गीतेची
आणि माझी ओळख झाली ती 'भक्ति' योगातून. मी दुसरीत असताना गीताई
प्रतिष्ठान तर्फे गीताई चा बारावा अध्याय शाळेत मुलांकडून पाठ करून घेण्याचा
उपक्रम राबवला गेला होता. माझी जिल्हा परिषदेची मोडकळीस आलेली शाळा..आम्ही खाली जमिनीवरच बसायचो.. सर्व मुलं
सामूहिकपणे "असे मिसळले कोणी, तुज भक्त उपासिती" असे म्हणून सकाळच्या प्रार्थनेनंतर पूर्ण
अध्याय म्हणायचो.
अगदी रोज. म्हणूनच हा अध्याय मला पाठ
आहे... गीता आणि गीताईवरचे प्रेमही तेव्हाच मनात रुजले... अतिशय सुंदर असा हा योग आहे.
सर्व योगात मधुर असा.
अकराव्या
अध्यायात आपण श्रीकृष्णाचे विराट विश्वरूप दर्शन घेतले. कृतार्थ वाटायला लावणारा तो अनुभव
होता. अर्जुनाला आपले विराट आणि भयंकर रूप दाखवून श्रीकृष्णांनी इतकीच जाणीव करून दिली की ज्यांना
मारायला तू घाबरतो आहेस,
त्या सगळ्यांचा शेवटी माझ्यात अंत होणार आहे. तेव्हा निःशंक होऊन युद्ध कर. शेवटच्या श्लोकात भगवान अर्जुनाला
आश्वस्त करतात –
माझ्या
कर्मांत जो मग्न भक्तीने भरला असे
जगी
निःसंग निर्वैर मिळे तो मज मत्पर
मागील
अध्यायात "भक्ती" सूचित करून श्रीकृष्ण आपले विवेचन थांबवतात आणि मग भक्तियोग
सुरु होतो. या योगात एकूण २० श्लोक आहेत. अध्यायाची सुरुवात
अर्जुनाच्या प्रश्नाने होते.
असे
मिसळले कोणी तुज भक्त उपासिती
कोणी
अक्षर अव्यक्त योगी ते थोर कोणते
रोवूनि
मन माझ्यात भजती नित्य जोडिले
श्रद्धेने
भारले माझ्या ते योगी थोर मानितो
परी
अचिंत्य अव्यक्त सर्व-व्यापी खुणेविण।
नित्य
निश्चळ निर्लिप्त जे अक्षर उपासती।।
रोधिती
इंद्रिये पूर्ण सर्वत्र सम जाणुनी।
माझ्या
कडे चि ते येती ज्ञानी विश्व-हिती रत।।
अव्यक्ती
गोविती चित्त क्लेश त्यांस विशेष चि।
देहवंतास
अव्यक्ती सुखे बोध घडे चि ना।।
पुढे.. ज़े माझ्या सर्वत्र व्यापलेल्या पण कुठेही न दिसणाऱ्या नित्य, निश्चल, अक्षर, अमूर्त अव्यक्त रूपाला शोधायचा प्रयत्न करतात, ज़े इंद्रियांचे नियमन करून सर्व गोष्टी समभावाने पाहू शकतात, ते ज्ञानवंत लोक शेवटी माझ्याकडेच येतात. पण.... अशाप्रकारे मला प्राप्त करणे तितकेसे सोपे नाहीये. अव्यक्तात, अमूर्तात चित्त केंद्रित करणे फार कठीण, त्रासदायक आहे. कारण देहवंत माणसाला भौतिक जगातील घन, समोर दिसणाऱ्या, पंचेंद्रियांनी अनुभवता येणाऱ्या गोष्टी अधिक खऱ्या वाटतात. देहवंताला अव्यक्तात परमेश्वरी शक्त्तीचा साक्षात्कार घडणे थोडे कठीण आहे.
