अद्विका धावत आली "बाबा
लवकर या बाल्कनी मध्ये. खूप लांब शेपटी असलेला बर्ड आला आहे." मनात वाटलंच की मुनिया
असावी. मी पण लगबगीने तिच्या मागे गेलो.
"कुठे
आहे गं?"
तिने आमच्या फ्लॅटच्या
लगतच असलेल्या नारळाच्या झाडाच्या शेंड्याकडे बोट दाखवत म्हटलं. "त्या
तिथे होता तो. आता उडाला असेल."
थोड्याच वेळात... भुर्रर....एक छोटासा
तपकिरी रंगाचा पक्षी त्या नारळाच्या झाडावर येऊन बसला. त्याच्या चोचीत गवताचं एक
हिरवंगार लांब पातं होतं. अद्विका त्यालाच त्याची शेपटी समजून बसली. मुनियाच होती ती.
ही
ठिपक्यांची मुनिया. इंग्रजी मध्ये तिला scaly breasted munia म्हणतात. शेपटीसकट अवघी १०-१२ सेमी ची
लांबी. डोक्यावर आणि पाठीवर चमकदार तपकिरी रंग. छाती आणि पोटाच्या बाजूला त्याच
तपकिरी रंगाचे खवले. शरीराच्या मानाने जाडसर चोच. हलकी मंजुळ अशी चिवचिव. तीही गरज
असली तरच. अन्यथा शांत.
मला
एकदम तिची आणि माझी पहिली भेट आठवली. काहीशा किरकोळ कामानिमित्त ती आमच्याकडे आली
होती. एकटीच होती. इतरांपेक्षा ही खूप वेगळी होती. आम्ही काही बोललो नाही पण
नजेरतून आम्ही एकमेकांशी संवाद साधला. साधारण उंची. तिची ती पांढऱ्या पोलका डॉट्स वाली तपकिरी साडी.
त्यात तिचा गव्हाळ वर्ण उठून येत होता. मी तिला थोडं पाणी प्यायला दिलं. मग ती
निघाली. जातांना हळूच तिने बाय म्हटले आणि मी स्तब्धच झालो. तो आवाज ऐकून मला
"विवाह" चित्रपटातील अमृता राव आठवली. शांत स्वभाव आणि किती मंजुळ आवाज
तो. वास्तविक
पाहता त्या गवताच्या लांब पात्यामुळे तिचं रूप एखाद्या स्वर्गपक्षी (bird of paradise) सारखे
दिसत होते.
मध्ये एक आठवडा झाला… ती दिसलीच नाही. ती आली की मीसुद्धा खिडकीतून आडोशाने तिला बराच वेळ एकटक बघत राहायचो. मलाच हुरहूर लागली होती की तिची एक तरी झलक दिसावी. मी परत परत खिडकीतून इकडे तिकडे निरखून बघितलं पण कुठेच नाही. ऑफिसच्या कामात माझं मन लागत नव्हतं. पाणी पिण्याच्या निमित्ताने मी थोडया थोडया वेळानी उठायचो आणि खिडकीतून हळूच न्याहाळायचो.
ती पुन्हा आली वाटते? मी प्रफुल्लित झालो आणि शीळ वाजवायला लागलो. अद्विका इतकाच मलाही आनंद झाला. जुलै ते ऑगस्ट दरम्यान ती मुनिया आणि तिचा साथीदार घर बनविण्यासाठी दारोदार फिरतात. एखादी सुरक्षित जागा निवडतात आणि आपल्या येणाऱ्या पिल्लांसाठी बिऱ्हाड थाटतात. मग सुरु होते ‘ती’ जमवाजमव. कुठून एखादी वाळलेली काडीच आण, नाहीतर अशी गवताची पाती. हे सगळं अगदी सुंदर रीतीने रचून ते एक टुमदार घर बनवतात.
ती थोडा वेळ झाडावर बसून इकडे तिकडे कानोसा घेऊन उडाली. आणि आमच्या बाल्कनीच्या बाजूने गायब झाली. कुठे गेली असावी?
अद्विका म्हणाली “चला आपण कॅमेरानी फोटो काढूया ना.” “टेरेसवर जाऊया…” असे मी म्हणताच ती ही उत्साहाने तिचा कॅमेरा घ्यायला धावली.
माझ्यासमोरून ती मुनिया
आमच्या इमारतीच्या मागच्या बाजूला गेली. तिकडे जाऊन बघितलं तर गवसेना कुठे गेली
ते. मग मी परत नारळाच्या झाडाकडे आलो. थोडी वाट बघितली. ती परत चोचीत गवत घेऊन
तिथेच बसली. मी थोडे फोटो काढले. मग माझी शोधाशोध सुरू झाली
की ती घरटं बांधते तरी कुठे?
टेरेसच्या पॅरापेट
वॉलच्या कडेकडेने बघत बघत मी आमच्या स्वयंपाकघर आणि बाल्कनी याच्या मधल्या भागात
पाइप जवळ बघितलं. तिथे भिंतीलगत एक कोपऱ्यात यांनी घरटं बनवलं होतं…म्हणजे हे
जोडपं आता आपल्याला बाल्कनीत रोज हजेरी लावणार. अद्विका खूष
झाली एकदम. तिने लगेच त्यांच्यासाठी एका मातीच्या वाडग्यात पाणी भरून ठेवले.
किती काळजी असते मुलांना सुद्धा!
यावर्षी हाच या मुनिया कुटुंबीयांचा पत्ता. आता वाट बघतो आहोत ती त्यांच्या पिल्लांची....
सचिन पांढरे
No comments:
Post a Comment