🎇गीताई : अध्याय 10 - विभूति योग🎇

 



मागच्या राजविद्या राजगुह्य योगात श्रीकृष्णांनी अत्यंत गुप्त असे  सृष्टीच्या निर्मितीचे, विनाशाचे आणि पुनर्निर्मितीचे रहस्य त्यांच्या लाडक्या मित्राला अर्जुनाला सांगितले. पुढे खरे  तर विभूति योग सुरु होतो. परंतु त्या आधी श्रीकृष्ण ज्या काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्यांची पुन्हा एकदा उजळणी घेतात. विभूति योगात एकूण 42 श्लोक आहेत.

फिरुनि सांगतो ऐक वाक्य उत्तम मी तुज

राखसी श्रवणी गोडी तुझे मी हित इच्छितो

न देव जाणती माझा प्रभाव न महर्षी हि

सर्वथा मी चि देवांचे महर्षींचे हि मूळ कीं

श्रीकृष्ण म्हणतात पुन्हा एकदा मी तुला हे उत्तम ज्ञान सांगतो, "राखसी श्रवणी गोडी, तुझे मी हित इच्छितो" रस घेऊन ऐक, तुझ्या भल्या साठीच सांगतो आहे.... हे बाकीचे देव आणि महर्षी माझा प्रभाव जाणत नाहीत, या सर्वांचं मूळ मीच आहे हे तू जाणून घे.

ओळखे जो अजन्मा मी स्वयं -भू विश्व चालक

निर्मोह तो मनुष्यात सुटला पातकांतूनी

जो हे जाणून असतो की मी म्हणजे परमेश्वर आत्मशक्ती ही अजन्मा आहे... स्वयंभू आहे, विश्वाचे चालन करणारी आहे, तो मनुष्य निर्मोही होऊन त्यास मुक्ती मिळते.

बुद्धी निर्मोहता ज्ञान सत्यता शम निग्रह

जन्म नाश सुखे दुःखे लाभालाभ भयाभय

तप दातृत्व संतोष अहिंसा समता क्षमा

माझ्या चि पासुनी भूती भाव हे वेगवेगळे

परमेश्वर पुन्हा एकदा अधोरेखित करतात, की सुख, दुःख, भय, भीती, दातृत्व, समता, क्षमा, जन्म, मृत्यू हे सगळे भाव माझ्यातूनच निर्माण होतात.

महर्षी सात पूर्वीचे चौघे मनू तसे चि ते

माझे संकल्पले भाव ज्यांची लोकांत ही प्रजा

हा योग युक्त विस्तार माझा जो नीट ओळखे

त्यास निष्कम्प तो योग लाभे ह्यात न संशय

इथे श्रीकृष्णांनी सात महर्षी, मनू हे सारे परमेश्वरी संकल्पातूनच निर्माण झाले होते आणि ही सगळी त्यांचीच प्रजा आहे हे सांगून, जें माझ्या या योग शक्तीला, दैवी विभूति रुपाला जाणतात ते निःसंशयपणे योग युक्त होतात हे ही पुन्हा अधोरेखित केले  आहे.

सर्वांचे मूळ माझ्यात प्रेरणा मज पासुनी

हे ओळखूनि भक्तीने जाणते भजती मज

चित्ते प्राणे जसे मी चि एकमेकांस बोधिती

भरूनि कीर्तने माझ्या ते आनंदात खेळती

सुंदर श्लोक आहे. जें सर्वांचं मूळ, सर्व प्रेरणा परमेश्वर आहे हे जाणतात आणि भक्ती भावाने परमेश्वराची धारणा करतात तें परमानंद प्राप्त करतात.

आता अर्जुन काय विचारतो पहा...

