गीताई



"गीताई ", भगवान श्री कृष्णांनी कुरुक्षेत्रात अर्जुनाला केलेला गीतामृताचा उपदेश आज हजारो वर्षे संपूर्ण भारतवर्षालाच नव्हें तर साऱ्या जगाला ज्ञानप्रकाश देत आहे. ज्ञानेश्वरांनी गीता संस्कृतातून प्राकृतात आणली आणि विनोबांनी गीता संस्कृतातून मराठीत काव्यरुपात भाषांतरित केली. गीतेला त्यांनी आई म्हटलं आणि तिची झाली 'गीताई'!

गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता
पडता झडता उचलून घेई कडेवरी

विनोबांच्या या ओळींनी सुरु होणाऱ्या गीताईचे नकळत्या वयात माझ्यावर संस्कार झाले आणि या काव्याचा गोडवा आणि शब्दांचा नेमकेपणा मला त्या वयातही मोहवून गेला.मला समजलेली गीता गीताईच्या गोडव्यातून उलगडण्याचा ध्यास लागला.

अध्याय पहिला - अर्जुन विषाद योग

तुमचा कधी अर्जुन झाला आहे काय? म्हणजे किंकर्तव्यविमूढ अवस्था... खरं काय खोटं काय सत्य काय आणि असत्य काय? कुठली वाट धरू अशी द्विधा अवस्था... आपण कुणी राजे महाराजे किंवा मोठे राजकीय किंवा सामाजिक नेते नाही. त्यामुळे अर्जुनाच्या बाबतीत घडला तितका मोठा धर्म-अधर्माची निवड करायला लावणारा प्रसंग आपल्या जीवनात येण्याची शक्यता फारच कमी. तरी देखील जीवनात छोट्या मोठ्या गोष्टीत योग्य अयोग्याची निवड करण्याचे प्रसंग येतात. आयुष्यात अनेक विकल्प समोर येतात त्यावेळी योग्य निवड करणे, सचोटीचा सत्याचा मार्ग धरणे असे निर्णयाचे क्षण येतात आणि प्रत्येकाच्या आयुष्यात कुणी ना कुणी कृष्णाची भूमिका बजावतो, योग्य मार्ग दर्शन करून किंवा कधी कधी आपल्याला कृष्णाची भूमिका बजावावी लागते आणि कुणाला तरी मार्ग दर्शन करावे लागते ... कधी आपण अर्जुन असतो तर कधी आपण कृष्ण असतो ... तर गीतेचा पहिला अध्याय "अर्जुन विषाद योग'.


विनोबांची साधी सोपी गीताई...तिचं  बोट धरून मी या आणि पुढच्या अध्याया विषयी मला जस आकळलं  तसं  लिहिणार आहे.
गीतेचे एकूण १८ अध्याय, त्यातील पहिल्या अध्यायात एकूण ४७ श्लोक आहेत.... कुठलाही फाफटपसारा न मांडता गीतेची आणि या अध्यायाची सुरवात धृतराष्ट्राच्या या साध्या प्रश्नांने होते

त्या पवित्र कुरुक्षेत्री पांडूचे आणि आमुचें
युद्धार्थ जमले तेव्हा वर्तले काय संजया?

या प्रश्नावर संजयाने पांडव व कौरव सेनेची रचना कशी केली आहे, त्यात कोण कोण आहेत याचे वर्णन केले आहे. भीम, अर्जुन, द्रुपद, सात्यकी, धृष्टकेतू, चेकितान, उत्तमौजा, युधमन्यू असे पांडवांच्या बाजूने तर भीष्म, कर्ण, अश्वत्थामा, सौम्दत्ती, जयद्रथ, विकर्ण असे कौरवांच्या बाजूने उभे आहेत.

हे वर्णन अतिशय चित्रमय आणि तसंच नादमय ही आहे. पहा कसे ते. 
संजय म्हणतो -
अफाट अमुचे सैन्य भीष्मांनी रक्षिले असे
मोजके पांडवांचे हे भीमाने रक्षिले असे
राहुनी आपुल्या स्थानी जेथे ज्यास नियोजीले
चहूंकडूनि भीष्मांस रक्षाल सगळे जण
हर्षवित चि त्यास सिंह नाद करुनिया
प्रतापी वृद्ध भीष्मांनी मोठ्याने शंख फुंकीला
तत्क्षणी शन्खभेर्यादी रण वाद्ये विचित्रचि
एकत्र झडली तेव्हा झाला शब्द भयंकर

