‘फराळाची गंमत’ शीर्षक वाचल्यावर मला आमच्या आजीने जुन्या काळातील सांगितलेले काही किस्से आठवतात.
आजी सांगायची, “तेव्हा कडबोळी भाजणी, चकली भाजणी विकत मिळायची नाही. अनारसा पीठही बायका तांदूळ कांडून-कुटून घरी करत असत.
सर्व फराळाचे जिन्नस बायका घरीच हसतखेळत करायच्या. लगेच चव घेता येत नसे. पहिल्या अंघोळीला, म्हणजेच नरक चतुर्दशीला प्रथम देवाला सर्व फराळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवून मगच सगळे फराळ करत असत. आधी मोठी पुरुषमाणसे, घरची, शेजारपाजारची मुले फराळाला बसत. बायका सर्वांत शेवटी असायच्या. मुले आळीपाळीने एकमेकांच्या घरी फराळाला जायची. त्यांना खेळायला जायची इतकी घाई व्हायची की चकल्या, लाडू खिशात भरुन घेऊन जायचे. खेळायच्या नादात खायचे विसरुन जाई. दुसऱ्या दिवशी धुणी भिजवताना सापडले की गोड ओरडा खायला लागायचा.”
आमच्या काळात आम्ही नोकरी करूनही भाजण्या घरीच करायचो. मुलांना गरम गरमची चव आवडते, म्हणून देवाला नैवेद्य दाखवून मुलांना खायला देत असे. आॉफिसमधे शेव, फरसाण, खारी बुंदी, मोतीचूर लाडू ऑर्डरप्रमाणे मिळायचे. ते आणत असू. एखादा वेगळा पदार्थ मुलांना आवडायचा. उप्पीट, पोहे, इडली-सांबार, वडा-सांबार अशी फर्माईश असायची. नातेवाईक, मित्रमंडळी फराळाला यायची. गप्पाटप्पा, चेष्टाविनोद यात फराळाचा फन्ना उडत असे. मुलांना शोभेची दारू उडवायला आवडायची.
आता आमच्या मुलांच्या काळात सगळेच हेल्थ कॉंन्शस झाले आहेत. त्याचे कारणही बरोबर आहे. फार लहान वयात रक्तदाब, साखर वाढलेली दिसून येत आहे. आता सुनाही आयटीमधल्या, त्यामुळे चितळे पॅक्सवर खूप जोर आहे. आता online order करुन घरी फराळाचे तयार येते. कालाय तस्मै नमः म्हणायचे. आता नातेवाईकांना बोलावणे कमीच झाले आहे. एखादा रेडीमिक्सचा पदार्थ आणि आणलेले थोडेफार खाऊनच पोट भरते. आता प्रदूषण टाळण्यासाठी, आरोग्याची काळजी घेण्यासाठी फटाके जवळजवळ बंद झाले आहेत. एखादा सर्वांना आवडणारा सिनेमा बघून फराळाची सांगता होते. मला वाटते पुढच्या लहान मुलांच्या चितळ्यांची चकली छान, काका हलवाईची मिठाई, रसमलाई छान - अशाच छानच्या व्याख्या बनतील.
काळानुसार फराळाचे पदार्थ बदलले तरी सुट्टीची, दिवाळीची, फराळाची गंमत मुलांना वाटणारच आहे. बदल हा जगाचा स्थायीभाव आहे, हे मान्य करायलाच हवे.
सौ. मनीषा चिंतामणी आवेकर
No comments:
Post a Comment