एक संवाद स्वतःशीच

 


आज देखील सवयीने नेहमीसारखीच पहाटे साडेचारला जाग आली. अंथरूणावर उठून बसलो, सहजच आकाशाकडे नजर गेली. स्वच्छ नितळ आकाशात चंद्रप्रकाश भरून राहिला होता. उठलो, बाहेर टेरेसवर आलो. मस्त अशी हवीहवीशी वाटणारी छान थंड हवा होती. नुकतीच संकष्टी चतुर्थी होऊन गेली होती. बरोबर डोक्यावर असलेला चंद्र अद्यापही आपले सौष्ठव सांभाळून होता. चंद्राच्या बाजूलाच एक चांदणी आपलं तेज दाखवत होती. माझ्या अकराव्या मजल्यावरील टेरेसवर फक्त आणि फक्त दुधाळ चांदण पसरलं होतं. मी टेरेसवर मुद्दामून ठेवलेल्या सेटीवर आरामात बसलो आणि त्या अमृतमय चांदण्याच्या प्रकाशात नहात राहिलो. का कोणास ठाऊक, माझं शरीर माझ्या वयाबरोबर येणाऱ्या साऱ्याच व्याधींना विसरलं होतं. खूप खूप प्रसन्नतेची जाणीव होत होती. स्वत:ला अजून काही हवं आहे, किंबहुना मला अमुकतमुक मिळायला हवं होतं इत्यादी गोष्टी मनात राहिल्याच नव्हत्या.

माझ्या डोळ्यासमोर माझाच तृप्त झालेला चेहरा उभा राहिला आणि संवाद साधू लागला.

ठीक आहेस ना! छान आनंदी वाटतंय ना! मग, आता कोणाची वाट पहायची? चल, निघूया!

कुठं?

ते पाहूया नंतर! आधी बाहेर तरी पड. मोठं छान आयुष्य गेले आहे तुझं. आता आपल्या दोघांच्या मनात कोणाही बाबत असूया नाही, द्वेष नाही, मत्सर नाही. इतकंच काय, कोणाला काही मागावं अशी भावनाच नाही. तर मग आता आपण दोघं फक्त आपल्याकरता जगूया! फक्त इथून बाहेर पडूया! इतकं आयुष्य जगल्या नंतर, मोठ-मोठ्या विचारवंतांचे विचारधन ऐकल्यानंतर आपल्या लक्षात आलंय, जगण्यासाठी फार काही करावं लागत नाही. आपल्यासाठी दाही दिशा आता मोकळ्या आहेत. कोणतीही दिशा पकडून पुढे पुढे जात राहू! थकलो, दमलो तर कुठल्यातरी मंदिरात बसून राहू, झोपून जाऊ. जवळच्याच कुणी सज्जनानं विचारलंच तर जेवण करू. नाहीच विचारलं तर मागुन बघू. कारण अयाचित राहणं आपल्याला जमणार नाही. दिवस-रात्र येतच राहतील! उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा देखील येत राहील. निसर्ग आपले नियम पाळत राहील. शेवटी आपण देखील निसर्गाचीच लेकरं आहोत ना? गेली आपण जगलेली वर्ष फक्त आपल्यालाच पहात राहिलो. आता निसर्ग पाहूया! नद्या, डोंगर-दऱ्या, समुद्र यांच्यासमवेत राहूया. नक्कीच सांगतो,

हे सारं खूप खूप आनंदमय असेल. आपण आता आपल्या पूर्वजांचे ऐकूया. गृहस्थाश्रम पूर्ण झालाय, आता वानप्रस्थाश्रमात राहूया. ठाऊक नसलेली चित्तशुद्धी करूया.

मी चेहऱ्याला विचारलं, हे मला जमेल?

चेहरा माझ्याकडे पाहून हसला. म्हणाला, वेडा आहेस!

साऱ्याच प्रश्नांची उत्तरं शोधायची नसतात! ती आपोआप मिळतात! थोडासा उशीर देखील होतो, पण मिळतात. तरीपण एक लक्षात ठेव, काही वेळा, नाही कित्येक वेळा, आपल्याला पडलेल्या प्रश्नांचं उत्तर न मिळण्यातच, खराखुरा आनंद असतो, जो आपल्याला आज मिळालाय.

कुणीतरी म्हटलंय दुःख मनात ठेवावं,

आणि आनंद दोन्ही हातांनी लुटावा.

आज आत्ता मनात जे काही आलं ते लिहिलं. का माहिती आहे?

मोकळं मोकळं वाटावं म्हणून! मोकळं झालं की डोळे पाणावतात, किंबहुना पाणावयासच हवेत. कारण, डोळे फक्त दुःखातच बोलत नाहीत, असे नाही, तर आनंदात देखील बोलतात,

जसे, आज माझे बोलले, तसे.

 

श्रीनिवास कुलकर्णी


No comments:

Post a Comment