ग गझलेचा- रसग्रहण ७

 "तू झडती घे…."



सुरेश भटांनंतर मराठी गझलक्षेत्रात न चुकता घेतले जाणारे नाव म्हणजे इलाही जमादार. कोहिनूर--गझल असा किताब देऊन ज्यांना रसिकांनी प्रेमाने गौरवले, ज्यांच्या गझला डोक्यावर घेतल्या आणि ज्यांनी आपल्या लेखणीने मराठी गझलविश्व समृद्ध केले असे इलाही जमादार. 'अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा' ह्या सुप्रसिद्ध गझलेतून भेटणारे जमादार, जेव्हा 'जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला, केलेत वार ज्याने तो मोगरा असावा' ह्या शेराद्वारे जखमांनादेखील सुगंधित करतात तेव्हा ह्या दैवी लेखणीवर खरेच जीव ओवाळून टाकावा वाटतो. गझलविश्वातील ह्या अत्यंत प्रतिभावान गझलकाराच्या एका नितांतसुंदर व अतिशय प्रेममय गझलेतल्या निवडक चार शेरांचा रसास्वाद आज आपण घेऊयात.

 


नसेल जर का तुला भरवसा श्वासांची तू झडती घे

रूप तुझेही भरून उरले डोळ्यांची तू झडती घे

 

        पहिल्या शेरावरून गझलेची एकंदर पार्श्वभूमी लक्षात येते, पण 'तू झडती घे' ह्या प्रेमळ धमकीचा काफिया पहिल्या मिसऱ्यातच वाचकाचे मन जिंकून घेतो आणि गझल असोशीने वाचायची उत्सुकता मनात निर्माण करतो. माझ्या श्वासाश्वासात तुझे नाव आहे, माझ्या डोळ्यांतदेखील तुझे रूप भरून उरले आहे आणि ह्यावर जर विश्वास नसेल तर तू खुशाल ह्या दोघांचीही झडती घे.... त्या झडतीमध्ये तुला तूच सापडशील. प्रियकराच्या मनातले भाव किती उत्कटरित्या पहिल्याच शेरात व्यक्त झाले आहेत!

 


दुसरा तिसरा विचार नाही, अविरत चिंतन तुझेच गे

कधी अचानक धाड टाकुनी, स्वप्नांची तू झडती घे

 

        प्रेमात आकंठ बुडालेल्या ह्या प्रियकराच्या मनास 'तिच्या'शिवाय दुसरा कोणता विचारही शिवत नाही. तिचा ध्यास, तिचे चिंतन, तिची आठवण ह्यांतच रमलेला गझलकार त्या स्वप्नपरीस म्हणतो, की कधी अचानक माझ्या स्वप्नांवर धाड टाकून पहा; तिथेदेखील तुला तुझेच दर्शन होईल. प्रेमातली तल्लीनता, व्याकुळता आणि निष्ठा व्यक्त करण्यासाठी ह्याहून कोणत्या चांगल्या ओळी असाव्यात

  


क्षणाक्षणांवर तुझाच ताबा, तुझीच सत्ता सभोवती

वाटल्यास मम रोजनिशीच्या पानांची तू झडती घे

 

        प्रेमाला मर्यादा नसतात. आणि म्हणूनच ते निस्सीम असते. अशा निस्सीम प्रेमात पडलेल्या व्यक्तीच्या मनातले नेमके भाव ह्या शेरात व्यक्त झाले आहेत. माझ्या वेळेवर, माझ्या क्षणांवर माझादेखील ताबा राहिलेला नाही. तू माझ्या अस्तित्वाचा ताबा घेतला आहेस. माझ्या हरेक व्यतीत क्षणांवर तुझेच नाव कोरले गेले आहे आणि तुला खात्रीच करायची असेल तर माझ्या दैनंदिनीची तू एकदा झडती घे...त्यातल्या प्रत्येक नोंदीवर तुझेच नाव तुला दिसेल!

  

कळेल तुजला, कळेल मजला, भाकीत अपुल्या प्रीतीचे

घे तुझ्या नि माझ्या तळहातांच्या रेषांची तू झडती

 

        आपल्या प्रेमाचे भविष्य काय, हा खरेतर प्रत्येकास पडणारा यक्षप्रश्न. हा प्रश्न सोडवण्यासाठी गझलकाराने शिताफीने अनोखा मार्ग सांगितला आहे. आपल्या प्रेमाचे भविष्य जाणून घेण्यासाठी एकदा आपल्या तळहातांच्या रेषाच तू पाहून घे, असे हा साधाच पण सुंदर शेर सांगून जातो. पहिल्या मिसऱ्यात किंचित उत्कंठा वाढवत दुसऱ्या मिसऱ्यात त्यावर अगदी साधे सोप्पे उत्तर देत जमादारांनी गझलेची मजा वाढवली आहे.

 

एका आशयाचे शेर असणाऱ्या ह्या गझलेत प्रत्येक शेरात भिन्न रूपके, उदाहरणे दिसून येतात. साध्याच, पण गुंतवून ठेवणाऱ्या शैलीतील ही मुसलसल गझल पुन्हा पुन्हा वाचण्याचा मोह मात्र आवरत नाही. 

 

(मुसलसल गझल - ज्या गझलेत एकाच विषयावरचे शेर असतात, त्या गझलेला मुसलसल गझल म्हणतात)

कल्याणी आडत



No comments:

Post a Comment