घसरगुंडी

 


बागेतल्या घसरगुंडीवर आई तिच्या छोटीला सांगत होती...ये घसरत.. ये हळूहळू..तू पडणार नाहीस..मी आहे ना खाली...आणि तोल सांभाळायला दोन बाजुस कठडे आहेत...त्याला धरुन ये खाली घसरत...छोटी मात्र घाबरलेलीच..संदिग्ध...घसरु की नको..खालीपर्यंत पोहचेन ना मी न पडता..ती वरुन अंदाज घेत उभीच. जेमतेम ३,४ वर्ष वयाच्या बालमनातही..स्वतःचा तोल न जा देण्याची....आपल्या सुरक्षतेची भावना किती प्रबळ असते.

 

राहु दे...आज वर चढुन गेलीस ना, बास झालं मग...उद्या परत ये या हं...चला आता घरी. घसरगुंडीच्या लोखंडी पायऱ्या उतरत छोटी पटकन खाली उतरुन आली. स्वतःला पटकन झोकुन देण्याऐवजी असं खाली उतरणं तिला जास्त खात्रीशीर वाटलं असावं. दुसऱ्या दिवशी मात्र तिची भीती जरा चेपली..अडखळत अडखळत ती एकदोनदा घसरुन आली. जशी घसरण्यातली मजा तिने अनुभवली, तिने वारंवार तो अनुभव घेतला. तोल सावरायला बाजूला आणि पायाखाली काही आहे म्हटल्यावर ती निर्धास्त पणे घसरत राहीली. आईही आनंदली, घसरण्याची छोटीची भीती कमी झाली म्हणुन...

 

लहानपणीची ही घसरण्याची उर्मी घेनच माणुस मोठा होत जातो. घसरायची उर्मी कधीतरी डोकं वर काढतेच. परिस्थितीनुरुप, जरा निसरडा उतार मिळाला की, आपणही आपल्या नकळत कधीतरी घसतोच. कोण बोलताना घसरतं, कोण वागण्यात, कोण नजरेत घसरतं, कोण चालता चालता घसरतं...कारण शेवटी घसरणे म्हणजे मनात दबलेली..बोथटलेली असुरक्षिततेची भावना/भीती. तिला सतत सोबत बाळगून मन कधीतरी थकून जातं... कधीतरी झुगारुन द्यावीशीच वाटते ही भीती.

 

पण घसरगुंडी मिळायला मात्र नशीबच लागतं, नाहीतर अपघात अटळ! आपला गेलेला तोल सांभाळायला बाजुस दोन भरभक्कम बाहु न् खाली जमिन आहे, याचं ज्यांना भान असतं तेंव्हा या घसरगुंडीचा अनुभव निखळ ठरतो. घसरणारा आणि सावरणारा....सहभावनेत असतात, तेंव्हा घसरणं ही उर्मी असते न् सावरणं ही शाश्वती असते. अशी घसरगुंडी प्रत्येकाला हवी असते. कुणी जमीन व्हावं..कुणी घसरगुंडी हे ज्याच्या त्याच्या स्वभावावर अवलंबून....

 

सौ विदुला जोगळेकर



No comments:

Post a Comment