"हे काय चाललंय गं? एका मागोमाग
एक स्फोट झाल्यासारखे बायका त्यांच्या पूर्वायुष्यात घडलेल्या शोषणाच्या घटना सोशल
मिडीयावर सांगतायत. कुणी दहा वर्षांनंतर, तर कुणी तब्बल वीस
वर्षांनंतर मौन तोडून बोलायचं धैर्य दाखवतंय. ह्याला काय म्हणायचं? किती भयंकर आहे हे सगळं." मी न राहवून
तिच्याकडे विषय काढला.
"हो रे. खूप डिप्रेसिंग आहे सगळं एकूणच वातावरण. पण
माझं ह्यावर जरा वेगळं मत आहे.", ती म्हणाली.
"वेगळं? म्हणजे? काय चुकीचं आहे ह्यात?" -मी.
"तुला मी कॉलेजमधे असतानाचा ट्रेनचा किस्सा सांगितलाय
का माहित नाही. आम्ही सगळ्या मुली स्टेशनला ब्रिजवर चालताना समोरून एका माणसाने
मला अतिशय घाणेरडा धक्का मारला. मी जरा हादरले क्षणभर, पण
दुसऱ्याच क्षणी मी कसलाही विचार न करता हातातली छत्री त्याच्या डोक्यावर हाणली.
तिसऱ्या क्षणी माझ्या मैत्रिणी आणि इतर बायका त्याच्यावर तुटून पडल्या. तो हलकट
बेदम मार खाऊनच तिथून लंगडत पळून गेला. पुन्हा त्याने तसला प्रकार करायची हिंमत
सुद्धा केली नसेल."
"तुझा हा किस्सा आता चालू असलेल्या घडामोडींहून वेगळा
आहे अगं. इथे ज्यांच्यावर आरोप झाले ते त्या काळात आपापल्या क्षेत्रात खूप मोठे
होते आणि ज्यांनी आरोप केले त्या तिथे नवीन होत्या. त्यांचं करियर पणाला लागलं
होतं. साहजिकच, त्यांचा फायदा घेणं सोपं असणार."
"एक लक्षात घे. ज्या अर्थी त्या मुली त्यावेळी बोलल्या
नाहीत किंवा त्या माणसाला अद्दल घडवली नाही त्या अर्थी त्यांनी त्या क्षणी
स्वतःच्या मानापेक्षा आपली कारकिर्द महत्वाची मानली. प्रॉब्लेम इथे आहे. मला एक
सेकंद लागला त्या माणसाला रिऍक्ट करायला. आणि ते नॅचरल होतं. कुठलीही भिती तेव्हा
माझ्या मनात डोकावली नाही. भिती आणि असुरक्षितता ह्या तडजोडीच्या दिशेने पहिल्या
पायऱ्या आहेत. तुम्ही तेव्हाच पुढे येऊन बोलला नाहीत, म्हणजे
तेव्हा तुम्ही स्वतःशी तडजोड केलीत."
"पटतंय तुझं." -मी.
"अजून एक. ह्या '# मीटू' चळवळीतून भूतकाळातल्या बऱ्याच गोष्टी बाहेर येतायत. पण एक अशी 'मीटू' चळवळ व्हायला हवी जिथे मुली, बायका तिथल्या तिथे अशा नराधमांना शिक्षा देतील आणि त्यांचा पर्दाफाश
करतील, पुरावा अथवा साक्षीदारासकट. इराक मधल्या नादिया
मुरादकडे पर्याय नव्हता. ती आयसीसच्या कचाट्यात सापडली होती. परवा तिला नोबेल
प्राइझ जाहीर झालं. आम्हाला 'नोबेल'सारखेच
'रिबेल'(बंडखोर) आदर्श सुद्धा हवेत."
"नवरात्रीला चाललीस?" मी
विचारलं. ती तयार होत होती.
"हो रे. आज देवीचं जागरण आहे. तिला गाऱ्हाणं घालणार
आहे. आई, आमच्या मनात कायमच जागृत रहा. असे प्रसंग पुन्हा
आमच्या वाट्याला नकोत. जागी रहा आई जागी रहा.'' ती निघून
गेली. मी सुद्धा मनोमन देवीकडे हेच मागितलं.
दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी...
मानस
No comments:
Post a Comment