पवित्र तू, परब्रम्ह थोर ते मोक्षधाम तू

आत्मा नित्य अ-जन्मा तू, विभू देवादि दिव्य तू

मानितो सत्य हे सारे स्वये जे सांगसी मज

देव दानव कोणी हि तुझे रूपं न जाणती

श्रीकृष्णा, तू पवित्र परब्रम्ह आहेस, तू मोक्षाचे  धाम आहेस, तू सनातन, नित्य आणि अजन्मा, दैवी शक्ती आहेस. हे तुझं स्वरूप आज तूच मला सांगितलंस आणि देव दानव कुणालाही याची कल्पना नाही.... विचार करा अर्जुनाची काय अवस्था झाली असेल... मानवी देहात वावरणारा आपला मित्र हा कुणी साधासुधा व्यक्ती नसून साक्षात परमेश्वर आहे आणि तोच स्वतः कुणालाही कधीही न सांगितलेलं दिव्य ज्ञान सांगत आहे... डोळे मिटून क्षणभर कल्पना जरी केली तरी... डोकं गरगरायला लागतं... अर्जुन श्रीकृष्णाला एक फार छान प्रश्न करतो आणि फारच सुंदर उदाहरणं देऊन श्रीकृष्ण आपल्या लाडक्या मित्राला समजावतो

अर्जुन विचारतो-

विभूति आपुल्या दिव्य मज निःशेष सांग तू

ज्यांनी हे विश्व् तू सारे राहिलास भरुनिया

योगेश्वरा कसा जाणू चिंतनी चिंतनी तुज

कोण्या कोण्या स्वरूपांत करावे ध्यान मी तुझे?

त्या विभूति तसा योग आपुला तो सविस्तर

पुन्हा सांग नव्हें तृप्ति सेविता वाचनामृत

"विभूति" म्हणजे दैवी रूप. अर्जुन विचारतो, हे श्रीकृष्णा तुझी अशी किती दिव्य रूपे  आहेत... काहीही बाकी न ठेवता सगळी रूपे  मला सांग... कुठल्या कुठल्याही रूपात तुझं मी ध्यान करावं? तुझं चिंतन करताना मी कुठकुठल्या रूपात तुला ओळखावं... तुझ्या या विविध दिव्य रूपांविषयी मला सविस्तरपणे सांग.. तुझ्या वाणीचे  हे अमृत मी कितीही प्यायलो तरी माझी तृप्ती होत नाहीये.. beautiful question! So is the beautiful answer!

भगवान म्हणतात, ऐक मी तुला माझी काही मुख्य मुख्य दैवी रूपे  सांगतो.. पण माझ्या दिव्य रूपांचा विस्तार खरं तर न संपणारा आहे...आणि हे जरी खरं असलं तरी प्रत्येक जिवाच्या ठायी आत्मशक्तीच्या रूपात मी राहत असतो.

बरे मी सांगतो दिव्य मुख्य मुख्य चि त्या तुज

माझा विभुती विस्तार न संपे चि कुठे कधी

राहतो आत्म रूपाने सर्वांच्या हृदयात मी

आता इथून पुढे श्रीकृष्ण त्यांच्या दैवी रूपाची उदाहरणं अत्यंत काव्यात्मक, सर्वाना समजतील अशा प्रकारे देतात... हे वाचणं आणि समजणं हा एक अलौकिक आनंद देणारा अनुभव आहे

ऐका.... जरी लांब वाटलं तरी please वाचायचा कंटाळा करू नका.

