गणेशोत्सव..सोशल मीडियाच्या पलीकडचा !




तपकिरी रंगाची ताडपत्री घातलेला एक मोठ्ठा मांडव.उद्या गणपती यायचाय म्हटल्यावर मांडवात एक अमूर्त चैतन्य ओसंडून वाहतंय. आम्हा लहान मुलांना मोठ्या लोकांनी कामं वाटून दिली आहेत. रात्रीचे बारा वाजून गेले आहेत. आमची गिरगावातील वाडीच्या वाडी आत्ता खाली उतरली आहे. जणू रात्रीचे नाहीत,दुपारचे बारा वाजलेत असं वातावरण! 

कोणी मांडव झाडतोय,कोणी फुलांच्या माळा करतोय,कोणी प्रसादाच्या पिशव्या भरतोय,कोणी स्टेज बांधतोय,कुठल्याशा खोलीत परवाच्या नाटकाची तालीम सुरू आहे. मोठी मंडळी मंडळाच्या हिशेबाचे कागद समोर घेऊन चर्चा करतायत. मध्येच कुणाचा आवाज वाढलाय. अशा वातावरणात कुठल्याशा काकू एका प्रचंड मोठ्या पातेलीत गरम कॉफी घेऊन आल्यात… कामं संपली तरीही पहाटे चार वाजता ‘पावभाजी खायला मिळणारे’ या आशेवर आम्ही सगळी लहान मुलं त्या मांडवात उगीचच जागत भेंड्या आणि पत्ते खेळत बसलोय!

वाजत गाजत गणरायांचं आगमन…आणि दहा दिवस अहोरात्र चालणारे ते कार्यक्रम. चमचा गोटी-मेंढीकोट वगैरे खेळांच्या स्पर्धा,स्थानिक कलाकारांनी सर्वार्थाने ‘बसवलेलं’ एक महत्वाकांक्षी नाटक,हौशी गृहिणींच्या उत्साहाने रंगलेल्या त्या रांगोळ्या,सहस्त्रावर्तने,कीर्तन, महाप्रसाद,भाषणे,गाण्याचे कार्यक्रम,काकड आरती,संगीत आरती,बक्षीससमारंभ..,विसर्जन, श्रमपरिहार…




पुढचा गणेशोत्सव आणखी सॉलिड करू या म्हणत पुन्हा एकदा त्या प्रपंचात विरघळून गेलेले आम्ही!



माझ्या लहानपणी गणेशोत्सव हा नुसता धार्मिक उत्सव नव्हता,तो एक व्यक्तिमत्व विकासाचा वर्ग होता! मांडव झाडण्यापासून ते स्टेजवर नाटकात काम करण्यापर्यंत सर्वच कामं स्वतः करावी लागत होती. त्यामुळे कुठलंही काम लहान किंवा मोठं नसतं ही पहिली शिकवणूक गणेशोत्सवाच्या कामात मिळाली. गणपतीच्या येण्याने आणि जाण्याने माझ्या आयुष्यात फरक पडण्याचा तो काळ होता. गणपती आले की नवीन कपडे,भरपूर खाऊ,गणेशोत्सवाची धमाल... विसर्जनासाठी जाणारी पाठमोरी मूर्ती पाहून डोळ्यांच्या कडांशी जमा होणारं ते खारट पाणी…



आता विचाराल तर ‘माझं लाइफ’ गुलाबजामच्या पाकासारखं गोड-गोड! हरतालिकेच्या शुभेच्छा! गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! बाप्पा म्हणजे आनंद आणि उत्साहाचा कल्लोळ’ म्हणणाऱ्या सेलिब्रिटीजच्या तोंडातल्या वाफा! गल्लोगल्ली जाऊन गणपती पाहायचा उत्साह आटला.

आता गणपती भेटतो तो सोशल मीडियावर. खरेदी वर्षभर सुरूच असते,त्यामुळे गणपतीसाठी विशेष खरेदी होत नाही. मनोरंजन तर विचारू नका! 24 × 7,मनोरंजनाचा महापूर,काय म्हणाल ते! नेटफ्लिक्स, व्हाट्सएप,चॅनलवरच्या बातम्या... बघणाऱ्याला कुठून थ्रील येणार ‘स्थानिक कलाकारांच्या नाटकात,कीर्तनात! वैयक्तिक स्तरावरचा हा सगळा मद्दडपणा एकत्रित येऊन तो सार्वजनिक कधी झाला ते कळलंच नाही. सार्वजनिक गणेशोत्सवात संख्यात्मक वाढ हजारपटींनी झाली. गुणात्मक घसरणीबद्दल न बोललेलं बरं! गणेशोत्सवाची ही नौका बुडून जाऊ नये म्हणून काही चांगली मंडळं आजही प्रामाणिकपणे प्रयत्न करताहेत. पण मोजके अपवाद सोडल्यास त्यांनाही अनेक अडचणी आहेत.

आज मंडळाकडे पैशांचा अभाव नाही,अभाव आहे तो कार्यकर्ते आणि एकूणच उत्साहाचा. कॉफी,प्रसाद,पावभाजी,नाटक,कलाकार,कार्यकर्ते हे सगळं बाहेरून येतंय. आमच्या लाडक्या टीव्ही सिरियल्समधून वेळ मिळाला तरच आम्ही कार्यक्रम पाहायला खाली उतरतोय. याच रेटने हे चालू राहिलं तर दोन वर्षांनी कदाचित प्रेक्षकही बाहेरून आणावे लागतील.

लोकमान्य टिळकांना हरवायची ताकद आपल्या सर्वांमध्ये कुठून आली,याचं मला कुतूहल आहे. टिळक अशा प्रकारे हरले याचं दुःख टिळकांपेक्षा आगरकरांना अधिक झालं असेल.


                                          नविन काळे


No comments:

Post a Comment