गीताई :सांख्य योग- भाग 2


मागच्या भागात सांख्ययोगात आपण अर्जुनाची शोकाकुल अवस्था, श्रीकृष्णाने त्याची केलेली निर्भर्त्सना आणि मग त्याला दिलेलं आत्म्याच्या अविनाशी स्वरूपाच ज्ञान इथवर पाहिलं. या पुढे खरं तर अर्जुन पुढे लगेच प्रश्न विचारत नाही, पण बहुदा त्याच्या चेहऱ्यावर श्रीकृष्णाला, तो न विचारत असलेला प्रश्न दिसला असावा. त्यामुळे पुढच्या काही श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाच्या या न विचारलेल्या प्रश्नाचं  उत्तर देताना दिसतात.

तो न विचारलेला प्रश्न असा असावा, "आत्मा, अमर वगैरे सारं ठीक आहे रे, पण कर्माच्या बंधनाचं  काय? जित्या जिवाला तर कर्म करणं  अटळ आहे ना? 
भगवान म्हणतात -
सांख्य बुद्धी अशी जाण ऐक ती योग बुद्धी  तू
तोडशील जिने सारी कर्माची बंधने जगी



इथे श्रीकृष्ण वेदांमध्ये  सांगितलेल्या कर्मफळाच्या दिशाभूल करणाऱ्या विचारांचा चांगलाच समाचार घेताना दिसतात.
अविवेकी वृथा वाणी बोलती फ़ुलवूनिया
वेदांचे घालती वाद म्हणती दुसरे नसे
जन्मनिया करा कर्मे मिळवा भोग वैभव
भोगा कर्मफळे गोड सांगती स्वर्ग कामुक
त्यामुळे भुलली बुद्धी गुंतली भोग वैभवी
ती निश्चय न लाभूनी समाधीत नव्हे स्थिर

यानंतर श्रीकृष्ण वेदांवरती एक मस्त टोला
हाणतात


सर्वत्र भरले पाणी तेव्हा आडात अर्थ की
विज्ञानी ब्रम्हवेत्त्यास सर्व वेदात अर्थ तो

सगळीकडे जेव्हा मुबलक पाणी भरलेले असते तेव्हा आडातल्या पाण्याला काय किंमत असते? काहीच नाही... तेवढीच ब्रम्हवेत्त्या व्यक्तीच्या लेखी वेदांना असते. इथे श्रीकृष्णांना पूर्ण वेदांवर टीका करायची नसून, सकाम कर्म किंवा फळाच्या इच्छेने केलेल्या कर्मावर टीका करायची आहे.



पुन्हा एक फार मोठा जगप्रसिद्ध श्लोक श्रीकृष्ण सांगतात, जो आजही आपल्या जगण्याला उत्तम रित्या लागू पडतो. 

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥

कर्मातची तुझा भाग तो फळात नसतो कधी
नको कर्म फळ हेतू अकर्मी वासना नको
तू तुझं कर्म कर, फळाची अपेक्षा ठेवू नको; पण तसंच कर्म न करण्याचा वेडा आळशीपणा मात्र करू नको.

फळ लाभो न लाभो तू निःसंग सम होऊनि
योगयुक्त करी कर्मे योग सारं समत्वची

जगण्यात समत्व बुद्धी किती महत्त्वाची असते हे श्रीकृष्ण पटवून देतात. हे आजही किती लागू आहे.
समत्व बुद्धी ही थोर कर्म तीहून हीनची
बुद्धीचा आसरा घे तू, मागती फळ दीन ते

First think then act, don't bother about result while u act.

ज्ञानी समत्व बुद्धीने कर्माचे फळ सोडूनी
जन्माचे तोडिती बंध पावती पद अच्युत

श्रीकृष्ण अर्जुनाला निर्वाणीचं  सांगतात -

श्रवणें भ्रमली बुद्धी तुझी लाभून निश्चय
स्थिरावेल समाधीत तेव्हा भेटेल योग तो
अर्जुनाने गीतेत फार छान प्रश्न विचारले आहेत. ज्ञान मिळवण्यासाठी योग्य प्रश्न विचारणे किती महत्त्वाचे असते पहा. अर्जुन विचारतो,