भूत मात्रास मी मूळ मध्य मी, मी चि शेवट

आदित्यात महाविष्णू ज्योतिषमंतात सूर्य मी

मरीचि मुख्य वायूत मी नक्षत्रांत चंद्रमा

       मी साम-वेद वेदांत असे देवांत इंद्र मी

       चेतना मी चि भूतांत, मन ते इंद्रियांत मी

कुबेर यक्ष रक्षांत, मी रुद्रांत सदाशिव

वसूत मी असे अग्नी, असे उंचात मेरू मी

       पुरोहितांत तू जाणं, मुख्य तो मी बृहस्पति

       सेनानीत तसा स्कंद, जल राशींत सागर

मी एकाक्षर वाणीत, महर्षीत असे भृगु

जप मी सर्व यज्ञांत, मी स्थिरांत हिमालय

       सर्व वृक्षांत अश्वथ, मी देवर्षीत नारद

       मी चित्ररथ गंधर्वी, सिद्धी कपिल मी मुनि

अश्वी उच्चे:श्रवा जो मी निघालो अमृतातुनी

ऐरावत गजेंद्रात, मी नरांत नराधिप

       मी कामधेनु गाईंत, आयुधी वज्र मी असे

       उत्पत्ती हेतु मी काम, मी सर्वोत्तम वासुकि

नागांत शेष मी, थोर जळी वरुण देवता

पितरी अर्यमा तो मी,  ओढणारात मी यम

       असे दैत्यात प्रल्हाद, मोजणारात काळ मी

       श्वापदांत असे सिंह, पक्ष्यांत खग राज मी

वेगवन्तात मी वायु, शस्त्र वीरांत राम मी

मत्स्यात मी असे नक्र, नदी गंगा नद्यांत मी

       सृष्टीचे मी असे मूळ, मुख मी ओघ तो हि मी

       विद्यांत आत्म विद्या मी, वक्त्यांचा तत्ववाद मी

सामासांत असे द्वंद्व, अक्षरांत अकार मी

मी चि अक्षय तो काळ, विश्व कर्ता विराट स्वये

       सर्व नाशक मी मृत्यू, होणारा जन्म मी असे

       वाणी श्री कीर्ति, नारींत क्षमा मेधा धृती स्मृति

सामांत मी बृहत साम, गायत्री मंत्र सार मी

मी मार्गशीर्ष मासांत, ऋतूंत फुलला ऋतु

       द्यूत मी छळणारांचे, तेजसव्यातील तेज मी

       सत्व मी सात्विकांतील, जय मी आणि निश्चय

मी वासुदेव वृष्णिन्त, पांडवात धनंजय

मुनींत मुनि मी व्यास, कवींत उशना कवि

       दंड मी दम वंतांचा, विजयेच्छुस धर्म मी

       गूढांत मौन मी थोर, ज्ञात्याचें ज्ञान मी असे

तसेचि सर्व भूतांचे बीज जें तें हि जाण मी

सर्वांचं मूळ, मध्य आणि अंत मीच आहे. अदितीच्या आठ पुत्रातील विष्णू मी आहे. दिव्य ज्योती मधला सूर्य मी आहे. वायू देवतांचे तेज आणि नक्षत्रांचा अधिपती असा चंद्र मी आहे. सर्व वेदांत सरस असा सामदेव मी आहे. देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ देव इंद्र मी आहे, प्राणीमात्रातील चेतना मी आहे..तसेच  शरीरात वसलेले  मन मी आहे. फारच सुंदर ! रुद्रांमधला शंकर मी आहे, यक्षांमधला कुबेर मी आहे. पुरोहितांतील महान बृहस्पति मी आहे. सर्व सेनापतीत शूर असा स्कंद मी आहे. जल राशीत श्रेष्ठ असा समुद्र मी आहे. महान ऋषीतील भृगु ऋषी मी आहे. वाणीतून उच्चारला जाणारा एकाक्षर मंत्र ओंकार मी आहे.

सर्व यज्ञातील जप मी आहे, अविचल असा हिमालय मी आहे. सर्व वृक्षात श्रेष्ठ अश्वथ म्हणजे पिंपळ वृक्ष मी आहे. देवर्षींतील श्रेष्ठ नारद, गंधर्वातील चित्ररथ आणि मुनींमधील कपिल मुनी मी आहे. घोड्यातील सर्व श्रेष्ठ उच्चे:श्रवा मी आहे. हत्तीतील श्रेष्ठ असा ऐरावत मी आहे. पुरुष श्रेष्ठांत सर्वोत्तम राजा मी आहे. गाईंत कामधेनू, आयुधात वज्र मी आहे. सृजनाचे  मूळ असा "काम" मी आहे. सापांचा राजा वासुकी मी आहे. नागांमध्ये श्रेष्ठ शेषनाग मी आहे. जलचरांचा  अधिपती वरुण मी आहे. पितरात अर्यमा मी आणि ओढून नेणाऱ्यात यम मी आहे. दैत्यांमध्ये  प्रल्हाद मी आहे आणि गणना करणाऱ्यांत समय मी आहे. श्वापदांत मी सिंह तर पक्षांत पक्षिराज गरुड मी आहे. वेगवानात मी वायू तर वीरांत मी राम आहे. माशांत मगर आणि नद्यांत भागीरथी गंगा आहे.

