“नको नको हो , माझा काय अपराध झालाय?
चुकुन काही झाले असेल तर माफ कराना!” असे
ओरडतच सुरेश जागा झाला. तो घामाने नुसता थबथबला होता. जवळच ठेवलेले पाणी घटाघटा
प्यायला. भानावर आल्यावर हे स्वप्नच असल्याचे जाणवून सुटकेचा नि:श्वास टाकला.
ह्या महिन्यात दहाव्यांदा पडलेले तेच स्वप्न! एक अतिशय क्रुद्ध झालेली मध्यमवयीन बाई त्याला फराफरा ओढत एका घाटातल्या दरीत ढकलून देतेय, आणि तो जीवाच्या आकांताने तिच्यासमोर गयावया करतोय असे ते स्वप्न!
वारंवार त्याला हे स्वप्न पडायचे. जागेपणीसुद्धा तो ह्याचाच विचार करायचा. त्या बाईच्या भितीदायक चेहऱ्याने त्याची तहान-भूक-झोप हरवून टाकली होती. कोण असावी ती आणि का माझ्या जीवाच्या मागे लागली आहे त्याला समजतच नव्हते. सततच्या ह्या भीतीच्या दडपणामुळे तो नैराश्यग्रस्त होऊ लागला होता.
सुरेश एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पोस्टवर होता. कंपनीने त्याला फ्लॅट, गाडी दिली होती. आयुष्यात छान सेटल् झाला होता. त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या हुषार आणि स्मार्ट नीताच्या प्रेमात पडला होता. सहा महिन्यांनंतर तिने त्याचे लग्नाचे प्रपोझल ही स्विकारले होते. अशा वेळीच, अतिशय आनंदात असतानाच अचानक हा स्वप्नांचा सिलसिला सुरू झाला होता.
शेवटी त्याने मानसोपचार तज्ञाचा सल्ला घ्यायचे ठरवले. त्यांची सेशन्स सुरू झाली. ह्या स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी, डॅाक्टर प्रयत्न करत होते. गतजीवनाशी काही संबंध आहे का हे पडताळण्यासाठी त्यांनी हिप्नॅाटीझमची सेशन्स सुरू केली. औषधेही चालू केली. अश्याच एका सेशनच्या वेळी त्यांनी स्वप्नात येणाऱ्या बाईचे वर्णन करायला सांगून एका तज्ञ स्केच काढणाऱ्याकडुन तिचे स्केच काढून घेतले.
एका सेशनमधे त्यांना सुरेशकडून जी धक्कादायक माहिती मिळाली त्यासंबंधी चौकशी करायला त्यांनी आपल्या एका असिस्टंटला कामाला लावले. त्यांनी सात-आठ वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेबद्दल त्याला विचारले. विस्मृतीत गेलेल्या ह्या घटनेचा आपल्या स्वप्नाशी काय संबंध असावा त्यालाही समजेना. पण ती घटना साऱ्या तपशीलासकट त्याला आठवली.
कॉलेजमध्ये त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी सिनियर असलेला अविनाश आणि त्याच्या ग्रूपशी सुरेशचे आणि त्याच्या ग्रूपची टसल होती. कॅालेजची निवडणूक, गॅदरींग सगळ्यातच अविनाशचा ग्रुप भारी होता. सुरेशचा सगळा ग्रुपच उडाणटप्पू मुलांचा होता. बडे बाप के बेटे असलेली, दारू सकट सगळी व्यसने करणारी ही मुले वाया गेलेली होती.
कॅालेजमधली प्रतिष्ठित समजली जाणारी “घाटाचा राजा” ही सायकलस्पर्धा जिंकण्यासाठी सुरेश आणि अविनाश सिद्ध होते. अविनाश दोन वर्ष सलग विजेता होता आणि ह्यावर्षी हॅटट्रीक करण्यास उत्सुक होता. काहीही करून त्याला जिंकू द्यायचे नाही, असे ठरवून सुरेश आणि त्याच्या गॅंगने कुणाच्या नकळत अविनाशच्या सायकलीच्या चेनची एक कडी थोडी सैल करून ठेवली होती.