परी
जे सगळी कर्मे मज अर्पूनि मत्पर।
अनन्य
भक्ति-योगाने भजती चिंतुनी मज।।
माझ्यात
रोविती चित्त त्यास शीघ्र चि मी स्वयें।
संसार-सागरांतूनि
काढितो मृत्यु मारुनी।।
परंतु ज़े त्यांची सगळी कर्म मला अर्पण करतात, माझ्यात त्यांच चित्त रोवून, ज़े अनन्य भक्तियोगाने माझे चिंतन करतात, त्यांचा या मृत्यू रुपी संसारसागरातून बाहेर काढून उद्धार करतो. पुढे ज़े श्री कृष्णांनी सांगितलंय ते मला फार आवडतं. लहानपणापासून. माझ्या जगण्याचा तो पाया आहे.
मन
माझ्यात तू ठेव बुद्धि माझ्यात राख तू।
म्हणजे
मग निःशंक मी चि होशील तू स्वये॥
जाईल
जड माझ्यात चित्तास करणे स्थिर।
तरी
अभ्यास-योगाने इच्छूनि मज मेळवी।।
अभ्यास
हि नव्हे साध्य तरी मत्कर्म आचरी।
मिळेल
तुज ती सिद्धि मत्कर्म हि करूनिया।।
न
घडे हे असे कर्म योग माझ्यात साधुनी।
तरी
सर्व चि कर्माचे प्रयत्ने फळ सोड तू।।
प्रयत्ने
लाभते ज्ञान पुढे तन्मयता घडे।
मग
पूर्ण फल-त्याग शीघ्र जो शांति देतसे।।
भक्तियोग हा कमळाच्या पाकळ्या उलगडत जाव्यात तसा हळू हळू उलगडत जातो. श्रीकृष्ण अर्जुनाला त्यांच्यापर्यंत पोहचण्याचे अनेक विकल्प देतात, पण पुन्हा पुन्हा भक्तिमार्ग हाच सगळ्यात सोपा मार्ग हे सुचवत राहतात. वरच्या श्लोकात श्रीकृष्ण सांगतात, जर मला कर्म अर्पण करण्याचा योग साधत नसेल तर प्रयत्न पूर्वक कर्म फळाचा त्याग करायला शीक. प्रयत्न पूर्वक ज्ञान मिळवणं श्रेष्ठ आहे, पण ध्यान लावणे, तन्मयता प्राप्त करणे ही त्याही पुढची पायरी आहे आणि त्या ही पेक्षा श्रेष्ठ, पुढची पायरी आहे, फळाचा त्याग करण्याची. आपल्यासारख्या सामान्यांसाठी म्हणूया, फळाची अपेक्षा न ठेवण्याची ही जी अवस्था आहे ही त्वरित शांती देणारी आहे. आणि हे खरंच आहे. आपण कर्म करत असताना आणि नंतरही आपल्या मनाला सतत कामाच्या संभाव्य परिणामांचा, कर्मफलांचा विचार जास्त अस्वस्थ करत असतो... या अस्वथतेतून मुक्ती मिळवण्याचा उपाय म्हणजे -
Follow the excellence...Don’t bother about
results. Result will automatically
follow.
पुढच्या
काही श्लोकात श्रीकृष्णांनी त्यांना कशा प्रकारचा भक्त आवडतो त्याचे अगदी सुंदर वर्णन केले आहे.
कोणाचा
न करी द्वेष दया मैत्री वसे मनी।
मी
माझे न म्हणे सोशी सुख-दुःखे क्षमा-बळे।।
सदा
संतुष्ट जो योगी संयमी दृढ-निश्चयी।
अर्पी
मज मनो-बुद्धि भक्त तो आवडे मज।।
श्रीकृष्ण भक्तियोगात रोजच्या जगण्यात आचरता येण्यासारख्या खूप छोट्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टी सांगतात. भारतीय संस्कृतीवर भक्तियोगाचा खूप मोठा संस्कार झाला आहे. कोणाचाही द्वेष न करणारा, मनात सतत दया मैत्री भाव बाळगणारा, मी, माझे असे न म्हणणारा, जो सुख भोगू शकतो आणि क्षमाबळाने दुःख ही सोसू शकतो, तो भगवंताला आवडतो. सुख सर्वांना उपभोगता येते पण दुःख त्यालाच सोसता येते ज्याच्या जवळ क्षमा करण्याची ताकद असते.
