“मम्मेSS!” लेकीची
ही टिपिकल साद ऐकून माझ्या लक्षात आलं, आज हिची काहीतरी
लाडाची मागणी दिसतेय. एरवी आई म्हणणारी 'मम्मे'वर आली की ओळखावंच! “मम्मे, या
वर्षीचा दिवाळीचा फराळ मी बनवणार”.
“अग, मदत कर मला.
एकदम सगळा फराळ कसा जमेल?” मी समजावून सांगायचा प्रयत्न
केला.
“त्यात काय अवघड असतंय? यूट्यूबवर सगळं मस्त सांगतात.” रश्मीनं मला बोल्ड केलं.
तरी मला रहावेना, “रश्मी, अग अनुभव लागतो ग त्याला. सगळं
चांगलंसं जमायला. आमचं आयुष्य गेलं त्यामध्ये.”
“तेच म्हणते ना, तुम्ही
सगळ्याचं टेन्शन घेता. बघ तरी एकदा.”
“बरं बाई, कर!” परवानगी मिळाल्यावर रश्मी
तयारीला लागली. 'सगळं शॉपिंग
मी करणार हं आई, तू लुडबूड करू नको.” मी
कधीच शरणागती पत्करली होती. त्याच वेळी मनोमन एक निर्धारही केला होता. रश्मीनं
बाबांकडून एटीम कार्ड ताब्यात घेतलं आणि डीमार्ट गाठलं. मोठाल्या पिशव्या भरून
सामान घरी आलं. मी प्लॅस्टिकच्या पिशवीतल्या डाळी लांबूनच बघत होते. “अग, तुरीची डाळ इतकी कशाला आणलीस?”
“म्हंजे काय? शेव-चकली नको का करायला?” डोळे मोठ्ठे करून
रश्मी म्हणाली.
“त्याला हरभरा डाळ लागते.” मी म्हणाले.
“हे काय ग आई? लागलीस
का मिस्टेक्स शोधायला? असू दे, मी हीच
डाळ वापरणार. यूट्यूबवर बघूनच आणलय मी सगळं.” माझा
गुपचुप फराळ तयार करण्याचा निर्धार दृढ झाला.
“आई, पहिल्यांदा
मी शेव करणार.” रश्मीचं डिक्लेरेशन.
“अग, सुरुवात
करताना गोडानं करावी. बेसन लाडू किंवा शंकरपाळी करतो आपण.”
“बघ बाई, पुन्हा उपदेश! मी करते म्हंटलं ना माझ्या मेथडनं.”
“ओके!” म्हणत मी
माझ्या कामाला लागले. रश्मीनं ठरवल्याप्रमाणे पहिल्यांदा शेवच करायला घेतली.
तुरीची डाळ दळून आणली होती, त्यातलं पीठ घेतलं. मोजून-मापून
युट्युब वर पाहून. अलगदपणे पाणी घालून भिजवून ठेवलं. तेवढ्यात आला मैत्रिणीचा फोन.
मग काय, तासभर गप्पा झाल्या. शेव करण्याचं पूर्ण विसरून
गेली. तासाभरानं माझा स्वयंपाक झाल्याचं लक्षात आलं तिच्या. 'पुन्हा बोलू या गं' म्हणून फोन बंद करून शेव तळायला
घेतली..शेव पात्रातून एकसंध काही शेव पडत नव्हती .'नसेना का,
आपण कुस्करूनच घेतो ना खायला’ अशी मनाची समजूत
करून घेतली रश्मीनं, आणि मोठ्या पसरट भांड्यात शेवेचा ढीग
तयार. “बाबा, प्लीज टेस्ट करा ना,” म्हणून बाबांना डिश पुढे केली. यांनी कौतुकानी पहिला घास तोंडात
टाकला आणि डोळे मोठे केले.
“कशी झाली बाबा?”
“ओके, खुसखुशीत.
फक्त देताना काय कर, त्यावर तिखट, मीठ
आणि चाट मसाला भुरभुरून टाक. म्हणजे ए-वन!”
“अय्या, बाबा,
हे मी काही घातलेच नाही. शिल्पाचा फोन आला ना तेवढ्यात, विसरलेच.” हा संवाद ऐकून मी फक्त मान डोलावली.
दुसऱ्या दिवशी रश्मी उठायच्या आधी मी स्वयंपाकही करून ठेवला होता.
“आई, आज मी
रव्याचे लाडू करणार.”
“ ओके. माझी मदत हवी आहे का? नाहीतर मी मीरा काकूकडे जाऊन येणार आहे.”
“आई, खुशाल
जाऊन ये.” युट्युब फॉलो करत रश्मीने लाडू पाकातही
मुरायला घातले. मी येईपर्यंत लाडू वळून पार डब्यात गेले होते. मला डब्याला हातही
लावू दिला नाही. दुसऱ्या दिवशी रश्मीच्या मैत्रिणी आल्या. त्यांना शॉपिंग करायचे
होते. त्यामुळे तो दिवस तसाच गेला. फराळाचे काही बनलेच नाही. त्याच्या पुढचा दिवस
शॉपिंग केलेला ड्रेस बदलून आणण्यात गेला. आल्यावर झोप. आता एक दिवसावर दिवाळी आली,
एका दिवसात काय काय करता येईल हे सर्च करण्यात तोही दिवस गेला.
दिवाळीची पहाट उगवली. रांगोळी झाली, आंघोळी झाल्या. आता फराळ. रश्मीचा चेहरा ईवलुसा झाला. तिने लाडवाचा डबा उघडला. पाहते तो काय? लाडू आहेत की गोल दगड! तिलाच समजेना. हे हसत म्हणाले, “आता खलबत्ता काढा. गोड दगड फोडून खाऊ या.” पण समोर, छान काठापदराची साडी नेसून, दागिने घालून हातात फराळाचे डबे घेऊन आलेल्या मला पाहताच दोघेही खूष झाले. मी चांदीच्या ताटलीत सगळे पदार्थ ठेवले, देवाला नैवेद्य दाखवला आणि हसत म्हणाले, “चला रश्मी, तुझ्या युट्युबवरचा आणि माझ्या मी-ट्यूबवरचा फराळ करू या.”
“आई ग्रेट आहेस! एवढं सगळं कधी केलंस?” “अगं, तू शॉपिंगला गेलीस, उशिरा उठलीस, तेव्हा केलं. रश्मी, या दिवाळीच्या फराळाची गंमतच असते. सुरुवातीला पदार्थ बिघडतातच. सवयीने करून करून जमतं सगळं. तुमचा विश्वास आईच्या ट्यूबपेक्षा युट्युबवर ना!”
“सॉरी आई, नेक्स्ट टाईम तुझ्याच युट्युबवर करेन हां.” रश्मीने आपला पराभव मान्य केला. मी म्हणाले, "युट्युबवर पण बरोबरच सांगतात... पण तुमचं लक्ष कमी पडतं. निम्मं लक्ष शॉपिंग, निम्मं मैत्रिणीच्या फोनकडे, थोडं आरशात डोकावण्यात...”
“हे काय ग आई, सगळंच्या सगळं एक्सपोज करू नको ना. सॉरी म्हटलं ना!”
“ओके ओके!" हे हसत म्हणाले, “चला, हॅप्पी दिवाली! गोड गोड खमंग खमंग खाऊन साजरी करू. रश्मीच्या फराळाची गंमत आपण युट्युबवर सेंड करू.”
No comments:
Post a Comment