दिवाळी म्हणजे आनंदाला उधाण. सगळ्या सणांची, उत्सवांची राणीच जणू. वर्षभर वाट बघायला लावून ती येते तीच उत्साहाचे खळखळते झरे घेऊन. मग नवीन कपड्यांची खरेदी असो, कंदील, तोरणं, दिवे, रोषणाई असो, सजावट, रांगोळ्या असो, मिठाई-भेटवस्तूंची देवाण-घेवाण असो किंवा स्वयंपाकघरातून दरवळणारा फराळाचा घमघमाट असो; सगळीकडे नुसता आनंद आणि उल्हास!
फराळावरून आठवलं, लहानपणी किंवा नंतरही अगदी लग्न होईपर्यंत आम्ही सगळी भावंडं दिवाळीत आईला फराळ बनवायला अगदी आनंदाने मदत करीत असू. म्हणजे आईने बेसन भाजून साखर घालून छान मिक्स करून दिलं, की लाडू वळायचं काम आमचं. चकलीचं पीठ मळून झालं की कागदावर चकल्या पाडून देण्याचं काम आमचं. तसंच शंकरपाळ्यांची कातणी करून देणं, करंज्यांमध्ये सारण भरून देणं, चिवड्याचे पोहे गाळून देणं, चिवडा मिक्स करून देणं आणि अशीच कामं आम्ही नित्यनेमाने प्रत्येक दिवाळीला करीत असू. त्यामुळे आईला मदत करतांना मी आईबरोबर शिकले आहॆ, मला सगळा फराळ येतो हा प्रचंड आत्मविश्वास मला होता. लग्न झाल्यावरही पहिली काही वर्षे आईकडून आणि सासूबाईंकडून आयता फराळ आला आणि माझ्या मनातला आत्मविश्वास अबाधित राहिला.
पण नंतर नवऱ्याची लांब हैदराबादला बदली झाली आणि प्रथमच फराळाची सगळी
जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. पण माझा आत्मविश्वास सोबतीला होताच, आता फक्त कृतीत उतरवायचा होता. मग काय, लागले कामाला. काय काय करायचं, किती करायचं ह्याचा
हिशोब करून सामान आणून टाकलं. मग कोणत्या दिवशी कुठला पदार्थ करायचा याचं
वेळापत्रकही बनवून झालं. आता फक्त प्रत्यक्ष सुरुवात करायची बाकी होती. प्रथम बेसन
लाडूचा नंबर लागला होता. याआधी बरेच वेळा लाडू वळले होते, पण
बेसन भाजायला मात्र आईने कधीच दिलं नव्हतं. आज पहिल्यांदाच भाजायचं होतं. मग आईचं
बोलणं आठवलं... बेसन मंद गॅसवर बराच वेळ भाजावं लागतं. ठीक आहे, बराच वेळ म्हणजे किती असणार...? मी चांगला अर्धा तास
भाजलं. माझ्या दृष्टीने बराच वेळ झाला होता. मग मी गॅसवरून उतरवलं आणि दुसऱ्या
कामाला लागले.
लाडू वळणं हा तर माझ्या हातचा मळ होता. आज मी माझ्या लाडूंचा फोटो दाखवून
आईला आणि सासूबाईंना सरप्राईज देणार होते. त्या आनंदात भरभर सगळी कामं उरकली आणि
छान लाडू वळले. मस्त पिवळेधमक झाले होते. स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. आता
टेस्टिंगसाठी नवऱ्याची वाट पाहू लागले.
"बघा बघा, माझ्या आणि तुमच्या आईसारखेच छान झालेत की नाही..?" या वाक्याची मनातल्या मनात उजळणीसुद्धा झाली. संध्याकाळी हे आले आणि चहासोबत लाडूची बशी पुढे ठेवली. बघताच स्वारी खूश झाली.... पटकन उचलून लाडू तोंडात घातला... आणि 'वाहवा' ऐकण्यासाठी माझे कान आतुर झाले... पण हे काय? यांचा चेहरा मात्र खाताना वेडावाकडा झाला. एकेक घास फार कष्टाने गिळत होते. मध्येच त्यांनी हळूच माझ्याकडे पाहिले. छान म्हणावं तरी पंचाईत आणि नाव ठेवावं तरी पंचाईत असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. शेवटी मला सस्पेन्स सहन होईना आणि मी सरळ दुसरा लाडू उचलून तोंडात घातला... आणि... पहिल्याच घासाला लक्षात आलं लाडू सगळा टाळूला चिकटला, निघता निघेना. मग यांच्यासारखंच वेडवाकडं तोंड करत, जीभ फिरवत कसातरी लाडू गिळला एकदाचा.
ह्यांनी हुश्श् केलं.... माझं मलाच कळलं होतं त्यामुळे लाडूला नाव
ठेवण्याच्या पापातून यांची मुक्तता झाली होती. मग मात्र ह्यांच्या चेहऱ्यावर
मिश्कील भाव आले आणि ते पाहून नाराज झालेल्या मलाही हसू फुटले. एकूण काय... लाडू
साफ फसले होते, बेसन कच्चंच राहिलं होतं. पण असं
कसं...? मी तर आईने सांगितलं होतं, तसं
बराच वेळ भाजलं होतं. न राहवून मी आईला फोन केला. सरप्राईजचा तसाही बट्ट्याबोळ
झाला होता. ऐकून आईला हसू आवरेना.
"अगं, असं नुसतं बराच वेळ म्हणून वेळ मोजून कसं चालेल? तो बराच वेळ, बेसनाचे प्रमाण, गॅसची ज्योत कमी-जास्त असणं यावर अवलंबून असतो आणि सतत लक्षही ठेवत राहावं लागते. आता तू जितकं बेसन घेतलं तितकं भाजायला मला कधीकधी एक-दीड तासही लागतो. एवढा वेळ तुम्हा मुलांमध्ये संयम नसतो म्हणून तर मी कधीच तुम्हाला बेसन भाजायला दिलं नाही. पण लाडू करायचे, तर या संयमानेच करावे लागणार. नाही तर फसणार हे नक्की."
आत्ता मला कळलं हाच संयम चकली तळताना, करंज्या, शंकरपाळी तळताना, पोहे भाजताना, ठेवावा लागत असणार... म्हणून तर आईने ही कामं आम्हाला कधी सांगितली नाही. पण आता प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर मला कळलं, फराळाचा प्रत्येक पदार्थ करताना, उत्साह, आवड, त्याची माहिती, ही तर असावी लागतेच, पण सगळ्यात महत्त्वाचा असतो तो संयम. म्हणूनच आपल्या मागच्या पिढीतल्या स्त्रियांच्या फराळालाच नाही, तर प्रत्येक पदार्थाला एक वेगळीच चव असायची.
आयुष्य जगताना, संसार सांभाळताना बाळगलेला संयम त्यांना पदार्थ करायला उपयोगी पडत असावा की वर्षानुवर्षं हे सगळे पदार्थ करताना दाखवलेला संयम त्यांना आयुष्यातही कामी येत असावा हे गुपित त्यांनाच ठाऊक. पण मला तरी हा संयमाचा धडा पुढे कायम उपयोगात आला आणि त्यानंतर मात्र माझा कुठलाही पदार्थ बिघडला नाही.
कल्पना राऊत
No comments:
Post a Comment