जिप्सी

 



माझ्यातच लपला आहे एक जिप्सी

ठाऊक नव्हते मला

रक्त धावायचे,चैतन्य सळसळायचे

बाहू स्फुरण पावायचे

मनाचे घोडे लगाम तोडून

चौखूर उधळू पहायचे...

 

ती आदिम हाक यायची तेव्हां

जगण्याच्या शृंखलांनी मी होते बद्ध

नात्यांची एक एक बेडी हातापायात

अडकवून घेतली होती

इथली ओझी उचलायला

'' नाही देता यायची त्या हाकेला

 

आत्म्याची तळमळ तळमळ व्हायची

मनाच्या अश्वाला मुक्त करून

मी चौफेर उधळवायची

हिमालयात जायची कैलास चढायची

नद्या नाले डोंगर दर्या

मनसोक्त भटकायची

देशोदेशीचे रस्ते पायदळी तुडवायची

 

एक दिवस अचानक

बेड्या तुटल्या,शृंखला सुटल्या

गाठोडं पाठीवर टाकून

जिप्सी भटकंतीला निघाला

माणसं जोडत प्रेम वाटत

आत्म्याची पोतडी

विशाल अवकाशाने भरत

 

जिप्सी निघाला मनामनांना

संपन्न अन् श्रीमंत करत

तृप्त.....अन् ......मुक्त......!!!



'आकाशापल्याडचं आकाशया माझ्या काव्यसंग्रहातून

स्मिता शेखर कोरडे







No comments:

Post a Comment