्यंतच्या महायुद्धातील पांच वर्षात हे शहर जीवित-वित्त हानीपासून अबाधित राहून आपले सौंदर्य जपून होते.  

पार्श्वभूमी :
१)द्वितीय महायुद्धातील "परिसर बॉम्बफेक" (Area/Saturation bombing) : ह्या पद्धतीत बॉम्बफेकीला सामरिक उद्देशापुरते मर्यादित न ठेवता इतर कारखाने, नागरीवस्त्या, किंबहुना संपूर्ण परिसर नष्ट करण्यावर भर देण्यात येई. तसे केल्याने शत्रूची लढण्याची इच्छाशक्ती खच्ची होईल असे ह्या पद्धतीचे समर्थन केले जात होते. जर्मनांनी अशा प्रकारचा बॉम्बवर्षाव, १९३९ मध्ये पोलंडवर करून एका महिन्यात त्याला शरण आणले होते व तीच पद्दत १९४० मध्ये लंडन साठी वापरली होती.
आता १९४२ मध्ये लंडन, कॉव्हेन्टरी आणि इतर शहरांत झालेल्या संहाराच्या परतफेडीची पाळी दोस्तराष्ट्रांची होती. बॉम्बर कमांडचे मुख्य असलेल्या एअर चीफ मार्शल आर्थर हॅरिस ह्यांची जर्मनांना धडा शिकविण्याची मनीषा होती. पण अशा प्रकारे बॉम्बिंग करून मोठ्या प्रमाणात जर्मनीत अनावश्यक जीव हानी केल्याचा निर्णय दोस्तराष्ट्रांनी आत्तापर्यंत स्वीकार केला नव्हता.
(संयोगाने ह्या हॅरिस महाशयांचा जन्म, त्यांचे वडील भारताच्या मुलकी सेवेचे अधिकारी असल्यामुळे माझ्या जन्मगांवी, ग्वाल्हेरला झाला होता.)

२) फेब्रुवारी १९४५ पर्यंत जर्मनी दोस्तराष्ट्रांच्या विळख्यात पूर्णपणे अडकलेले होते. पश्चिमेकडून अँग्लोअमेरिकेन सैन्याने ऱ्हाईन नदी ओलांडून जर्मनीत प्रवेश केला होता तर पूर्वेला रशियन सैन्य ओडर नदीकाठी, बर्लिनपासून ५० मैलांवर आलेले होते. जर्मनीवरील आकाश संपूर्णपणे दोस्तांच्या आधिपत्याखाली होते व जर्मनीचा पराभव अटळ होता. तसा तो पुढील तीन महिन्यांत झाला देखील. अशा प्रकारे परिसर बॉम्बफेकीचे कोठलेही सामरिक औचित्य उरले नव्हते.

३) फेब्रुवारी ४ ते ११ दरम्यान Roosevelt, Churchill आणि Stalin ह्या तीन बड्या नेत्यांमध्ये रशियातील Yalta ह्या गावीं चर्चा होऊन युद्धोत्तर जर्मनीची विभागणी करण्याच्या योजनेवर शिक्कामोर्तब झाले. ह्या महत्वाच्या राजकीय निर्णयाच्या घाईत सामरिक विषयांवर पूर्ण चर्चा होऊ शकली नाही पण रशियन सैन्याला मदत म्हणून जर्मनीवर हवाई हल्ले सुरु ठेवण्यास चर्चिल आणि Roosevelt यांनी होकार दिला.


ड्रेस्डेन वरील बॉम्बफेक :
फेब्रुवारी १९४५ पर्यंत, रशियन सैन्यापासून जीव वाचवण्यासाठी, पूर्वेकडून बरेच जर्मन नागरिक ड्रेस्डेन मध्ये जमा झाले होते. त्यामुळे शहराच्या लोकसंख्येचा अन्दाज अधिकाऱ्यांना नीटपणे नव्हता. तसेच हिटलरने आपली सर्व शक्ती रशियन मोर्च्यावर लावल्यामुळे शहरात फार थोडी कुमक होती. हवाई हल्ला परतविण्याची क्षमता तर अगदीच नगण्य होती.
फेब्रुवारी १३च्या रात्री ब्रिटनच्या विमानांनी ड्रेस्डेनवर तुफान बॉम्बफेक सुरूकेली. सकाळपर्यंत ८०० बॉम्बरांनी ११०० टन ज्वालाग्राही व १४००टन च्च स्फोटक बॉम्ब शहरावर टाकले. त्यामुळे लागलेल्या आगी इतक्या भयंकर होत्या, की परिसरातील हवेतील प्राणवायू कमी होऊन एक प्रकारचा निर्वात तयार झाला व त्याच्यामुळे सभोवतालची माणसे आगीत अक्षरश: ओढली गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी अमेरिकेच्या आठव्या वायुसैन्याच्या ३०० विमानांनी बॉम्बफेक चालू ठेवीत रस्ते, पूल, नागरी वस्त्या व दळणवळणाची साधने नष्ट केली. पुन्हा १५ फेब्रुवारीला २०० अमेरिकन विमानांनी ९५० टन उच्च स्फोटक व २९० टन ज्वालाग्राही बाँब्सचा शहरावर वर्षाव केला. युद्ध संपेपर्यंत अजून २८०० टन बॉम्ब टाकून ड्रेस्डेनला बेचिराख केले गेले.


उपसंहार :
"आम्ही ड्रेस्डेनवर बॉम्बफेक केवळ तेथील दळणवळणाची साधने निकामी करून रशियन सैन्याला मद करण्यासाठी केली" असे तोकडे समर्थन इंग्लंड व अमेरिकेने केले. ते काही प्रमाणांत खरे असले तरी त्यामुळे ड्रेस्डेनला झालेल्या प्रचंड जीवहानीचे कोठल्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही. ह्या मनुष्य हानीबद्दल देखील मोठी तफावत आहे. युद्धोत्तर काळात विविध तपासयंत्रणांनी आपापल्या राजनैतिक सोयी प्रमाणे ८००० पासून २००००० पर्यंतचा आकडा सांगितला. अजून सुद्धा ३५००० ते १,५०,००० लोकं दगावली असतील असे म्हंटले जाते. त्या वेळेच्या छायाचित्रांकडे पाहून दहा लाख जनसंख्येपैकी फक्त ३५००० लोकच दगावली असतील ह्यावर विश्वास बसत नाही.

पुढील काळात ड्रेस्डेन मधील, Zwinger Palace, Dresden State Opera House आणि काही चर्च पूर्व आराखड्याप्रमाणेच पुन्हा बांधण्यात आले, पण उरलेल्या इमारती जमीनदोस्त केल्या गेल्या. त्यामुळे आजच्या ड्रेस्डेन मध्ये फक्त आधुनिक इमारती बघायला मिळतात.


दिलीप कानडे


संदर्भ:
१. Dresden: by Frederick Taylor.
२. Google search


No comments:

Post a Comment