गीताई : अध्याय १४ - गुणत्रय विभाग योग

 


मागच्या अध्यायात आपण क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ कोण असतो, प्रकृती पुरुषाचे  काय नाते  आहे, ज्ञान आणि ज्ञेय काय असते, विकारांची उत्पत्ती आणि परमात्म्याचे अविनाशी रूप हे सगळे  जाणून घेतले...म्हणजे श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले आणि व्यास मुनी आणि विनोबांमुळे ते आपल्या पर्यंत पोहोचले. आता पुढच्या अध्यायात भगवान प्रकृतीच्या गुणांनी वेढलेल्या या मानवी जीवांत प्रामुख्याने भरलेल्या सत्व, रज, तम या तीन गुणांचा रोजच्या दैनंदिन जीवनातील उदाहरणे  देऊन उहापोह करतात. हा फार उपयोगी योग आहे आपल्या सारख्या सामान्य माणसांसाठी.

श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा मनोज्ञ असा हा संवाद पुढे चालत राहतो. श्रीकृष्ण म्हणतात

सर्व ज्ञानामधे थोर ज्ञान ते सांगतो पुन्हा।

जे जाणूनि इथे मोक्ष पावले सगळे मुनि॥ १ ॥

ह्या ज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्या चि सारखे।

जगे येवोत जावोत ते अभंग जसे तसे॥ २ ॥

 हे अर्जुना सर्व ज्ञानांमधील श्रेष्ठ असे  हे ज्ञान मी तुला पुन्हा एकदा सांगतो. हे ज्ञान जाणून अनेक ऋषी मुनी मोक्ष पावले आहेत. या ज्ञानाच्या सामर्थ्याने ते परमेश्वर रूप बनले. या जगात येऊन जाऊन, इथली कर्म पार पाडूनही ते अभंग राहिले. श्रीकृष्ण हे एका उत्तम शिक्षकासारखे किंवा trainer सारखे आहेत. पुढचा धडा शिकवताना मागच्या धड्यातल्या महत्वाच्या गोष्टी विसरू नये म्हणून ते नेहमी उजळणी घेतात. महत्वाच्या गोष्टी पुन्हा पुन्हा अधोरेखित करतात.

 

प्रकृतीपासुनी होती गुण सत्त्व-रजस्-तम।

ते निर्विकार आत्म्यास जणू देहांत जुंपिती॥ ५ ॥

 या प्रकृतीतून सत्व, रज, तम हे गुण निर्माण होतात. आत्मशक्ती ही मुळात निर्विकार अविनाशी असते पण प्रकृतीच्या या त्रिगुणांनी ती देहांत कामाला लावली जाते.

त्यांत निर्मळ ते सत्त्व ज्ञान आरोग्य वाढवी।

मी सुखी आणि मी ज्ञानी शृंखला ही चि लेववी॥ ६ ॥

रज ते वासना-रूप तृष्णा आसक्ति वाढवी।

आत्म्यास कर्म-संगाने टाकिते जखडूनि ते॥ ७ ॥

गुंगवी तम सर्वांस अज्ञान चि विरूढले।

झोप आळस दुर्लक्ष ह्यांनी घेरूनि बांधिते॥ ८ ॥

 आता बघा हं, श्रीकृष्णांनी सत्व, रज आणि तमो गुणांची किती उदाहरणे  दिली आहेत. सत्व गुण हा निर्मळ आणि आरोग्य वर्धक, प्रकाश उत्पन्न करणारा आणि विकाररहित आहे. तो सुखासंबंधीच्या आणि ज्ञानासंबंधीच्या अभिमानाने बांधतो.

वासनेतून रजो गुणांची उत्पत्ती होते, ज़े तृष्णा, लालसा, आसक्ती वाढवणारे असते. ज़े आत्मशक्तीला रजोगुणातून निर्माण होणाऱ्या कर्मात जखडून टाकते.

