GBS एक अनुभव - प्रकरण ७वे: ICU तील मृत्यू, स्पायरोमीटर व फिजिओथेरेपी


मी ICU च्या ज्या नवीन भागात हलवला गेलो, तो भाग जणू युद्धभूमीच होता. पहिल्याच दिवशी मला समजून चुकले की येथे शांतता मिळणे अशक्य आहे. आधीच्या ज्या भागातून मी आलो होतो तो तुलनेने खूपच शांत भाग होता. इथे कोण्या रोग्याचा रक्तदाब खाली घसरे तर दुसऱ्या कोणाचा उसळी खाई. एक बंगाली माणूस सर्वांगावर allergy सदृश उठल्यामुळे भरती झाला होता. तो कडक देखरेखीखाली होता. एका बाईंना स्वाईन फ्लू (H1N1) झाल्यामुळे तिथल्याच - अतिसंसर्गजन्य रोग्यांसाठीच्या वेगळ्या विभागात (Isolation ward) ठेवण्यात आले होते. त्यांना हृदय-फुप्फुस-क्रिया यंत्राशी (Heart-Lung machine) - जोडले होते. अशी माहिती मिळाली की बंगलोरमधील हे एकमेव यंत्र असून, नुसते सुरू करून जोडण्यासाठी काही लाख रुपये खर्च येतो. एका मोठ्या अर्धगोलाकृती टेबलामागून मुख्य नर्सेस सर्व रोग्यांवर नजर ठेऊन होत्या. त्या ठिकाणी प्रत्येक रोग्याच्या देखभालीसाठी स्वतंत्र नर्स होती. डॉक्टरलोकसुद्धा पेशंटकडे वरवर लक्ष न देता जातीने प्रत्येक बारीकसारीक अडथळ्यांवर नजर ठेऊन होते. अचानक एक जाडा माणूस थेट ICU मध्ये घुसला आणि एका हार्टपेशंटला ICU त भरती करण्याविषयी हुज्जत घालू लागला. तिथल्या डॉक्टरांनी कागदपत्र तपासून सांगितले की त्या पेशंटला खास हृदयरोगासंबंधित ICU मध्ये ठेवावे लागेल, या साधारण ICU मध्ये चालणार नाही. त्यांनी त्या जाड्या माणसाला ठामपणे सांगितले की जर फोर्टीसच्या हार्ट ICU मध्ये जागा शिल्लक नसेल तर त्यांनी दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये प्रयत्न करावा. मग डॉक्टरांनी त्या जाड्या माणसाला हृदय-ICU व साधारण ICU यामधला फरक सांगून त्याला कसेबसे मनवले. रोज रात्री १२च्या सुमारास चहाची सुटी होई. दिवसभराच्या अत्यंत शिकस्तीच्या वेळापत्रकात ही १० मिनिटांची अनौपचारिक सुटी तेथील डॉक्टर व नर्सेस घेत असत. पण एखाद्या पेशंटला जर तेव्हाच काही देखभाल लागली तर त्या सुटीचाही त्याग करण्यास ते मागेपुढे पाहत नसत.

