मागील अध्यायात आपल्याला
श्रीकृष्णांच्या पुरुषोत्तम रूपाची ओळख झाली. चराचरात सामावलेला हा परमेश्वर अगदी
प्राणिमात्रांच्या ठायी जठराग्नीच्या रूपात सुद्धा आहे हे देखील आपल्याला कळले. भौतिक आणि अधिभौतिक
अस्तित्वाची अनेक गुपिते आता पर्यंत श्रीकृष्ण एकेका अध्यायांतून त्यांच्या लाडक्या अर्जुनाला सांगत गेले.
या अध्यायात बघूया ज्ञानाचे कुठले दालन उघडते ते.....
मला आता प्रत्येकवेळी नवीन अध्यायाची
सुरुवात करताना 'तीळा तीळा दार उघड" असे म्हणावेसे वाटतेय. देवासूर संपविभाग योगात एकूण २४ श्लोक आहेत. दैवी वृत्ती कुठल्या
आणि आसुरी, राक्षसी वृत्ती कुठल्या हे श्रीकृष्णांनी विस्ताराने उदाहरणे देऊन सांगितले आहे.
भगवान म्हणतात -
निर्भयत्व मनःशुद्धि योग-ज्ञानी सुनिश्चय।
यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋजुता तप॥१॥
अहिंसा शांति अक्रोध त्याग सौजन्य सत्यता।
अ-लुब्धता दया भूती मर्यादा स्थैर्य मार्दव॥२॥
पवित्रता क्षमा तेज धैर्य अद्रोह नम्रता।
हे त्याचे गुण जो आला दैवी संपत्ति घेउनी॥३॥
या अध्यायाच्या पहिल्या तीन श्लोकांत श्रीकृष्णांनी दैवी गुणांचे वर्णन
केले आहे आणि उरलेल्या सतरा श्लोकांत श्रीकृष्णांनी आसुरी वृत्तीचे
वर्णन केले आहे. श्रीकृष्ण म्हणतात जी व्यक्ती मनाने निर्भय, शुद्ध मनाची असते, योगाचरण करणारी ज्ञानवंत असते,
जिच्यात अभ्यासू वृत्ती असते, जी दानशूर असते, जी व्यक्ती चांगले दृढ संकल्प मनी
धरते, जिचा तप, साधना करण्याकडे कल आहे, जी मनाने सरळ ऋजु स्वभावाची आहे, जी व्यक्ती अहिंसेचे
आचरण करते, नेहमी शांत असते, जिला कधी राग येत नाही किंवा रागावर नियंत्रण करता
येत, जी व्यक्ती त्यागी, सौजन्यशील, सत्याची पाठीराखी असते, जी व्यक्ती निर्लोभ,
अलुब्ध असते, जी सर्व भूतमात्रांत दया बुद्धि राखून असते, जी व्यक्ती मर्यादशील, स्थिर आणि मार्दवशील असते,
पवित्रता, क्षमा, तेज, धैर्य, अद्रोह, नम्रता हे गुण ज्या व्यक्तीच्या ठायी असतात
ती व्यक्ती दैवी संपत्ती घेऊन आलेली आहे असे समजावे......
अहाहा... किती सुंदर संक्षिप्त वर्णन
आहे... माणसाने कुठल्या गुणांनी युक्त असावे याचे सूत्रच जणू ...फक्त ३ श्लोक पण किती सारे दैवी गुण
सांगितले आहेत. इथे मला विनोबांच्या कवित्वाचे इतके कौतुक करावेसे वाटते.. अक्रोध, अलुब्धता, अद्रोह असे
किती सुंदर आपण कधी न वापरलेले पण नेमका भावार्थ सांगणारे शब्द विनोबांनी श्लोकांत
नेमके पेरले
आहेत. गीताईतील सौंदर्यस्थळे हा एक वेगळा लिखाणाचा विषयच होऊ
शकतो.