मी सृष्टीचं मूळ, तिचा ओघ ही मीच आहे. सर्व विद्यांत श्रेष्ठ आत्मविद्या मी आहे, वक्त्यांचा तत्ववाद मी आहे. समासांत द्वंद्व समास आणि अक्षरातील '' कार मी आहे. कधीही न सरणारा असा अक्षय काळ मी आहे... मीच तो विराट विश्वकर्ता आहे...सर्वांचा नाश करणारा मृत्यूही मीच आणि जन्मही मीच आहे. वाणी, श्री, कीर्ती आणि स्त्रियांत मेधा, धृति, स्मृति मी आहे. गायत्री मंत्राचे  सार मी आहे. महिन्यांत मार्गशीर्ष महिना मी आहे... ऋतूत बहरणारा वसंत ऋतु मी आहे. मी द्युत ही आहे, तेज मी आहे, सात्विकांतील जय आणि निश्चय मी आहे. वृष्णी वंशीयांमध्ये वासुदेव मी आहे आणि पांडवात धनंजय म्हणजे अर्जुना तू स्वतः ही मीच आहे (आहे की नाही गंम्मत!). मुनी श्रेष्ठांत मी व्यास आणि कवींमध्ये शुक्राचार्य मी आहे.

दंड करणाऱ्यांचा दंड म्हणजे दमन करण्याची शक्ती मी आहे, विजयाची इच्छा करणाऱ्यांची नीती मी आहे. गुप्त ठेवण्यासारख्या भावांचा रक्षक मौन आणि ज्ञानवानांचे तत्त्वज्ञान मीच आहे.

आणि सर्व पंचमहाभूतांचे बीज ही मीच आहे !

तर अशा प्रकारे श्रीकृष्णांनी आपल्या मुख्य विभूति म्हणजे दिव्य रूपांचा विस्तार अर्जुनाला थोडक्यात सांगितला... पुढे भगवंत म्हणतात -

माझ्याविण नसे काही लेश मात्र चराचरी

माझ्या दिव्य विभूतींस नसे अंत कुठेंची तो

तरी विभूति विस्तार हा मी थोड्यांत बोलिलो

माझ्या शिवाय या चराचरात लेश मात्र ही काही नाही. माझ्या या दिव्य विभूतींचा कुठेच अंत होत नाही..तरीही अर्जुना तुला मी हा विभूति विस्तार मी थोडक्यात सांगितला.

आणि शेवटच्या श्लोकात पहा श्रीकृष्ण काय सांगतात -

अथवा काय हे फार जाणुनि करिशील तू?

एकांशे विश्व हे सारे व्यापूनि उरलो चि मी

अर्जुना तू मला कुठल्याही कुठल्या विभूति रूपात मी आहे असे  विचारलेस... मी सांगितलंही. पण ही रूपे  जाणून तू काय करशील? तेव्हा एकच लक्षात ठेव "एकांशे सर्व विश्व् हे सारे व्यापूनि उरलो चि मी

बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन?

विष्टभ्याहमिदं कॄत्स्नमेकांशेन स्थितो जगत्‌ ॥

मी या संपूर्ण जगाला आपल्या योगशक्तीच्या केवळ एका अंशाने धारण करून राहिलो आहे.

हा योग लिहिताना राहून राहून सावरकराच्या "जें जें उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें" ह्या ओळी मनात रुंजी घालत होत्या.... इथून पुढे जें जें सुंदर दिसेल, जें जें भव्य दिसेल, जिथे दिव्यत्वाची प्रचीति ये, तिथे 'हे श्रीकृष्णा! त्या विभूति रूपात मला "तू" दिसशील'.

क्रमश:



अलका देशपांडे







No comments:

Post a Comment