माझ्या विरुद्ध दिशेच्या कोपऱ्यातील एका बिछान्याकडे बोट दाखवत एक साठीचे गृहस्थ नर्सला सांगत होते - “ती माझी आई आहे.” ते गृहस्थ आईची देखरेख करायला आत थांबले होते. त्या आजीबाई निदान ८० वर्षांच्या नक्कीच असाव्यात - पांढरेशुभ्र चमकदार केस, शांतपणे मिटलेले डोळे व चेहेरा पण शांत, आणि शरीराला जोडलेल्या असंख्य तारा, नळ्या आणि मापके. आजीबाईंचा धाकटा मुलगा अमेरीकेत होता. त्याला त्यांना कसेही करून भेटायचे होते. हा सर्व तारा-नळ्यांचा लवाजमा त्यांच्या आयुष्यरक्षक यंत्रणेचा भाग (Life support system) असून त्याद्वारे आजींचे मरण लांबवण्याचे प्रयत्न चालले होते. शेवटी त्या ICU मधल्या गृहस्थानी आपल्या धाकट्या भावाशी बोलणी केली व दोघांनी त्या आजींची आयुष्यरक्षक यंत्रणा काढून टाकण्याचा निर्णय घेतला - आजींना शांततेत मरण यावे यासाठी! मी त्या आजींचा ECG माझ्या समोरच असलेल्या दर्शकावर (screen) पाहत होतो. डॉक्टरांनीसुद्धा सपोर्ट सिस्टम काढण्यास मान्य केले व त्या नळ्या आणि वायर्स सोडवून दूर करू लागले. सर्व सोडवून झाल्यावर आजीबाई साधारण ६ एक तासात स्वर्गवासी होतील असा त्यांनी अंदाज वर्तवला. मग आजींचे परिचित वेगवेगळ्या पद्धतीने भेटून जाऊ लागले. काही जण शांतपणाने पायाला हात लावून नमस्कार करीत तर काही ‘आजी-आजीअसा आक्रोश करीत. पण आजी कशालाच उत्तर देत नव्हत्या. मी समोरच्या दर्शकावरील त्यांच्या ECG कडे लक्ष ठेवून होतो. मला पक्के ठाऊक होते की रात्रीतून तेथे एक आडवी सरळ रेषा उमटणार आहे. आजींच्या जवळ एक नर्स सतत होती, जिला आता ‘वाटपाहण्याशिवाय दुसरे विशेष काम नव्हते. आजींच्या युरिन बॅगमध्ये थोडे द्रव जमा झालेले दिसत होते. मला कुतूहल होते की मरणापूर्वी त्यात अजून भर पडेल का? कारण मी असे ऐकून होतो की - मरण भीतीमुळे मृत्यूपूर्वी अनेकांना नैसर्गिक विधी होतात. पण येथे तसे काही झाले नाही - आजीबाई अत्यंत शांततेत निजधामास गेल्या. ECG ची रेघ आडवी सपाट झाली होती. एका नर्सने दुसरीला मृत्यूची वेळ नोंदवून ठेवायला सांगितले- रात्री २ वाजून १० मिनिटे. आजीबाईंनी नेत्रदान केले होते. त्यामुळे दोन डॉक्टर येऊन त्यांचे डोळे लगोलग काढून, एका काळ्या रंगाच्या बऱ्याच मोठ्या पेटीत ठेऊन घेऊन गेले.

तेथे जणूकाही नियम असल्याप्रमाणे दररोज कोणी एक डॉक्टर मला ‘खोकून दाखवाअसं सांगे आणि मी किती खोलवर खोकू शकतो, गिळण्याची क्रिया, खोलवर श्वासोच्छ्वास आणि डोके पुढच्या बाजूला झुकव वगैरे परीक्षा करत. कोणी एक माझ्याकडून डोळे-हाताच्या क्रियांच्या सुसूत्रीकरण विषयीचे खास व्यायाम प्रकार करून घेत. ते थोडक्यात अशा पद्धतीने - ते त्यांची तर्जनी हवेत कुठल्याही विविक्षित ठिकाणी स्थिरावत. मग मी माझी तर्जनी माझ्या नाकाच्या शेंड्यावर टेकवून नंतर त्यांच्या तर्जनीच्या टोकावर स्पर्श करायचा असे - मग ते त्यांचे बोट हवेतच दुसऱ्या ठिकाणी हलवत - मी पुन्हा नाकाला शिवून त्यांच्या बोटाला माझे बोट टेकवायचो. ते जे जे सांगतील ते ते मी निमूटपणे करत होतो. दिवसागणिक माझ्या खोकण्यात ‘दमनसल्याचे आणि ‘जोरकमी कमी होत चालल्याचे तसेच हालचालींमधील सुसूत्रता कमी झाल्याचे मला स्पष्ट जाणवत होते. डॉ. पद्मकुमारनी सांगितले की मी स्पायरोमीटर - फुंकनळी मापक - मधून फुंकर जोराने सोडणे व हवा आत ओढणे सुरू करावे. याने दोन गोष्टी साध्य होण्याची अपेक्षा होती - एक म्हणजे माझ्या फुप्फुसांना व्यायाम होईल, दुसरे म्हणजे मला माझ्या फुप्फुसांच्या शक्तीचा अंदाज येत राहील. एक गोष्ट हर्षदाला आणि मला स्पष्ट होती की जर का मला व्हेंटिलेटर (श्वास यंत्र) लावावे लागले तर बरे होण्यास जास्त वेळ लागेल. सुदैवाने माझी श्वास घेण्याची, गिळण्याची व खोकण्याची क्षमता पहिल्या ५-६ दिवसांच्या घसरगुंडीनंतर थोडीफार स्थिर झाली, कमी नक्कीच झाली नाही. आता जी काही अधोगती व्हायची होती ती होऊन एक नवीन सुरुवात होत होती. आणि मग दिवसागणिक फक्त प्रगतीच होत गेली. स्पायरोमीटर फुप्फुसांची शक्ती वाढत असल्याचे स्पष्टपणे दर्शवत होता. मला वाटते, माझ्या फुप्फुसांची शक्ती आणि त्याला पूरक IVIG ची इंजेक्शन्स, दोघे मिळून GBS ने चेतासंस्थेवर केलेल्या हल्ल्याची तीव्रता कमी करत होते. व्हेंटिलेटर लावण्याची आवश्यकता वाढण्याइतकी GBS चा संसर्ग वाढलाच नाही. गेली ५-६ वर्षे मी नित्यनेमाने न चुकता ‘शक्तिचलन क्रियाकरत होतो. त्या अंतर्गत केल्या जाणाऱ्या कपालभाती प्राणायामामुळेमाझ्या फुप्फुसांच्या वाढलेल्या शक्ती व कार्यक्षमते विषयी मला पूर्ण कल्पना होती.


