गीताई : अध्याय ११ - विश्वरूप दर्शन योग

 


खरे  सांगायचे  तर या अध्यायाचा क्रम येण्याची मी प्रचंड आतुरतेने वाट पाहात होते. अध्यायांमागून अध्यायांवर लिहिताना कधी एकदा 'विश्वरूप दर्शन योग अध्याय' येतो असे  मला झाले  होते. जणू मला स्वतःलाच तें श्रीकृष्णाचं विश्वरूप दर्शन माझ्या चर्मचक्षुंनी  घडणार होते. पण आज जेव्हा मी इथवर पोहोचले तेव्हा थोडी भीती वाटू लागली. माझे शब्द तोकडे तर पडणार नाहीत ना... मी आ.. वासून परमेश्वराचं हे रूप पाहताना लिहायचं तर विसरून जाणार नाही ना..... पाहू काय होतय तें...

मागच्या विभूती  योगात श्रीकृष्णांनी त्यांच्या नानाविध विभूती  रूपांची अर्जुनाला उदाहरणे  दिली आणि शेवटी हे ही सांगितलं "हे सगळं   विसर आणि एकच लक्षात ठेव, मी एकांशाने सर्व विश्व् व्यापून उरलो आहे... मी सर्वत्र आहे" आता अर्जुनाचे कुतूहल शिगेला न पोहोचते तरच नवल. अर्जुनाने श्रीकृष्णाला वेगळीच गळ घातली आणि आपल्या लाडक्या मित्राखातर श्रीकृष्णाने त्याची ती इच्छा पूर्ण केली आणि त्या परमेश्वरी शक्तीच्या अद्भूत   रूपाचे  वर्णन कायमचे  शब्दबद्ध झाले.. थोडे  संजयाच्या तोंडून, तर बरेचसं   अर्जुनाच्या तोंडून. या अध्यायात एकूण ५५ श्लोक आहेत.

अर्जुन म्हणतो -

करूनि करूणा माझी बोलिलास रहस्य जे

त्या थोर आत्म-विद्येने माझा हा मोह फेडिला

उत्पत्ति-नाश भूतांचे ऐकिले मी सविस्तर

कळला तुजपासूनि अभंग महिमा तुझा

माझ्यावर तुमची एवढी अगाध कृपा आहे की तुम्ही मला अनेक रहस्ये सांगितलीत, आत्मविद्येचे थोर ज्ञान देऊन माझ्या शंका दूर केल्यात. पंचमहाभूतांच्या उत्पत्ती, त्यांचा नाश सर्वकाही मी तुमच्याकडून ऐकले. तुमचा अभंग असा महिमा मला कळाला पण.... पण पुढे काय?

तुझे ते ईश्वरी रूप मानितो सांगसी जसे

ते चि मी इच्छितो पाहू प्रत्यक्ष पुरूषोत्तमा

तू जरी मानिसी शक्य मज ते रूप पाहणे

तरी योगेश्वरा देवा दाखवी ते चि शाश्वत

तुझे  ते जे ईश्वरी रूप म्हणतोयस ते मी प्रत्यक्ष पाहू इच्छितो. जर तुला वाटत असेल की हे रूप पाहणे  मला शक्य आहे तर मला कृपा करून तुझे रूप दाखव. युद्धभूमीवरच्या संवादात किती नाट्यमय प्रसंग आला पहा. मानवी रूपातल्या परमेश्वराला, त्याच्या मित्राने, भक्ताने त्याचे  ईश्वरी रूप दाखवण्याची गळ घातली.

देव समोर जर आला तर भक्त काय मागू शकतो तें पाहिलंत!

यावर श्रीकृष्ण पहा काय उत्तर देतात.

पहा दिव्य तशी माझी रूपे शत-सहस्र तू

नाना प्रकार आकार वर्ण ज्यात विचित्र चि

वसु वायु पहा रुद्र तसे आदित्य अश्विनी

पहा अनेक आश्चर्ये कधी कोणी न पाहिली


श्रीकृष्ण म्हणतात, हे पार्था तू आता माझी नानाविध रूपातील नाना रंगातील शत सहस्त्र म्हणजे लाखो रूपे पहा. माझ्यात अष्टवसु, अदितीचे बारा पुत्र, सर्व रुद्र, अश्विनीकुमार आणि मरुत गणांना तू पहा. ही सगळी कुणीही कधीही पाहिली नाहीत अशी आश्चर्य आहेत.

