लिनी घरातली मोठी सून! नवरात्रीची यथासांग पूजा
झाली होती, वर्क फ्रॉम होममधे ऑफिसच्या डेडलाईन्स सांभाळून सगळे करताकरता
कंबरडे मोडले होते तिचे!
दिवाळीचे वेधही नवरात्र संपता संपता लगेचच
लागायला लागले होते.
घरात ह्या वर्षी फराळाचे काय काय करायचे (खरे तर काय नाही!)
ह्यावर महिनाभर आधीच काथ्याकूट सुरू झाले.
“आई, मागच्या वेळेसारखे लाडू नको करूस हं, बाबांच्या दाताची
नवीन बसवलेली कॅपच मोडली होती. चांगला हजाराला खड्डा पडला.
त्यापेक्षा त्या आधीच्या वर्षी केले होतेस ना शिरा कम लाडू, जे शेवटपर्यंत वळलेच गेले नाहीत, तसे केलेस तरी चालतील.”
लीनाच्या पाककौशल्याचे वाभाडे काढत चिरंजीव समीर वदले.
“नाव नको काढूस त्या लाडवांचे,
ह्या वर्षी मी खाणारच नाही ते. माझी आई करायची, तसे नारळ घालून केलेले चविष्ट लाडू खाऊन
जमाना लोटला!” पतिदेव करवादले.
“अहो, ते काहीच नाही, मागच्या वर्षीच्या चकल्या
इतक्या वातड झाल्या होत्या की रबरासारख्या ताणून बसवल्या असत्या तर कपडेही त्यावर वाळत
घालता आले असते. खाण्यासाठी नव्हत्याच त्या! आणि करंजीची तर वेगळीच मजा. लाल तळलेल्या खुळखुळत होत्या आणि पांढऱ्या
निपचित मऊपणे डब्यात पडून होत्या!”
लेक फिस्कारली!
सगळ्यांच्या कमेंट्स ऐकुन लिनीला रडूच
आले! मागच्यावर्षी ऑफिस सांभाळून तिने केलेले फराळाचे पदार्थ एवढेही काही वाईट झाले नव्हते. अगदी तिच्या सुगरण सासूबाईंसारखे नसले
तरी अगदी टाकाऊ पण नव्हते.
लगेचच तिने सांगून टाकले की ह्या वर्षी
ती कोणतेही फराळाचे पदार्थ करणार नाही.
सगळे एकदम चमकले. आपल्या सगळ्यांचेच बोलणे तिच्या मनाला
खूप लागले हे त्यांच्या लक्षात आले. सगळ्यांनी सारवासारव करायला सुरुवात केली.
प्रशांत, तिचा नवरा म्हणाला,
“जरा गंमत केली गं, एवढे मनाला लावून घेऊ नकोस,
कर तू सगळे, आम्ही खाऊ. काय रे पोरांनो?” अन् त्याने डोळे मिचकावले!
ते पाहून लिनी म्हणाली, “ठीक आहे. ह्या वेळी आपण सगळे मिळून करू या. आता युट्युब मदतीला आहेच, प्रत्येकाने एकेक पदार्थ करू या. तुम्हालाही मजा येईल आणि ते करण्यातले कष्टही कळतील. कमी-जास्त जरी झाले तरी तुमचा पहिलाच प्रयत्न आहे हे समजून मी तरी नावं ठेवणार नाही. मुलांनो तुम्हीही आता व्यवस्थित मोठे झालेले आहात. तेव्हा प्रशांत, तू आणि समीरने मिळून लाडू करायचे, शिरा झाला तरी चालेल, आणि सानियाने चकल्या करायच्या. मी करंज्या करेन!” आता तिने डोळे मिचकावले!
आपल्यावर बाजू उलटलेली बघून सगळ्यांना तिच्या म्हणण्याला दुजोरा देण्यावाचून
दुसरा पर्यायच उरला नाही.
सगळे माना खाली घालून आपापल्या खोल्यांत
पसार झाले. पण आज सगळ्यांच्या डोळ्यात अंजन पडले
होते. निदान आपापली जबाबदारी
त्यांच्या लक्षात आली होती!
पहिल्यांदाच लिनीच्या मनावरचा ताण हलका
झाला,
तिच्या मनात विचार आला, खरंच इतक्या दिवसात सगळ्यांची
मदत घेण्याचा विचार कसा काय आला नाही आपल्या मनात? सगळी आपलीच जबाबदारी असल्यासारखे सारखे
खपत राहिलो, आणि तरी कोणालाही त्या कष्टांची किंमत नव्हती. आता कळेल प्रत्येकाला, असं मनात
म्हणत हसून तिने लॅपटॅाप उघडला!
रेवती कुलकर्णी
No comments:
Post a Comment