माझी IVIG ची इंजेक्शन पूर्ण झाल्यावर, ५-६ फिजिओथेरेपिस्टची एक टीम माझ्यावर उपचार करू लागली. त्या टीमची कर्णधार होती - मुजीबा - उंच, सडपातळ, स्टायलिश आणि कर्कश आवाजाची बाई. त्यांच्यापैकी दोन लोक सकाळी येत आणि दुसरे दोन संध्याकाळी. सुरुवातीला मी स्पंजचे, हसरा चेहेरा छापलेले पिवळ्या रंगाचे चेंडू हातात घेऊन दाबू लागलो, स्पायरोमीटरमध्ये जोराने हवा फुंकणे किंवा आत ओढण्याचा सराव करू लागलो - (स्पायरोमीटर हे एक लहानसे उपकरण असते. एका फुंकनळीत ३ वेगवेगळ्या आकाराचे गोलक ठेवलेले असतात. हवेच्या दाबानुसार ते गोलक त्यांच्या कप्प्यांमध्ये खाली-वर होतात.) याशिवाय हातपाय उचलायचा प्रयत्न करू लागलो. पिवळा चेंडू मी भरपूर प्रमाणात दाबू शकत होतो. स्पायरोमीटरमध्ये हवा ओढताना त्यातले ३ गोलक दीड कप्प्यांपर्यंत (तीन पैकी) उचलले जात तर फुंकताना एक गोलक फक्त अर्ध्या कप्प्यापर्यंत! चेहेऱ्याचे स्नायू पूर्णपणे थिजले होते व मी त्यांची कोणतीही हालचाल करू शकत नव्हतो. बऱ्याच वेळा मला स्वतःला मी हसतोय असे वाटायचे पण प्रत्यक्षात स्नायू न हलल्यामुळे चेहेरा कोराच राहायचा. त्या वेळी हसऱ्या चेहेऱ्यावाले पिवळे चेंडू फार उपयोगी पडायचे. ते चेंडू वापरून मी माझे हास्य आणि आनंद भेटायला आलेल्यांना आणि डॉक्टरांना दर्शवत असे. फिजिओथेरपीच्या दुसऱ्याच दिवशी त्यातल्या एकाने मला विनंती - किंवा (जवळ जवळ) आज्ञा केली की “आज तुम्ही उभे राहायचे आहे.” मी नाखुशीनेच तयार झालो. मला वाटत होते की अजून माझे शरीर उभे राहू शकणार नाही. मग दोन जणांनी मला काखेत हात घालून आधार देत उभे केले. पण आधार ज्या क्षणी काढून घेतला त्या क्षणी मी पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोलमडलो, लगोलग त्यांनी मला सावरले. ती पूर्ण टीम फारच कडक होती - मला सहनशक्तीच्या चरमबिंदूपर्यंत वाकायला आणि ताणायला लावत. मला वाटते बऱ्याच आडमुठ्या पेशंट्सना हाताळावे लागल्यामुळे त्यांच्यात तो कडकपणा साहजिकच आला असावा. फिजिओथेरपीच्या चौथ्या दिवसांपासून माझे शरीर थेरपीला चांगला प्रतिसाद देऊ लागले. मी आधी स्ट्रॉमधून पेय ओढू शकत नव्हतो, काही तासातच मला ते ओढता येऊ लागले. वॉर्डरूम नंबर ७६७ (सातशे सदुसष्ट) मध्ये मी होतो, तिला एका बाजूला मोठी काचेची खिडकी होती, आणि दरवाज्याच्या बाजूला अजून एक बिछाना दुसऱ्या पेशंटसाठी होता. मी रूमच्या मध्यभागी होतो. हर्षदा आणि मी ठरवून टाकले की ज्या दिवशी मी वॉकर घेऊन स्वतः (कोणाच्या मदतीशिवाय) बाथरूमपर्यंत जाऊ शकेन त्या दिवशी डिस्चार्ज - घरी जाण्याची परवानगी - मागायची. ज्या क्रिया मी प्रत्यक्षात करू शकत नव्हतो त्या मी मनातल्या मनात करत होतो - उभा राहायचो, चालायचो आणि पळायचोदेखील. थेरपिस्ट दोन वेळा येत असले तरी मी व्यायाम अजून दोनवेळा करावा असे मला सांगण्यात आले. मी त्याबरहुकूम अत्यंत भाविकपणे व्यायाम करू लागलो. एके दिवशी मुजीबाने मला आधार देऊन पलंगापाशी उभे केले आणि सावकाशपणे आधार काढून घेतला. आणि... ११ दिवसांनंतर मी माझ्या स्वतःच्या पायावर आधाराशिवाय उभा राहू शकलो! मला खूप आनंद झाला, हर्षदा आणि दीदी थरारून गेल्या. दुसऱ्या दिवशी तिने मला काचेच्या खिडकीपर्यंत चालवत नेले. एक एक पाऊल फक्त काही इंचांचे होते. १२ दिवसांनंतर प्रथमच मी त्या हॉस्पिटलच्या सातव्या मजल्यावरून झाडे आणि घरे पाहत होतो. मुजीबा म्हणाली - “माझे विभागप्रमुख (Head of the Department) विचारताहेत की - हा आशीर्वाद नावाचा कोण पेशंट आहे? गेले काही दिवस मी त्याचेच नाव ऐकतो आहे!” मुजीबा माझ्या प्रगतीने आणि शरीराच्या प्रतिसादाने खुश होती. ती म्हणाली - “तू इतर पेशंटसाठी एक चांगले उदाहरण ठेवत आहेस. आगे बढो! तिने हे ही सुचवले की मी चेहेऱ्याच्या स्नायूंसाठी - “इलेक्ट्रिकल नर्व्हस स्टिम्युलेशन - विद्युत उद्दीपन - हा उपचार करावा, तसेच आरशात पाहून चेहेऱ्याच्या स्नायूंचे व्यायाम करावे. मी अजूनही हॉस्पिटलचा उघड्या पाठीचा ढगाळ झगाच घालत होतो. व्यायाम करताना त्या झग्यातून फक्त पत्नीला दिसण्यायोग्य भागांचे यथासांग दर्शन त्या फिजियोथेरपिस्टना होई. संगणकाच्या भाषेत - माझे प्रायव्हेट व्हेरिएबल्स सध्या पब्लिक व्हेरिएबल्स झाले होते. त्यातल्या त्यात जमेची बाजू ही की हे पब्लिक बऱ्याच प्रमाणात मर्यादित होतं आणि ते ही मुख्यत्वेकरून हॉस्पिटलचा कर्मचारी वर्ग. गीतू गमतीने म्हणालीसुद्धा - “या उघड्या पाठीच्या झग्यातून देहप्रदर्शन खूप झाले.”