इथे आज पहा सारे विश्व तू सचराचर

माझ्या देहांत एकत्र इच्छा-दर्शन हे तुज

परी तू चर्म-चक्षूने पाहू न शकसी मज

घे दिव्य दृष्टि ही माझा ईश्वरी योग तू पहा

 

साध्या डोळ्यांनी चर्मचक्षूंनी हे विराट तेजस्वी रूप पाहता येणं शक्य नाही. तेव्हा अर्जुना,

ही घे दिव्य दृष्टी आणि माझ्या एकाच देहात तू हे सारं विश्व्, सारं चराचर एकवटलेले  पहा.

पहिल्या अध्याया नंतर प्रथमच संजय काही बोलतो. पुढच्या श्लोकात संजयाने धृतराष्ट्राला श्रीकृष्णाच्या विराट विश्वरूपाचे  वर्णन केले  आहे आणि त्यानंतरच पूर्ण वर्णन अर्जुनाच्या तोंडून ऐकायला मिळते....

महा-योगेश्वरे कृष्णे राया बोलूनि ह्यापरी

दाविले तेथ पार्थास थोरले रूप ईश्वरी

बहु डोळे मुखे ज्यांत दर्शने बहु अद्भुत

बहु दिव्य अलंकार सज्ज दिव्यायुधे बहु

दिव्य वस्त्रे फुले गंध लेउनी सर्वतोपरी

आश्चर्ये भरला देव विश्व-व्यापी अनंत तो

  संजय म्हणतो, महा योगेश्वर कृष्णाने अशाप्रकारे अर्जुनाला आधी कल्पना देऊन आपले प्रचंड ईश्वरी रूप दाखवले. अनेक डोळे ज्यांत नानाविध घटनांचे  दर्शन एकाच वेळी घडत होते, अनेक अलंकारांनी नटलेले  अनेक शस्त्रास्त्र, आयुधांनी सज्ज असं तें रूप, अनेक सुंदर वस्त्र, फुलं, यांनी सजलेला तो देव विश्व व्यापुन उरण्या इतका मोठा दिसतो आहे.

प्रभा सहस्र-सूर्यांची नभी एकवटे जरी

तरी त्या थोर देवाच्या प्रभेशी न तुळे चि ती


हजारो सूर्याचे तेज एकवटले तरी त्याची या परमेश्वरी रूपाशी तुलना करता येणार नाही.

पुढे संजय म्हणतो -

सारे जगांतले भेद तेंव्हा कालवले जसे

देहांत देव-देवाच्या देखिले तेथ अर्जुने


सगळ्या जगातल वैविध्य जणू एकत्र येऊन एकाच कश्यात तरी सामावले  जावे  तसे  "देहांत देव देवांच्या देखिले तेथ अर्जुना" श्रीकृष्णाच्या या विराट देव रूपात अनेक देव सामावलेले अर्जुनाला दिसत आहेत.


मग विस्मित तो झाला अंगी रोमांच दाटले।

प्रभूस हात जोडूनि बोलिला नत-मस्तक॥ १४ ॥

 

संजय धृतराष्ट्राला सांगतोय की हे सगळं पाहून अर्जुन विस्मयचकित झालाय. त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले आहेत... आणि हात जोडून नतमस्तक होऊन तो म्हणतो आहे....