अज्ञानातून तमो गुणांची उत्पत्ती होते, झोप, आळस, दुर्लक्ष या गोष्टी तमोगुणातून निर्माण होऊन आत्म्याला घेरतात.

सुखात घालिते सत्त्व रज कर्मात घालिते।

ज्ञान झाकूनि संपूर्ण दुर्लक्षी घालिते तम॥ ९ ॥

 सत्व गुण सुखाची अनुभूति देतो तर रजो गुण कर्मात गुंतवून ठेवतो आणि तमोगुण ज्ञान झाकोळून टाकून प्रमाद, अपराध करायला भाग पाडते.

पुढचे श्लोक फार interesting आहेत.

अन्य दोघांस जिंकूनि तिसरे करिते बळ।

असे चढे कधी सत्त्व कधी रज कधी तम॥ १० ॥

प्रज्ञेचा इंद्रिय-द्वारा प्रकाश सगळीकडे।

देहांत पसरे तेंव्हा जाणावे रज वाढले॥ ११ ॥

प्रवृत्ति लालसा लोभ कर्मारंभ अशांतता।

ही देही उठती तेंव्हा जाणावे रज वाढले॥ १२ ॥

अंधार मोह दुर्लक्ष अपप्रवृत्ति चहूकडे।

देहांत माजली तेंव्हा जाणावे तम वाढले॥ १३ ॥

 भगवान म्हणतात, बऱ्याचदा यातील एक गुण इतर दोघांवर मात करून शिरजोर होतो. कधी सत्व, तर कधी रज, तर कधी तमो गुण प्रबळ होतो. आता हे ओळखायचे कसे की कधी कुठला गुण अधिक वाढला आहे? तर भगवान या प्रश्नाचे ही छान उदाहरण देऊन उत्तर देतात. जेव्हा प्रज्ञेचा म्हणजे ज्ञान, समजूतदारीचा प्रभाव आणि प्रकाश देहधारी जिवाच्या इंद्रियातून सर्वत्र पसरतो तेव्हा सत्व गुण प्रबळ आहे असे  समजावे.

लालसा, लोभ, अस्थिरता, चंचलता जेव्हा मानवी अस्तित्वातून व्यक्त होतात तेव्हा आणि लोक जेव्हा लाभाच्या लोभाने कामाची सुरवात करतात तेव्हा रजोगुण वाढला असे  समजावे.

अंधार, मोह, दुर्लक्ष आजच्या काळात सांगायचे  तर I don't care attitude, अप प्रवृत्ती देहांत  माजलेल्या दिसतात तेव्हा तमो गुण प्रबळ झालेला आहे असे  समजावे.

वाढले असता सत्त्व जाय जो देह सोडुनी।

जन्मतो शुभ लोकांत तो ज्ञात्यांच्या समागमी॥ १४ ॥

रजांत लीन झाला तो कर्मासक्तांत जन्मतो।

तमी बुडूनि गेला तो मूढ-योनीत जन्मतो॥ १५ ॥

फळ सात्त्विक कर्माचे पुण्य निर्मळ बोलिले।

रजाचे फळ ते दुःख तमाचे ज्ञान-शून्यता॥ १६ ॥


आता श्रीकृष्ण या तीन ही गुणांची फलप्राप्ती काय ते ही सांगतात. फलप्राप्ती म्हणण्यापेक्षा या गुणांच्या अंगिकारातून शेवटी काय गती प्राप्त होते ते सांगतात. सत्व गुणाचे प्राबल्य असताना जो देह सोडून जातो, तो शुभ कर्म करणाऱ्या स्वर्गादि लोकात जातो. जो रजो गुणात लीन झाला तो कर्माने आसक्त लोकांत जन्म घेतो. जो तमो गुणांनी, आळसाने, अंधाराने भरलेला आहे तो मूढ म्हणजे ज्यांना विवेक बुद्धि नाही अशा योनीत जन्माला येतो. सात्विक कर्माचे फळ हे पुण्यमय निर्मळ असे असते, तर रजो गुणाचे आसक्तीतून निर्माण होणाऱ्या कर्माचे फळ हे दुःख असते. तमोगुणाचे फळ ज्ञान शून्यता म्हणजे अज्ञान असते. किती स्पष्ट आणि स्वच्छ शब्दात सत्व, रज, तमो गुणातला फरक स्पष्ट केला आहे भगवंतांनी. पुढच्या ओळीत हा भेद अजून सुंदरपणे सांगितला आहे.