त्या दिवशी माझ्या मनात एक गाणे सारखे पिंगा घालत होते - जरी या आकाशाखालच्या सगळ्या गोष्टी नष्ट झाल्या तरी संगीत व नृत्य राहतील, संगीत व नृत्य राहतील, संगीत व नृत्य अमर राहतील, नष्ट होणार नाहीत. (‘Though all things perish from under the sky, music and dance shall live, music and dance shall live, music and dance shall live never to die.’) गीतू म्हणाली - “स्नेहधाराचे अनेक कर्मचारी व पालक (ड्रम जॅमिंगवाले) मला ICU त येऊन भेटायला मागतायत.” तिने कसेबसे त्यांना ICU त येऊन धडकण्यापासून थांबवले होते व त्या ऐवजी माझी प्रगती ती त्यांना कळवत होती. मी तिला सांगितले - एक गाणे थोडे शब्द फेरफार करून मी या स्नेहधारामधल्या प्रेमळ मंडळींना अर्पण करू इच्छितो. ते असे - “जरी या आकाशाखालच्या सर्व गोष्टी नष्ट झाल्या तरी नृत्य व संगीत राहतील; कला आणि प्रेम राहतील, कथा आणि नाटके राहतील, नष्ट होणार नाहीत.” (‘Though all things perish from under the sky.  Music and dance shall live, (he)art and love shall live, stories and plays shall live, never to die.’)

माझ्या गळ्यातल्या आवाजाच्या नसांवर सुद्धा GBS चा परिणाम झाला होता व त्या जवळ जवळ निकामी झाल्या होत्या. माझा आवाज खालच्या पट्टीत उतरू शकत होता, पण वरच्या पट्टीत जायची बोंब होती. साधारणपणे मधल्या सप्तकातल्या गांधारानंतर माझ्या गळ्यातून मांजराच्या ‘म्यांव म्यांवसारखा आवाज येत.


क्रमश:--


भाषांतर : सुनीत राजहंस
ट्रान्स्क्रिपशन मदत : अजय चौधरी 

मूळ इंग्रजी लेखक : आशिर्वाद आचरेकर

No comments:

Post a Comment