देखे प्रभो देव तुझ्या शरीरी। कोंदाटले सर्व चि भूत-संघ॥

पद्मासनी ध्यान धरी विधाता। ऋषींसवे खेळत दिव्य सर्प

लेऊनि डोळे मुख हात पोट। जिथे तिथे तू चि अनंत-मूर्ते॥

विश्वेश्वरा शेवट मध्य मूळ। तुझ्या न मी देखत विश्व-रूपी॥

प्रभो गदा-चक्र-किरीट-धारी। प्रकाश सर्वत्र तुझा प्रचंड॥

डोळे न पाहू शकती अपार । ज्यांतूनि हे पेटत अग्नि-सूर्य॥

 हे प्रभू, तुझ्या शरीरात मला पंच महाभूते एकवटलेली दिसताहेत. सृष्टिनायक विधाता पद्मासनात ध्यान लावून बसला आहे. ऋषीं मुनी दिव्य सर्पांशी खेळत आहेत. जिथे तिथे मला अनेक हात, डोळे, पोट, मुख दिसत आहेत. मला या तुझ्या विश्वरूपाची सुरुवात कुठे होतेय आणि अंत कुठे होतो, याचा मध्य कुठे आहे काहीच कळत नाहीये. मुकुट धारी असा तू अनेक हातात अनेक गदा, चक्र धारण केले आहेस... अनेक अग्नी सूर्य पेटले आहेत... हे इतके  काही अपार आहे की डोळे दिपत आहेत.

 

तू थोर ते अक्षर जाणण्याचे। तुझा चि आधार जगास अंती॥

तू राखिसी शाश्वत-धर्म नित्य। मी मानितो तू परमात्म-तत्त्व

किती भुजा वीर्य किती पसारा। डोळे कसे उज्ज्वल चंद्र-सूर्य॥

हा पेटला अग्नि तुझ्या मुखात। तू ताविसी सर्व चिआत्म-तेजे॥

दाही दिशा विस्तृत अंतराळ। व्यापूनि तू एक चि राहिलासी॥

पाहूनि हे अद्भूत उग्र रूप। तिन्ही जगे व्याकुळली उदारा॥

हे देव सारे रिघती तुझ्यांत। कोणी भये प्रार्थित बद्ध-हस्त॥

मांगल्य-गीते तुज सिद्ध संत। परोपरी आळविती समस्त॥

आदित्य विश्वे वसु रुद्र साध्य। कुमार दोघे पितृ-देव वायु॥

गंधर्व दैत्यांसह यक्ष सिद्ध। सारे कसे विस्मित पाहताती॥

 

हे पाहिल्यावर अर्जुनाला कळून चुकले की समोर कोण उभे  आहे. तो म्हणतो, "तूच महान अविनाशी अक्षर जाणून घ्यावास असा आहेस. जगाला शेवटी तुझाच आधार आहे. शाश्वत सनातन धर्माचा तूच रक्षण कर्ता आहेस...मला पटलं की तूच तें परमात्म तत्व आहेस. बाप रे किती तें हात, चंद्र सूर्यासारखे तेजस्वी डोळे आणि तुझ्या मुखात प्रचंड अग्नी पेटला आहे. आत्मतेजाने तू सगळं विश्वच प्रकाशित केल आहेस. दाही दिशा आणि अंतराळ व्यापून उरलेलं तुझं हे अदभूत उग्र रूप पाहून तिन्ही लोक व्याकूळ झाले आहेत. सारे देव तुझ्या मध्ये विलीन होताना दिसताहेत. कुणी भीतीने हात जोडले आहेत, कुणी तुझ्या स्तुतीची गीते  गात आहेत. आदित्य, वसु, रुद्र, गंधर्व, दैत्य, यक्ष, सिद्ध सगळेच विस्मयचकित होऊन पाहात आहेत.

अफाट हे रूप असंख्य डोळे। मुखे भुजा ऊरू असंख्य पाय॥

असंख्य पोटे विकराळ दाढा। ह्या दर्शने व्याकुळ लोक मी हि॥

भेदूनि आकाश भरूनि रंगी। फाडूनि डोळे उघडूनि तोंडे॥

तू पेटलासी बघ जीव माझा। भ्याला न देखे शम आणि धीर॥

कराळ दाढा विकराळ तोंडे। कल्पांत-अग्नीसम देखतां चि॥

दिङ्-मूढ झालो सुख ते पळाले। प्रसन्न हो की जग हे तुझे चि॥

 गंत अशी आहे, की अर्जुन कृष्णालाच त्याचे  अदभूत रूप कसं दिसतंय तें सांगतोय... अफाट अशा या रुपाला असंख्य डोळे आहेत असंख्य हात आहेत, असंख्य पोटं, विक्राळ दाढा.. हे पाहून मी ही व्याकुळ झालो आहे. आकाश भेदून नानाविध रंगात प्रभू तू पसरला आहेस, अनेक पसरलेली तोंडे आणि विशाल तेजस्वी डोळे पाहून माझा धीर राहत नाहीये... जीव कावरा बावरा होतोय. कराल दाढा, विक्राळ तोंडे पाहून मी दिङमूढ झालो आहे. मला अस्वथ वाटतंय. कृपा करून माझ्यावर प्रसन्न हो.