 

सत्त्वांतूनि निघे ज्ञान निघे लोभ रजांतुनी।

अज्ञान मोह दुर्लक्ष निघती ही तमांतुनी॥ १७ ॥

सत्त्व-स्थ चढती उंच मध्ये राजस राहती।

हीन-वृत्तीत वागूनि जाती तामस खालती॥ १८ ॥


सत्व गुणातून ज्ञानाची निर्मिती होते. रजो गुणातून लोभाची उत्पत्ती होते आणि तमो गुणातून अज्ञान, मोह, दुर्लक्ष, ignorance निर्माण होतो. श्रीकृष्ण एक छान उतरंड सांगतात. सत्व गुणांनी युक्त लोक सर्वात उंचीवर पोहोचतात, रजो गुणांनी युक्त लोक मध्येच संधारित राहतात आणि ज्यांचं वागणं, वृत्ती तामस असते  ते खालती तळाला राहतात. हे एकदम रोखठोक वर्णन मला खूप आवडले.

 

देखणा ओळखे हे जो होय माझे चि रूप तो ॥ १९

देह-कारण हे तीन गुण जाय तरूनि जो।

जन्म-मृत्यु-जरा-दुःखी सोडिला मोक्ष गांठतो॥ २० ॥

 तिन्ही गुणाशिवाय दुसरा कुठलाही कर्ता असू शकत नाही. कर्ता गुणांनी वेढलेला असतो आणि त्या पलीकडे आत्मशक्ती असते आणि ती आत्मशक्ती म्हणजे मीच म्हणजे परमेश्वर असतो हे जो जाणतो आणि ओळखून असतो तोच मला प्राप्त होतो. असाच व्यक्ती या त्रिगुणातूनच शरीराची उत्पत्ती होतं असते हे जाणून असतो, तो जन्म, मृत्यू, म्हातारपण, दुःख या सर्वाना पार करून मोक्ष प्राप्त करतो.

अर्जुनाचे कुतूहल आता अजून जागृत झाले  आहे.

त्रिगुणातीत जो देवा त्याचे लक्षण काय ते।

वागणूक कशी त्याची कसा तो गुण निस्तरे।।

 अर्जुनाने एकाच श्लोकात तीन प्रश्न विचारले. मला अर्जुनाची ही प्रश्न विचारायची style फार आवडते. कुठलीही शंका तो मागे ठेवत नाही....परमेश्वरा, या तीन ही गुणांच्या पलीकडे जो असतो, जो त्रिगुणातीत असतो त्याची लक्षणे कोणती? त्याचे  वर्तन कसे  असते? तो या सर्व गुणांना कसे निस्तरतो? यावर श्री भगवान या त्रिगुणातीत व्यक्तीची लक्षणे  सांगतात.