दंभ मीपण अज्ञान क्रोध दर्प कठोरता।
लाभती गुण हे त्यास ज्याची संपत्ति आसुरी॥४॥
सुटका करिते दैवी आसुरी बंध घालिते।
भिऊ नको चि आलास दैवी संपत्ति जोडुनी॥५॥
भूत-सृष्टि जगी दोन दैवी आणिक आसुरी।
विस्तारे वर्णिली दैवी आसुरी ऐक सांगतो॥६॥
श्रीकृष्ण म्हणतात दांभिकपणा,
अज्ञान, संताप, राग, अहंकाराचा दर्प, कठोरपणा हे गुण किंवा दुर्गुण ज्यांच्या ठायी
आहेत त्यांच्या जवळ आसुरी संपत्ती आहे असे समजावे ... श्रीकृष्णाचे या गुणा-दुर्गुणांना संपत्ती म्हणणे मला मजेशीर वाटते...मोठे चतुर आहेत कृष्ण... संपत्ती
बऱ्याच जणांकडे असते पण ती चांगल्या मार्गाने मिळवलेली असते किंवा वाईट
मार्गाने... तशीच पहिल्या तीन श्लोकांत सांगितलेले गुण ही दैवी संपत्ती तर
दुर्गुण ही आसुरी संपत्ती असे भगवान म्हणतात.
आता कृष्ण अर्जुनाला direct सांगतात...मोठ्ठे गंमतीदार वाक्य आहे "भिऊ नको चि आलास दैवी
संपत्ति जोडुनी"
भगवान म्हणतात की दैवी गुणांची संपत्ती माणसाची सुटका करते तर आसुरी
गुणांची संपत्ती त्याला बंधनात बांधते. पण अर्जुना तू घाबरून जाऊ नकोस. तू दैवी संपत्ती जोडूनच आला आहेस. जागोजागी पहा श्रीकृष्ण आपल्या
लाडक्या मित्राच्या मनाची कशी काळजी घेतात. श्रीकृष्ण म्हणतात या भूतमात्रांच्या
जगात दैवी आणि आसुरी अशा दोन गुणसंपत्ती आहेत. दैवी गुणसंपत्ती कोणती ते मी तुला आधीच सांगितले. आता आसुरी गुणसंपत्तीविषयी ऐक.
कृत्याकृत्य कसे काय नेणती आसुरी जन।
न स्वच्छता न आचार जाणती ते न सत्य हि॥७॥
म्हणती लटिके विश्व निराधार निरीश्वर।
काम-मूलक हे सारे कोठले सह-कार्य ते॥८॥
स्वीकारूनि अशी दृष्टि नष्टात्मे ज्ञान-हीन ते।
जगताच्या क्षयासाठी निघाले रिपु हिंसक॥९॥
तर आता हे असुर प्रवृत्तीचे वर्णन ऐका.. जे आसुरी प्रवृत्तीचे
लोक असतात,
ते कृत्य म्हणजे काय,
अकृत्य म्हणजे काय व कसे ते जाणत नाहीत. ते स्वछता बाळगत नाहीत, त्यांचे आचरण धड नसते आणि त्यांना सत्य काय याचीही कल्पना
नसते. त्यांना तात्पुरत्या आनंदात रस असतो. ते अधांतरी, परमेश्वरावर श्रद्धा नसलेले, जगाची
उत्पत्ती ही "काम" वासनेतून होते असे मानणारे असे हे
ज्ञानहीन नष्टात्मे, हिंसक आणि जगाच्या नाशाला कारणीभूत
होऊ शकतील असे शत्रूसमान लोक असतात.
काम दुर्भर सेवूनि मानी दांभिक माजले।
दुराग्रह-बळे मूढ करिती पाप निश्चये॥१०॥
अपार धरिती चिंता जी मेल्या हि सरे चि ना।
गढले काम-भोगात जणू सर्वस्व मानुनी॥११॥
आशेचे लेइले फांस काम-क्रोधांत तत्पर।
भोगासाठी अधर्माने इच्छिती धन-संचय॥१२॥
अशी माणसे दांभिक, अहंकारी आणि कामुक वृत्तीची
असतात. त्यांच्या दुराग्रही, मूर्ख वर्तनामुळे ते पापाचे धनी होतात. ही माणसे इतकी चिंता करतात की ते मेल्यावरही
संपणार नाही इतकी चिंता ते करतात. या ओळी मला खूप आवडल्या "अपार धरिती चिंता जी मेल्या
हि सरे चि ना।"
मस्त विनोबाजी! कुकर्म केल्यावर चिंता पाठ
सोडेल का?