पुढे पहा अर्जुनाला काय दिसलं तें... श्रीकृष्णाने उगीचच नाही अर्जुनाला विश्वरूप दाखवलं... पहा त्याचा काय हेतू होता ते.

अहा कसे हे धृतराष्ट्र-पुत्र। घेऊनिया राज-समूह सारे॥

हे भीष्म हे द्रोण तसा चि कर्ण। हे आमुचे वीर हि मुख्य मुख्य॥२६॥

जाती त्वरेने चि तुझ्या मुखांत। भयाण जी भ्यासुर ज्यांत दाढा॥

दातांत काही शिरली शिरे जी। त्यांचे जसे पीठ चि पाहतो मी॥


अर्जुन वर्णन करतोय... धृतराष्ट्राचे पुत्र कौरव, त्यांच्या बरोबर सारे राजसमूह, भीष्म, द्रोण, कर्ण, तसेच आमच्या बाजूचेही काही मुख्य राजे वेगाने परमेश्वराच्या विराट मुखात जात आहेत..भयाण अशा दाढांमध्ये ही माणसं चिरडली जात आहेत अनेक डोकी दाताच्या फटीत अडकली आहेत, अनेक डोकी चूर्ण होत आहेत... बापरे ! माझे हे लिहितानाच श्वास नाकात अडकले.... अर्जुनाचे  काय झाले  असेल?

जसे नद्यांचे सगळे प्रवाह। वेगे समुद्रांत चि धाव घेती॥

तसे तुझ्या हे जळत्या मुखांत। धावूनि जाती नर-वीर सारे॥

भरूनिया वेग जसे पतंग। घेती उड्या अग्नि-मुखी मराया॥

तसे चि हे लोक तुझ्या मुखांत। घेती उड्या वेग-भरे मराया॥२९॥

समस्त लोकांस गिळूनि ओठ। तू चाटितोसी जळत्या जिभांनी॥

वेढूनि विश्वास समग्र तेजे। भाजे प्रभो उग्र तुझी प्रभा ही॥

सांगा असा कोण तुम्ही भयाण। नमूं तुम्हां देव-वरा न कोपा॥

जाणावया उत्सुक आदि-देवा। ध्यानी न ये की करणी कशी ही॥

उत्तेजित होऊन जें दिसत होते  त्याचे  वर्णन अर्जुन कृष्णालाच सांगत होता असे  वाटते... तो म्हणतो जसे नद्यांचे प्रवाह समुद्रात धाव घेतात तसे हे सगळे वीर पुरुष तुझ्या जळत्या मुखात विलीन होताना दिसताहेत. सर्व लोकांना गिळून जळत्या जिभांनी तू ओठ चाटतो आहेस. बाप रे! सगळ्या जगाला तेजाने वेढल्याने, त्या तेजाच्याच झळांनी भाजायला होत आहे. लिहितानाही जणू त्या झळा मला जाणवत आहेत असे वाटते.

अर्जुन म्हणतो हे भयंकर रूप धारण करणारे आपण कोण हात? हे आदिपुरुषा, मला काहीच कळत नाहीये. एवढ्या प्रखर तेजाने भाजतानाही अर्जुन प्रश्न विचारायला विसरत नाही.

श्रीकृष्ण उत्तर देतात...आणि हेच सगळ्यात चित्तवेधक उत्तर आहे... आता तुमच्या लक्षात येइल भगवंतांनी इतके  विराट पण तितकेच भयंकर रूप का दाखवले  ते.