या नंतर प्रत्येकाने कुठले शंख फुंकले याच वर्णन संजय करतो. पांचजन्य, पौंड्र, सुघोष अशी अनेक नावे. त्या भयंकर शंख नादाचा परिणाम असा होतो की-
त्या घोषें कौरवांची तो हृदयेच विदारिली
भरुनी भूमि आकाश गाजला तो भयंकर
अशा त्या शंख नादांनीं  आकाश-भूमि हादरून सोडणाऱ्या वातावरणात अर्जुनाने कृष्णाला सांगितले


दोन्ही सैन्यामध्ये कृष्णा माझा रथ उभा करी

म्हणजे कोण पाहीन राखिती युद्ध कामना

भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या सांगण्यावरून रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा केला.
तेथ अर्जुन तो पाहे उभे सारे व्यवस्थित
आजे, काके, तसे मामे सासरे सोयरे सखे
गुरु बंधू मुले नातू सैन्यात सारखे
आपल्याच आप्त स्वकीयांना युद्धासाठी उभे पाहून अर्जुनाची गलितगात्र अवस्था होते तो म्हणतो -

कृष्णा स्व जन हे सारे युध्दी उत्सुक पाहुनी
गात्रेंची गळती माझी होतसे तोंड कोरडे

शरीरी सुटतो कंप उभे रोमांच राहती
गांडीव न टिके हाती सगळी जळते त्वचा

न शके उभा राहू मन हे भ्रमलें जसे
नको जय नको राज्य नकोत मज ती सुखे

राज्य भोगे मिळे काय किंवा काय जगून ही
ज्यांच्यासाठी अपेक्षावी राज्य भोग सुखे हि ती
सजले तेच युधासी धना प्राणास सोडूनि

अर्जुनाच सगळं अवसान असं गळून पडत. आणि तो म्हणतो,

न मारू इच्छितो ह्यांस मारतील जरी मज
विश्व् साम्राज्य सोडीन, पृथीचा पाड तो किती
पृथ्वीचा पाड तो किती.. ह्या ओळी छान आहेत

या पुढे मात्र अर्जुन आपल्या खचलेल्या मन स्थितीचे समर्थन करायचा उगीचच केविलवाणा प्रयत्न करताना दिसतो. अर्जुन म्हणतो -
लोभाने नासली बुद्धि त्यामुळे हे न पाहती
मित्र-द्रोही कसे पाप काय दॊष कुलक्षयी
परि हे पाप टाळावे आम्हा का समजू नये
कुल क्षयी महा-दोष कृष्णा उघड पाहता
कुलक्षये लया जाता जाती कुल धर्म सनातन
धर्म नाशे कुळी सर्व अधर्म पसरे मग
अधर्म माजतो तेव्हा भ्रष्ट होती कुलस्त्रिया
स्त्रिया बिघडता कृष्णा घडतो वर्ण संकर
माणसाची एखादी गोष्ट करायची इच्छा नसली की तो कसं logic less स्पष्टीकरण देतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. अर्जुन म्हणे मित्र द्रोहाने कुलक्षय होतो, त्यामुळे अधर्म माजतो त्यामुळे कुल स्त्रिया बिघडतात आणि त्यामुळे वर्णसंकर होतो.. हे न पटणार काहीं तरी अर्जुन भीती पोटी बरळू लागतो.
घामाघूम झालेला घाबरलेला अर्जुन या अध्यायाच्या शेवटी कसा दिसतो पहा -

अरेरे केवढे पाप आम्ही आरंभिले असे
लोभे राज्य सुखासाठी मारावे स्वजनांस जे
त्याहुनी शस्त्र सोडूनि उगा राहीन ते बरे
मारोत मग हे युध्दी शस्त्रांनी मज कौरव

असे रणात बोलुनी शोकावेगात अर्जुन
धनुष्य बाण टाकुनी रथी बैसूनि राहिला
तर असं हे युद्धभूमि वरच वर्णन संजय धृतराष्ट्राला सांगतो. मला युद्ध भूमीच वर्णन, एकूण परिस्थितीची short summary..अर्जुनाची झालेली किंकर्तव्यविमूढ अवस्था हे या अध्यायाचे highlights वाटतात. विनोबांनी फार सोप्या शब्दात पण मूळ श्लोकांचा अर्थ कायम ठेवून अतिशय प्रतिभेने या प्रत्येक श्लोकाची मराठीतून काव्य रचना केली आहे. ती अनेकापर्यन्त पोहचावी ही एक इच्छा आहे आणि लिहिता लिहिता गीता माझ्यात भिनावी ही दुसरी इच्छा आहे.

अलका देशपांडे







No comments:

Post a Comment