दिवा जळत राहतो
प्रकाश देत राहतो
जनहितासाठी कसा
स्वतःलाच संपवतो…
दोन दिवसाचे जिणे
सुमनास लाभलेले
तरीपण आनंदात
दिसणार जगलेले…
पाण्यामध्ये मिसळून
माती होते एकजीव
तेव्हा आकार मिळतो
मूर्ती भासते सजीव…
घाव सहन करतो
तेव्हा हिरा चमकतो
सगळ्यात शोभिवंत
फक्त हिराच दिसतो…
न्याहाळून बघताना
दुःख माझे वाटायचे
सर्वांपेक्षा सान माझे
मला कर्म दिसायचे…
त्याग नाही, हर्ष नाही
नाही ऋणाची जाणीव
लोभापायी मज नाही
आली दुसऱ्याची कीव …
दुःख स्वतःचे स्वतःच
रोज बघत जायचो
एकट्यात अश्रुधारा
गाळताना भिजायचो…
आज केले निरीक्षण
तेव्हा कळून चुकले
विश्वातील चराचर
माझे शिक्षक बनले…
आता दुःख नाही माझ्या
कधी मनाला छळत
आहे जगतो अजय
प्रेम सर्वांशी करत …
शब्दसखा (अजय चव्हाण)
No comments:
Post a Comment