मी काळ लोकांतक वाढलेला। भक्षावया सिद्ध इथे जनांस॥

हे नष्ट होतील तुझ्या विना हि। झाले उभे जे उभयत्र वीर॥

म्हणूनि तू ऊठ मिळीव कीर्ति। जिंकूनि निष्कंटक राज्य भोगी॥

मी मारिले हे सगळे चि आधी। निमित्त हो केवळ सव्य-साची॥

द्रोणास भीष्मास जयद्रथास। कर्णादि वीरांस रणांगणात॥

मी मारिलेल्यांस फिरूनि मारी। निःशंक झुंजे जय तो तुझा चि॥


श्रीकृष्ण म्हणतात मी वाढलेला लोकांतक काळ आहे..... लोकांचे भक्षण करायला सिद्ध झालेला...अर्जुना तू नसलास तरीही हे सगळे दोन्हीं बाजूला उभे असलेले वीर शेवटी मरणारच आहेत. म्हणून आणि म्हणूनच हे अर्जुना उठ आणि युद्ध कर... अरे द्रोण, भीष्म, जयंद्रथ, कर्ण या सारख्या वीरांस मी आधीच मारलं आहे. त्यांना तू पुन्हा काय मारणार? तू केवळ निमित्त असणार आहेस. हाच मुख्य मुद्दा आहे,... श्रीकृष्णांनी काहीही बाकी ठेवलं नाही. अर्जुनाला समजावण्या साठी.....

हे सगळं पाहणारा संजय धृतराष्ट्राला म्हणतोय -

ऐकूनि हे अर्जुन कृष्ण-वाक्य। भ्याला जसा कापत हात जोडी॥

कृष्णास वंदूनि पुनश्च बोले । लवूनिया तेथ गळा भरूनि॥


कृष्णाचे  हे बोलणे  ऐकून भीतीने कापत हात जोडून अर्जुन नमस्कार करून पुन्हा बोलू लागतो.. अर्जुनाचा कंठ भरून आला आहे.

जगी तुझ्या युक्त चि कीर्तनाने। आनंद लोटे अनुराग दाटे॥

भ्याले कसे राक्षस धाव घेती। हे वंदिती सिद्ध-समूह सारे॥

प्रभो न का हे तुज वंदितील। कर्त्यास कर्ता गुरू तू गुरूस॥

आधार तू अक्षर तू अनंता। आहेस नाहीस पलीकडे तू॥

देवादि तू तू चि पुराण आत्मा। जगास ह्या अंतिम आसरा तू॥

तू जाणतोसी तुज मोक्ष-धामा। विस्तारिसी विश्व अनंत-रूपा॥

तू अग्नि तू वायु समस्त देव। प्रजापते तू चि पिता वडील॥

असो नमस्कार सहस्र वार। पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हा॥

समोर मागे सगळीकडे चि। असो नमस्कार जिथे जिथे तू॥

उत्साह सामर्थ्य तुझे अनंत। तू सर्व की सर्व तुझ्या चि पोटी॥


अर्जुन म्हणतो, या जगात तुझ्या नाम संकीर्तनाने आनंद निर्माण होतो. पहा, कसे सारे राक्षस पळत सुटले आहेत. सारे सिद्ध समूह तुला वंदन करताहेत. आणि हे सगळे तुला का बरे  वंदन करणार नाहीत? तूच सर्व कर्त्यांचा कर्ता, गुरूंचा गुरु आहेस.. तूच सगळ्यांचा आधार, अक्षर, अनंत आहेस... या सगळ्यांच्या पलीकडे तू आहेसही आणि नाहीसही. तू देवादि, सर्व देवांच्याही आधीचा, सर्वात पुरातन आत्मा आहेस. या जगाचा शेवटचा आसरा आहेस. तूच मोक्षाचे  धाम आहेस आणि विश्वाचा अनंत रूप विस्तार आहेस. तूच अग्नी, वायू आणि सहस्त्रावधी देव आहेस. तू प्रजापती, विश्वाचा पिता आहेस.

