"हरकत नाही…"
मधुसूदन नानिवडेकर |
चांदण्यात ह्या आलीस इथवर हरकत नाही
चंद्र गवसला पुनवेनंतर हरकत नाही
'हरकत नाही' हा शब्दप्रयोग मराठी बोलीभाषेत बऱ्याचदा होताना आढळतो. हाच काफिया घेऊन लिहिलेली ही सुंदर गझल मतल्यामध्ये वाचकाचे मन जिंकून घेते. काफिया आधीच्या वाक्यरचनेला 'हरकत नाही' हे शब्द अतिशय अर्थपूर्ण बनवतात. मतल्यामध्ये गझलकार प्रेयसीला उद्देशून म्हणतात, की तू भेटायला एवढ्या रात्री उशिरा आलीस, पण माझी काही हरकत नाही. पौर्णिमा उलटून गेलेली असली तरी माझा चंद्र आता मला गवसलेला आहे.
हरकत नाही माझी आता कसली
बाकी
डबकी म्हणतील आम्हीच सागर हरकत नाही
सध्याच्या काळात 'उथळ पाण्याला खळखळाट
फार' ह्या म्हणीचा जागोजागी प्रत्यय येतो. स्वतःच्या अंगी काहीही कर्तृत्व नसताना केवळ बढाया मारण्यासाठी स्वतःला स्वतःच
महान घोषित करणारे अनेकजण आपण नेहमी पाहतो. ह्या वृत्तीशी सामना
करण्यात काहीही अर्थ नसल्याने, डबक्याने स्वतःला समुद्र जरी म्हणवले
तरी माझी काही हरकत नसल्याचे वक्तव्य गझलकार करतात.
तुझे नि माझे नाते कुठले
सांग एकदा
तुझ्याकडे जर नसेल उत्तर हरकत नाही
काही नाती अबोल असतात, मूक असतात. अशा नात्यांना काही नाव जरी नसले तरी त्या गोष्टीचा नात्यावर काहीही फरक पडत
नाही. किंबहुना, कोणत्याच नावाचा,
उपाधीचा ह्या नात्यांवर काही परिणाम होत नाही, इतकी ती घट्ट असतात. त्यामुळे तू आपल्या दोघांच्या नात्याचे
नाव जरी सांगितले नाही तरी काही हरकत नाही, आपले ऋणानुबंध असेच
राहतील, असे गझलकार ह्या शेरात सांगून जातात.
मनात सगळे हवे हवेसे ओठी हरकत
अशी असू दे हरकत सुंदर हरकत नाही
स्त्रीमनाचा एक अनोखा पैलू ह्या शेरात गझलकाराने तितक्याच सुंदररित्या मांडला आहे. तुझ्या मनात होकार असला तरी, ओठांवर नकार आहे, हरकत आहे. पण ही हरकतच इतकी सुंदर आहे की तुझ्या ह्या हरकतीला माझी काहीच हरकत नाही असे ह्या शेरातून उलगडून दाखवले आहे. साध्याच शब्दांतून एक नितांतसुंदर गझल लिहिणे हे खरेच सोपे काम नाही, पण मधुसूदन नानिवडेकरांनी ते ह्या गझलेतून लिलया पार पाडले आहे.
कल्याणी आडत
No comments:
Post a Comment