स्पर्धा सुरु झाल्यावर सुरेशच्या पुढे फर्लांगभर अंतरावर अविनाश खुपच जास्त स्पीडने सायकल चालवत होता. घाटातला सर्वात उंच पॅाइंट आला होता. अचानक त्याच्या सायकलची चेन तुटली, एकदम ब्रेक लावावा लागल्यामुळे सायकल फरफटत दरीच्या दिशेने जाऊ लागली. सुरेशने आपली सायकल सोडली आणि तो अविनाशला वाचवायला पुढे जाऊ लागला, पण त्याआधीच अविनाश सायकलसकट दरीत कोसळला होता.
ह्या अपघाताने सुरेश हादरून गेला. असे काही होईल ह्याची त्याने कल्पनाच केली नव्हती. पश्चातापाने सुरेश अतिशय रडला होता. मग मात्र त्याच्यामधे आमुलाग्र बदल झाला होता. त्या उडाणटप्पू मुलांच्या ग्रूपमधुन बाहेर पडून आपला अभ्यास आणि करीअरवर आता त्याने लक्ष केंद्रीत केले होते. ही घटना विसरून जायचा त्याने खुप प्रयत्न केला होता. पोलिस फाईल्समध्ये हा अपघात म्हणून नोंदवला गेला होता, पण त्यामागचे खरे कारण तो जाणून होता.
त्याला माहिती नसलेल्या काही गोष्टी डॅाक्टरांच्या त्या असिस्टंटने शोधून काढल्या होत्या. अविनाशची बातमी कळताच त्याच्या वडिलांना आलेल्या हार्टॲटॅकमधे त्यांचा मृत्यू झाला होता. आणि ह्या सगळ्यांचा परिणाम त्याच्या आईवर झाला आणि ती भ्रमिष्ट झाली. आणि मागच्या वर्षीच तिचाही नदीत पडुन मृत्यू झाला होता. डॅाक्टरांच्या स्केच आर्टिस्टने काढलेले त्याच्या स्वप्नातील बाईचे चित्र अविनाशच्या आईच्या फोटोशी जुळत होते. पण त्यांनी हे सगळे सुरेशला सांगितले नाही.
आता बऱ्याच दिवसांत सुरेशला ते स्वप्न परत पडले नाही. तेंव्हा आता गावाला
जाऊन आईबाबांना भेटून नीताबद्दल सांगायचे असे त्याने ठरवले. आता त्याचे टेन्शनही
बरेच कमी झाले होते. खुषीत
असल्याने शीळ घालत सुरेश गाडी चालवत होता. नुकताच सूर्यास्त झाला होता. आकाश
वेगवेगळ्या रंगात न्हाऊन निघाले होते. तो आज आनंदी असल्याने अवतीभवतीचे जगही
त्याला फार सुंदर दिसत होते.
बस्स!!! एवढा घाट संपला की त्याचे छोटेसे टुमदार घर येणार होते. आई बाबांना कधी ही बातमी देतो असे झाले होते त्याला! अंधार पडायला सुरवात झाली होती. घाटाची अवघड वळणे तो सराईतपणे कापत होता. पण हे काय पुन्हा तोच रस्ता? चकवा लागल्यासारखे झाले होते त्याला. डोळ्यांवर झापड येतेय असे वाटू लागले. आज काय होतेय हे त्याला समजतच नव्हते. घाट संपतच नव्हता. पुन्हा पुन्हा घाटाच्या त्याच रस्त्यावर येतोय असे वाटत होते.
अचानकच त्याला अविनाशचा ॲक्सीडेंट डोळ्यासमोर आला. भोवळ येतेय असे वाटायला लागले. कारचा स्पीड कमी करायचा प्रयत्न करू लागला, तर ते ही जमेना. आता काहीतरी वेगळेच घडतेय असे त्याच्या लक्षात आले. भीतीने हात कापायला लागले. हवेत गारवा होता तरी तो घामाने चिंब भिजला होता. आता घाटाचा सर्वात उंच पॅाइंट आला.
अचानक ती स्वप्नातली बाई त्याला कारच्या समोरच्या आरशात दिसली. अतिशय क्रूद्ध , संतापलेली! घाबरून खाडकन ब्रेक दाबला त्याने! वेगातल्या गाडीला अचानक लावलेल्या ब्रेकमुळे गाडी स्कीड झाली, आणि दरीत कोसळली! पूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती झाली होती, फक्त दरीत कोसळणारा ह्या वेळी सुरेश होता! आणि ती बाई भेसूर हसू लागली, आणि हसताहसता रडू लागली!
रेवती कुलकर्णी
No comments:
Post a Comment