"असो नमस्कार सहस्त्रवारl पून्हा पून्हा आणि पून्हा पून्हाl"

 अर्जुनाची काय अवस्था झाली असेल याची आपण कल्पना करू शकतो. "दिव्यत्वाची जेथ प्रचीति तेथे कर माझे जुळती " अर्जुन नतमस्तक झाला आहे स्वतःच्या मित्रासमोर. पुढच्या ओळी फार रंजक आहेत... आपल्याला जर अचानक कळलं आपला अगदी जवळचा मित्र ज्याला आपण अरे तुरे करतो, चिडवतो, टर उडवतो तो जर कोणी महान व्यक्ती आहे, तर आपल्याला भूतकाळातील आपलं वर्तन आठवून खजील व्हायला होईल... अर्जुनाचे  अगदी तसेच होते. पहा तो कृष्णाला काय म्हणतो.....

समान मानी अविनीत-भावे। कृष्णा गड्या हाक अशी चि मारी॥

न जाणता हा महिमा तुझा मी। प्रेमे प्रमादे बहु बोल बोले॥

खेळे निजे स्वैर चि खात बैसे। चेष्टा करी सर्व तुझ्या समोर॥

जनी मनी वा तुज तुच्छ लेखे। क्षमा करी भान तुझे कुणास॥

 अर्जुन म्हणतो, माहिती  नसल्याने, अज्ञानाने मी तुला माझ्या बरोबरीचा समजत होतो. "कृष्णा, मित्रा" अशी एकेरी हाक मारायचो.. तुझा हा महिमा माहित नसल्याने प्रेमाने, मस्तीत तुला मी खूप काय काय बोललो असेन..तुझ्या बरोबर खेळलो, बागडलो, तुला न देता कधी कधी एकट्यानेच खाऊ खाल्ला...तुझी थट्टा मस्करी करायचो. कधी कधी लोकांसमोर किंवा मनात तुला मी कमी ही लेखलेलं आहे.... मला क्षमा कर....मला कुठे रे माहिती  होते  तुझे  खरे  रूप! हे वाचायला मला खूप मजा आली... किती ralatable वाटते ना हे! आता हा अध्याय अधिकच रंजक होतो. पुढे काय होतं पाहू या.

आहेस तू बाप चराचरास। आहेस मोठी गुरू-देवता तू॥

तुझी न जोडी तुज कोण मोडी। तिन्ही जगी ह्या उपमा चि थोडी॥

म्हणूनि लोटांगण घालितो मी। प्रसन्न होई स्तवनीय-मूर्ते॥

क्षमा करी बा मज लेकराते। सखा सख्याते प्रिय तू प्रियाते॥

अपूर्व पाहूनि अपार धालो। परी मनी व्याकुळता न जाय॥

पुन्हा बघू दे मज ते चि रूप। प्रसन्न होई जगदीश्वरा तू॥

घेई गदा चक्र किरीट घाली। तसे चि पाहू तुज इच्छितो मी॥

अनंत बाहूंस गिळूनि पोटी। चहू भुजांचा नट विश्व-मूर्ते॥

 वरच्या श्लोकात अर्जुन कृष्णाला विनवतो "हे प्रभो तू तर सगळ्यांचा बाप निघालास, तुला कोण जोडणार, तुला कोण मोडणार? त्रिलोकी तुला उपमा नाही. तुझ्या सामोरं मी लोटांगण घालतो...मी तुझं लेकरू समजून मला माफ कर. "सखा सख्याते, प्रिय तू प्रियाते" तू सर्व सख्यांचा सखा, मला परमप्रिय आहेस. तुझं हे विराट अपूर्व रूप पाहून मी थिजून गेलो आहे.. पण माझ्या मनाची व्याकुळता जात नाहीये. "पून्हा पाहू दे मज ते ची रूप, प्रसन्न होई जगदीश्वरा तू". अर्जुनानेच गळ घातली होती मला तुझं दिव्य रूप दाखव म्हणून, पण आता तोच कृष्णाला मूळ रूपात यायची विनवणी करतो आहे. तुझ्या नेहमीच्या गदा चक्र मुकुट अशा रोजच्या रूपात परत ये!