क्षमाशीलता हा स्वभाव नसतो तर ती आपल्या सत्वाची ताकद असते. हा "क्षमाबळ" हा शब्द मला फारच महत्वाचा वाटतो. क्षमा करण्याची क्षमता ही फार मोठी ताकद असते. जो सदैव संतुष्ट, समाधानी योगी वृत्तीचा, संयमी आणि नेहमी दृढ निश्चय असणारा, मन आणि बुद्धि मला अर्पण करणारा असा भक्त मला आवडतो
जो
न लोकांस कंटाळे ज्यास कंटाळती न ते।
हर्ष
शोक भय क्रोध नेणे तो आवडे मज।।
ज्याला लोकसंग्रह आवडतो आणि ज्याला लोक कंटाळत नाहीत आणि जों राग लोभाच्या पलीकडे पोहोचला आहे, तो कृष्णाला आवडतो. (जो आवडतो सर्वाना, तो ची आवडे देवाला).
नेणे
व्यथा उदासीन दक्ष निर्मळ निःस्पृह।
सोडी
आरंभ जो सारे भक्त तो आवडे मज।।
न
उल्लासे न संतापे न मागे न झुरे चि जो।
बरे
वाईट सोडूनि भजे तो आवडे मज।।
किती खरं आहे ना? साधे सोपे जगण्याचे तत्वज्ञान! एखादी चांगली गोष्ट झाली तर डोक्यात हवा नको जायला, आणि एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली म्हणून डोक्यात राख ही नको जायला. चिडचिड, राग, संताप कशाला हवा आयुष्यात? एखादी गोष्ट केल्यावर, बोलून झाल्यावर मग उगीचच मागे झुरणे तरी का? बरं-वाईट सोडून द्यायचं आणि मजेत जगायचं....
सम देखे सखे वैरी तसे मानापमान हि।
शीत
उष्ण सुखे दुःखे करूनि सम मोकळा।।
समभावाने
गोष्टींकडे बघता आले तर जगणे किती सोपे होईल, सखे, शत्रू... मान, अपमान, थंड, उष्ण या सर्वांनाच म्हणजेच
आयुष्यातल्या विरोधाभासाला समभावाने पाहणारा भक्त मला आवडतो. एक सम्यक
दृष्टी आणि परिपक्व विचार ठेवून जगायला सांगणार हे भाष्य आहे.
निंदा
स्तुती न घे मौनी, मिळे ते गोड मानितो।
स्थिर
बुद्धी निराधार, भक्त तो आवडे मज।।
निंदेने खचून आणि स्तुतीने हुरळून न जाणारी अशी सम्यक, स्थिर आणि स्वतंत्र बुद्धी हीच तर आजची गरज आहे. जे आहे त्याचा आनंद करायचा, गोड मानून जगायचं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?...It's more within isn't it? अशा प्रकारे ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असा भक्त मला आवडतो.
जे
धर्म-सार हे नित्य श्रद्धेने मी चि लक्षुनी।
सेविती
ते तसे भक्त फार आवडती मज।।
भक्तियोगाच्या शेवटच्या श्लोकात भगवान म्हणतात, हे ज़े मी तुला सांगितलं हे धर्माचे सार आहे. श्रद्धेने ज़े माझ्यात लक्ष केंद्रित करून माझ्यात लीन होतात, ते भक्त मला फार फार आवडतात. सगळ्यात शेवटी श्रद्धा महत्वाची, विश्वास महत्वाचा. भक्तीची सुरुवात या श्रद्धेतून विश्वासातून होते.
तर
असा हा मधुर भक्तियोग. कुणीही
आचारावा असा. अनेक विकल्पांनी युक्त... परमेश्वराचं लाडकं कसं
व्हावं हे सांगणारा.... संत ज्ञानेश्वर, तुकाराम
महाराज, एकनाथ महाराज, संत नामदेव, संत मीराबाई,
जनीं, चोखा मेळा, गोरा
कुंभार, संत रामदास स्वामी, गाडगे
महाराज... किती नावे घ्यावीत...हे सारे संत भक्तियोग
आचरून परमेश्वराचे आणि आपल्या सर्वांचे लाडके झाले. देव देव नको करत राहायला. केवळ
एक खूणगाठ मनाशी बांधली तरी खूप आहे.
"जेथे जातो तेथे, तू माझा
सांगाती... चालविसी हाती धरोनिया"
क्रमश:
अलका
देशपांडे
No comments:
Post a Comment