गझल सम्राट - सुरेश
भट
गझल आणि सुरेश भट हे दोन विषय कधीच एकमेकांपासून विभक्त होऊ शकत नाहीत. मराठी गझलसाम्राज्याचे अनभिषिक्त सम्राट म्हणून सुरेश भटांना ओळखलं जातं. सुरेश भटांनी मराठी साहित्यक्षेत्रात गझल रुजवली, तिची एक प्रतिष्ठित काव्यप्रकार म्हणून ओळख निर्माण करून दिली. त्यामुळेच, 'ग गझलेचा' हे सदर ह्या गझलसम्राटाच्या गझलेच्या रसग्रहणाशिवाय अपूर्ण राहील.
सुरेश भटांची एखादी चांगली गझल रसग्रहणासाठी
निवडणे म्हणजे, रात्रीच्या निरभ्र आकाशातील कोणता तारा
सर्वात जास्त सुंदर दिसतो आहे हे निवडण्यासारखे आहे. सुरेश भटांच्या
कमालीच्या ताकदीच्या लेखणीतून उतरलेल्या सर्व गझला स्वतःचे वेगळेपण जपत समान आशय सौंदर्याने लुकलुकतात. अशाच एका सुंदर गझलेतील निवडक चार शेरांचे सौंदर्य आज आपण उलगडत
आहोत.
कोण जाणे कोण हे जवळून
गेले?
चांदणे रक्तामध्ये मिसळून
गेले!
एखाद्या व्यक्तीचा सहवास इतका सुखद असू शकतो
की, जणू काही रक्तामध्ये चंद्राचे शीतल चांदणे मिसळून जात शांततेच्या
अनामिक सुखाचा अनुभव येतो. एखाद्या सौंदर्याचे कौतुक करण्यासाठी
ह्यासारखे नितळ शब्द हेच असू शकतात! चांदण्यात फिरताना होणारी
अनुभूती आणि त्यावरून व्यक्तीच्या सान्निध्याला अंगात भिनलेल्या चांदण्याची उपमा देणे,
हा विचारच प्रचंड सुंदर आहे.
भेटण्यासाठी कुणी आलेच
नाही...
लोक आलेले मला चघळून गेले!
जेव्हा माणसाच्या आयुष्यात कठीण परिस्थिती
येते तेव्हा त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी गरज असते ती खंबीर आधाराची. प्रत्येकाकडे संकटांवर मात करण्याची ताकद असते, पण गरज असते ती धीरोदात्तपणे पाठबळ देणाऱ्या जवळच्या व्यक्तींची. पण दुर्दैवाने आजकाल वाईट परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीच्या मदतीसाठी न येता,
परिस्थितीवर चर्चा करून ती चघळत बसण्यामध्येच बऱ्याच जणांना स्वारस्य
असते.
या दुपारी मी कुणाला हाक
मारु?
ओळखीचे चेहरे वितळून गेले!
आधीच्या शेराच्या अर्थाच्या जवळ जाणारा हा
पुढचा शेर, साध्याशा शब्दांमध्ये बरेच काही सांगून
जातो. कठीण काळी वास्तवाचे दाह बसत असताना, ज्या व्यक्तींकडे आपण आधाराच्या अपेक्षेने पाहतो, ते सुद्धा जर दूर गेले तर
हाक मारायची तरी कोणाला हा प्रश्न भेडसावतो.
कोणता कैदी इथे कैदेत
आहे?
रंग भिंतींचे कसे उजळून
गेले!
मावळतीचा सूर्य पश्चिमेच्या कैदेत जरी असला
तरी, त्याच्या स्वयंप्रकाशाने उजळून निघालेल्या आसमंतांच्या भिंती
त्याचे महत्व किंवा सौंदर्य लपवून ठेवू शकत नाहीत. चिखलातसुद्धा
कमळ उमलते, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीची प्रतिभा कितीही कैद
करायची ठरवली, तरी ती कधी ना कधी जगासमोर येतेच.
अत्यंत आशयघन शेरांनी नटलेली आणि जीवनातल्या
विविध परिस्थितींचा आढावा घेणारी ही गझल सुरेश भटांच्या इतर गझलांसारखीच मनाचा ताबा
घेते.
कल्याणी आडत
No comments:
Post a Comment