स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे?
कृष्णा सांग कसा बोले कसा राहे फिरे कसा?
आज आपण सारेच शांती उर्फ peace of mind च्या शोधात आहोत. श्रीकृष्णाने इतक्या सुंदरपणे स्थितप्रज्ञ व्यक्तीच्या लक्षणांचे वर्णन पुढील श्लोकात केले आहे. माझ्या मते एक balanced मन:स्थिती किंवा जीवन जगण्यासाठी आवश्यक अशा विचारांचा हा पाया आहे.
श्रीकृष्ण म्हणतात,
कामना अंतरातील सर्व सोडून जो स्वये
आत्म्यातची असे तुष्ट तो स्थितप्रज्ञ बोलिला
नसे दुःखात उद्विग्न, सुखाची लालसा नसे
नसे तृष्णा भय क्रोध तो स्थितप्रज्ञ संयमी

पुढचे श्लोक फारच सुंदर आहेत -

सर्वत्र जे अनासक्त बरे वाईट लाभता
न उल्हासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली
घेई ओढुनी संपूर्ण विषयातुनी तो इंद्रिये
जसा कासव तो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली
कोणाची प्रज्ञा स्थिरावलेली आहे? जो राग-लोभ यांच्या पलीकडे गेला आहे, जो सगळे चढ-उतार समबुद्धीने पाहू शकतो, जो यशाने हुरळून जात नाही आणि अपयशाने खचतही नाही त्याची प्रज्ञा स्थिरावलेली आहे. आहे की नाही सुंदर आणि उपयोगी जीवन मूल्य?

माणसाची शांती का नष्ट होते? तो सुखी का नसतो याचं विवेचन पुढच्या श्लोकात आहे. चिंतन करण्यासारखा विषय आहे.
विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला
सांगातुनी फुटे काम क्रोध कामात ठेविला
क्रोधातूनी जडे मोह, मोहाने स्मृती लोपली
स्मृतीलोपे बुद्धिनाश, म्हणजे आत्मनाशची
असा cascading effect आहे. सुखलोलुपता, हाव, संग्रही वृत्ती, राग, संताप या गोष्टी आपल्या बुद्धीला झाकोळून टाकतात. पुढे भगवान म्हणतात,

राग द्वेष परी जाता आली हातात इंद्रिये
स्वामित्वे विषयी वर्ते त्यास लाभे प्रसन्नता
प्रसन्नतेपुढे सर्व दुःख जाती झडूनिया
प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे
जेव्हा आपण राग-द्वेष यावर विजय मिळवतो तेव्हा आपोआपच मन प्रसन्न राहते. अशा प्रसन्न माणसाला दुःख जाणवत नाही. उलट बुद्धी, विचारशक्ती स्थिर होते.

अयुक्तास नसे बुद्धी त्यामुळे भावना नसे
म्हणून न मिळे शांती, शांतीचे नसे सुख


राग-द्वेषाने भरलेल्या अयुक्त माणसाची बुद्धी स्थिर नसते, त्यामुळे त्यांच्या हृदयात आस्तिक शांत भावाचा अभाव असतो. त्यामुळे शांती नसते. शांती नसली की सुख नसते.
शांत, सुखी योगी माणूस कसा असतो तर-

न भंग पावे भरता ही नित्य
समुद्र घेता जिरून पाणी
जाती तसे ज्यात जिरुनी भोग
तो पावला शांती न भोग लुब्ध
अनेक नद्या समुद्रात मिसळतात पण समुद्र विचालित होत नाही, तसाच ज्ञानी व्यक्ती भोगांना सामोरा जातो पण त्यात विकार उत्पन्न होत नाहीत. असा माणूस शांती प्राप्त करतो. 

सांडूनि कामना सर्व, फिरे होऊनी निस्पृह
अहंता, ममता गेली, झाला तो शांती रूपची
ज्याचा अहंकार गळाला, जो आसक्तीतून मुक्त झाला तो खऱ्या अर्थाने आतून शांत होतो.
असं हे जीवात्म्याचं शांतिरूप आहे. 

सांख्ययोग हा एका short summary सारखा आहे. गीतेत पुढे येणाऱ्या अनेक अध्यायांचं सार या अध्यायात वाचायला मिळतं.
या ज्ञानसागरातील थोडेसे थेंब जरी आपल्या जीवनात मिसळते तरी जीवन शांतिमय होईल.

क्रमश :
अलका देशपांडे


No comments:

Post a Comment