काम, भोग यालाच सर्वस्व मानून त्यातच जे रममाण झाले आहेत, ज्यांच्या गळ्याभोवती आशेचे, लालचीपणाचे फास आवळले आहेत, काम,
क्रोध हे क्षणोक्षणी व्यक्त होत आहेत, स्वतःच्या भोगासाठी अधर्माने (वाम मार्गाने) पैसा कमावण्याची जे इच्छा बाळगतात ते
सर्व असुरी वृत्तीचे आहेत.
हे आज लाभले आता तो जोडीन मनोरथ।
हे आहे ते हि होईल माझे चि सगळे धन॥१३॥
मी मारिला चि तो शत्रु मारीन दुसरे हि जे।
मी स्वामी आणि मी भोक्ता सुखी मी सिद्ध मी बळी॥१४॥
कुलीन मी चि संपन्न माझी जोडी कुठे असे।
यज्ञ-दान-विलासी मी जल्पती अज्ञ मोहित॥१५
भ्रमले चित्त भेदूनि मोह-जालांत गुंतले।
पडती विषयासक्त नरकांत अमंगळ॥१६॥
स्वयं-पूजित गर्विष्ठ धने माने मदांध ते।
नावाचे करिती यज्ञ दंभाने अव्यवस्थित॥१७॥
अहंकारे बळे दर्पे काम-क्रोधे भरूनिया।
माझा स्व-पर-देहांत करिती द्वेष मत्सरी॥१८॥
द्वेषी क्रूर असे पापी संसारी हीन जे जन।
त्यांस मी टकितो नित्य तशा योनीत आसुरी॥१९॥
जोडूनि आसुरी योनि जन्मजन्मांतरी मग।
माते न मिळता जाती उत्तरोत्तर खालती॥२०॥
काम क्रोध तसा लोभ आत्म-नाशास कारण।
तीन ही नरक-द्वारे टाळावी चि म्हणूनिया॥२१॥
अशा प्रकारचे द्वेषी, क्रूर, पापी,
हीनपणे वागणारे जे लोक असतात, त्यांना मी नेहमीच तशाच असुरी योनीत
जन्माला घालतो. अशी जी लोकं आहेत त्यांचा जन्मजन्मान्तर असुरी योनीत जन्म होऊन ते सदैव
अधोगतीला जातात आणि ते माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही.
काम, क्रोध आणि लोभ हे तिन्ही आत्मनाशास
कारणीभूत ठरतात. काम, क्रोध, लोभ ही तीनही नरकाची द्वारे आहेत आणि म्हणूनच माणसाने
ती टाळली पाहिजेत.
तमाची ही तिन्ही द्वारे टाळूनि सुटला मग।
कल्याण-मार्ग सेवूनि पावे उत्तम तो गति॥२२॥
जो शास्त्र-मार्ग सोडूनि करितो स्वैर वर्तन।
न सिद्धि लाभते त्यास न वा सुख न सद्-गति॥२३॥
काम, क्रोध, लोभ ही तमाची म्हणजे
अंधकाराची द्वारे
आहेत. ती जो टाळू
शकला तो कल्याण मार्गाला लागून उत्तम गती प्राप्त करतो. जो शास्त्र मार्ग किंवा
योग्य मार्ग सोडून स्वैर वर्तन करतो त्याला कधीही सिद्धी प्राप्त होत नाही. त्याला
कधीही सुख किंवा सद्गति प्राप्त होत नाही.
म्हणूनि आदरी शास्त्र कार्याकार्य कळावया।
शास्त्राचे वाक्य जाणूनि इथे तू कर्म आचरी॥२४॥
म्हणूनच हे अर्जुना तू कार्य आणि
अकार्य काय असते त्याचे शास्त्र नीट जाणून घेतले पाहिजे. आणि शास्त्राचे वाक्य किंवा मार्गदर्शन मानून तू हे कर्माचरण करावेस असे मला वाटते.
Ultimate... श्रीकृष्णांनी
अर्जुनाला त्याने युद्ध का करावे हे पटवण्यासाठी किती वेगवेगळ्या प्रकारे
धर्म, शास्त्र, नीति,
गुण, विश्वाची निर्मिती, नाश, त्रिगुण, स्वतः चे विश्वरूप दर्शन अशा नानाविध
पैलूंवर प्रकाश पाडून त्यातले गूढ ज्ञान उकलून दाखवले.
धन्य तो अर्जुन आणि धन्य त्याचा सखा श्रीकृष्ण!
क्रमशः
अलका देशपांडे
No comments:
Post a Comment