 

प्रकाश मोह उद्योग गुण-कार्ये निसर्गता।

पावतां न करी खेद न धरी आस लोपतां॥ २२ ॥

राहे जसा उदासीन गुणांनी जो न चाळवे।

त्यांचा चि खेळ जाणूनि न डोले लेश-मात्र हि॥ २३ ॥

आत्मत्वे सम जो पाहे सोने पाषाण मृत्तिका।

धैर्यवंत सुखे दुःखे स्तुति-निंदा प्रियाप्रिय॥ २४ ॥

मानापमान जो नेणे नेणे जो शत्रु-मित्र हि।

आरंभ सोडिले ज्याने तो गुणातीत बोलिला॥ २५ ॥

जो एक-निष्ठ भक्तीने अखंड मज सेवितो।

तो ह्या गुणांस लंघूनि शके ब्रह्मत्व आकळू॥ २६ ॥

 सत्व गुणातून निर्माण होणारा प्रकाश, आनंद, रजो गुणातून निर्माण होणारी कार्य, मोह हे फळ मिळाल्यावर त्याचे जो दुःख करत नाही किंवा ते मिळाले  नाही म्हणून आशा लावून बसून दुःखी होत नाही तो.....

जो निर्लेप राहू शकतो, जो या त्रिगुणांमुळे चाळवत नाही, अस्थिर होत नाही.. हा सगळा या त्रिगुणाचा खेळ आहे हे जाणून जो अलिप्त, अविचल आणि स्थिर असतो, जो जराही डळमळत नाही तो....

जो आत्मज्ञानाने सोनं आणि माती दोन्हीं समबुद्धीने पाहतो, जो सुख-दुःख, निंदा-स्तुती प्रिय-अप्रिय सर्वाकडे धैर्यवान वृत्तीने समबुद्धीने पाहतो, या चढ उतारांचा ज्याच्या मनस्थितीवर काहीही परिणाम होतं नाही तो.....

जो मान-अपमान, शत्रू-मित्र हे भेद मानत नाही, सुरवातीलाच ज्याने या गोष्टी एकसमान पाहण्याची कला आत्मसात केली आहे तो "गुणातीत" आहे असे मी म्हणेन.

मला वाटते  अनेक अध्यायांत  श्रीकृष्ण "समबुद्धि" ही गोष्ट वारंवार अधोरेखित करत राहतात. जीवनांत घडणाऱ्या अनेक घटनांना समबुद्धीने पाहता येणं ही एक कला आहे...खूप मोठ्या प्रयासाने आणि साधनेने साध्य होणारी. जर ही साधली तर श्रीकृष्ण म्हणतात तसे  आपण योग युक्त आणि तणाव मुक्त होऊ शकतो... If not this we can at least learn the art of balancing.

श्रीकृष्ण म्हणतात जो एकनिष्ठ भक्तीने अखंड माझी भक्ति करतो तो या त्रिगुणांना पार करून ब्रह्मपदाला पोहोचू शकतो.

ब्रह्मास मी चि आधार अवीट अमृतास मी।

मी चि शाश्वत धर्मास आत्यंतिक सुखास मी॥ २७ ॥

 अर्जुना शेवटी हे लक्षात ठेव, त्या अविनाशी परब्रह्माचा, अमृताचा, नित्य धर्माचा आणि अखंड आत्यंतिक आनंदाचा आश्रय आणि आधार मीच आहे. इथे गुणत्रय विभाग योग संपतो....

सामान्य मानवी जीवनातील गुणात्मक अभिव्यक्तीचे हे श्रीकृष्णांनी केलेले  वर्गीकरण आपल्या जगण्याला किती लागू पडते आहे. डोळे मिटून आपल्या जगण्याचा आपणच आढावा घेतला तर आपण कुठल्या गुणविभागात मोडतो ते सहज शोधून काढता येल. कुठला गुण आपल्यांत प्रबळ आहे हे ओळखण्याच्या सोप्या guidelines भगवंतांनी या अध्यायात दिल्या आहेत... it's almost like Psychometric test. आपण स्वतःच, स्वतःचे मोजमाप करायचे आणि सुधारणा करायला काय करायचे ते स्वतःच ठरवायचे. पण हो..... फळाच्या लाभासाठी मात्र नाही तर सत्वगुणाच्या प्रकाशाने स्वतःचे जीवन उजळण्यासाठी!!


क्रमश:

 अलका देशपांडे


 


 

No comments:

Post a Comment