श्री भगवान् यावर काय म्हणतात बघूया

प्रसन्न होऊनि रचूनि योग। हे दाविले मी तुज विश्व-रूप॥

अनंत तेजोमय आद्य थोर। जे पाहिले आजवरी न कोणी॥

घोकूनिया वेद करूनि कर्मे यजूनि वा उग्र तपे तपूनि॥

देऊनि दाने जगती न शक्य। तुझ्याविना दर्शन हे कुणास॥

होऊ नको व्याकुळ मूढ-भावे। पाहूनि हे रूप भयाण माझे॥

प्रसन्न-चित्ते भय सोडुनी तू। पहा पुन्हा ते प्रिय पूर्व-रूप॥

 श्रीकृष्ण म्हणतात -

वत्सा तुझ्यावर प्रसन्न होऊन आजवर कोणीही पाहिले  नाही असे  तेजोमय आद्य विश्वरूप दर्शन मी तुला या योगाची रचना करून दाखवून दिले. वेदांची कितीही घोकंपट्टी केली, कितीही उग्र तपसाधना केली, कितीही दान धर्म केले तरी हे दर्शन शक्य नाही... माझं हे भयाण रूप पाहून वेड्यासारखा व्याकूळ होऊ नकोस...भीति सोडून प्रसन्न चित्ताने माझं आधीच सौम्य तुला प्रिय असलेलं रूप तू पहा.

संजय म्हणाला -

बोलूनि ऐसे मग वासुदेवे। पार्थास ते दाखविले स्वरूप॥

भ्याल्यास आश्वासन द्यावया तो। झाला पुन्हा सौम्य उदार देव॥

 संजय धृतराष्ट्राला सांगतो...श्रीकृष्णांनी अशा प्रकारे अर्जुनाला आपले प्रचंड स्वरूप दाखवले आणि भिऊन गलितगात्र झालेल्या अर्जुनाला आश्वस्त करण्यासाठी तो उदार देव पुन्हा आपल्या सौम्य रूपात प्रकट झाला.


पाहूनि हे तुझे सौम्य मानुषी रुप माधवा। झालो प्रसन्न मी आता आळो भानावरी पुन्हा॥


अर्जुन म्हणतो, तुझं हे सौम्य मानवी रूप बघून आता बर वाटतंय.... 

यावर स्वतःशीच हसून श्रीकृष्ण म्हणतात

हे पाहिलेस तू माझे अति दुर्लभ दर्शन। आशा चि राखुनी ज्याची झुरती नित्य देव हि॥

यज्ञ-दान-तपे केली वेदाभ्यास हि साधिला। तरी दर्शन हे माझे नलाभे लाभले तुज॥

लाभे अनन्य-भक्तीने माझे हे ज्ञान-दर्शन। दर्शने होय माझ्यांत प्रवेश मग तत्त्वतां॥

माझ्या कर्मांत जो मग्न भक्तीने भरला असे। जगी निःसंग निर्वैर मिळे तो मज मत्पर॥

 अनेक देव जें रूप पाहण्याची आशा ठेवून झुरतात, ते माझे अतिदुर्लभ दर्शन आज तुला झाले. अनेक यज्ञ, तप, दान, वेदाभ्यास करूनही तुला हे साधले नसते.. तुझ्या अनन्य भक्तीमुळे तुला आज माझे हे दर्शन झाले.. पुढे भगवान आश्वासन देतात, जो माझ्या भक्तीने भारलेला असतो.. तो जगात निःसंग, निर्वैर होऊन मला येऊन मिळतो.

काय अलौकिक अनुभव होता या अध्यायावर लिहिणे! मला मी ही या संवादाचा एक भाग आहे असे  वाटायला लागले  आहे... धृतराष्ट्र, संजय, श्रीकृष्ण, अर्जुन, महर्षी व्यास, विनोबाजी हे सगळेच माझ्या भावविश्वाचा, मनोव्यापाराचा भाग झाले आहेत... मी गीता जगू लागले आहे... अथांग असीम आकाशाकडे पाहताना, तेजस्वी सूर्यबिंब पाहताना, समुद्राचे  अमर्याद रूप पाहताना, उत्तुंग पर्वत रांगा पाहताना तसंच लक्षावधी डोकी आणि लक्षावधी हात असलेला, .हजारो लोकांचा जनसमुदाय पाहताना मला त्यात श्रीकृष्णाचे विराट विश्वरूप दर्शन घडू लागले आहे....

I feel blessed.

क्रमश:

 अलका देशपांडे 






No comments:

Post a Comment